मुख्य सामग्रीवर वगळा

जगातील पहिले प्रेमपत्र .

उगवतीचे रंग 
जगातील पहिले प्रेमपत्र .. 
आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. पण काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणाऱ्याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत. म्हणून तर प्रिय व्यक्तीची पत्रे जपून ठेवली जात. त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे होत असत. हिंदी चित्रपटात तर या गोष्टीचा उपयोग करून गीतलेखकांनी अनेक गाणी लिहिली आहेत. आणि ती कमालीची लोकप्रिय होऊन लोकांच्या ओठांवर आली. नायिकेने नायकाला प्रेमपत्र लिहावे, पोस्टमन हा त्यांच्यामधला पत्र पोहोचवणारा दूत. कधी कधी नायिकेला पत्र लिहिता येत नाही. मग ती पोस्टमनलाच सांगते, 
खत लिख दे सावरियाके के नाम बाबू 
कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू 
वो जान जायेंगे, पहचान जायेंगे. 
त्या नायिकेला एवढा विश्वास आहे की आपले फक्त नाव असलेले पत्र त्या प्रियकराला मिळाले की बाकी सगळं तो समजून जाईल. 
पण तुम्हाला माहित आहे का की रुख्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र हे जगातील पहिले प्रेमपत्र असावे. किती बुद्धिमान म्हणावी रुख्मिणी ! आणि तिच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच. मी असे का म्हणतो त्याला कारण म्हणजे त्या वेळची परिस्थिती. रुख्मिणी ही विदर्भराजा भीमकाची सुंदर आणि बुद्धिमान कन्या. लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा तिच्या कानावर आल्या होत्या. आणि त्या ' सावळ्या सुंदरास ' तिने मनानेच वरले होते. पण तिचा भाऊ रुख्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्याच्या मनात तिचा विवाह शिशुपालाशी व्हावा अशी इच्छा होती. शिशुपाल हा सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. रुख्मीने आपल्या बहिणीवर म्हणजे रुख्मिणीवर अनेक बंधने लादली होती. ती तिच्या स्वतःच्या मर्जीने कोठेही जाऊ शकत नव्हती. अशा वेळी तिच्या हातात काहीही नव्हते. तिचे आईवडील सुद्धा रुख्मीपुढे हतबल झाले होते. 
त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या डोक्यात कृष्णाला पत्र लिहिण्याचा विचार येणे ही गोष्ट तिच्या बुद्धिमत्तेची निदर्शक आहे. आणि ते कृष्णाला पाठवणे आणि त्याच्यासोबत पळून जाऊन विवाह करण्याची तिची तयारी ही तिची हिम्मत आणि धाडस दाखवणारी आहे. आपल्या पत्रात  ती श्रीकृष्णाला म्हणते 
" हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.
साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादि धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत, आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.
अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर. आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.
तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन, पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन, आणि अंती तुझीच होईन!!"
या पत्रातला मला आवडलेले वाक्य म्हणजे ती श्रीकृष्णाला म्हणते , " साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इ धन घेऊन मी येईन. " किती सुंदर विचार. आणि लाख मोलाचे धन. पैसा नाही, हुंडा नाही, वस्तू नाही. तर साधना, संस्कार, प्रीती आणि भक्ती या सुंदर भावना हेच धन. आणि तेच ती घेऊन येते. आणि जिचा कृष्ण सखा आहे, पती आहे तिला आणखी काय हवे ? आणि त्या श्यामसुंदराला सुद्धा कशाची अपेक्षा असते ? तुमची साधना महत्वाची. संस्कार महत्वाचे. प्रीती आणि भक्ती महत्वाची. तुम्ही भक्तिभावाने आपले हृदय त्याला अर्पण करा, म्हणजे तो रुख्मिणीप्रमाणे तुमचेही हरण करील. तुम्ही त्याचे होऊन जाल. हाच तर या पत्रातला आपल्या सगळ्यांसाठी संदेश आहे,  नाही का ? 
                                  ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
                                             ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...