मुख्य सामग्रीवर वगळा

आपल्या शिक्षण पद्धतीचे अपयश ...

उगवतीचे रंग

आपल्या शिक्षण पद्धतीचे अपयश ...

दहावीची परीक्षा नुकतीच सुरु झाली आहे. आषाढी, कार्तिकीला जशा पंढरपूरच्या वाऱ्या सुरु होतात , तशा मार्च महिना सुरु झाला म्हणजे परीक्षा सुरु होतात. बारावी, दहावी आणि मग शालेय परीक्षा. आता जी दहावीची परीक्षा सुरु आहे, ती कशा पद्धतीने चालली आहे हे आपण सगळ्यांनी बातम्यात वाचलं किंवा ऐकलं असेल. एका परीक्षा केंद्रावर पहिलाच पेपर जो मराठीचा होता, त्याची प्रश्नपत्रिका फुटली आणि व्हाट्सअप वर व्हायरल झाली. आता या घटनेची चौकशी होईल. जे कोणी दोषी असतील, त्यांना शिक्षा होईल हा भाग वेगळा. प्रश्न हा आहे की अशी वेळ का येते ? दरवर्षी कुठल्या ना कुठल्या अभ्याक्रमाची प्रश्नपत्रिका फुटली अशी एक तरी बातमी आपल्याला वाचायला मिळतेच. या घटना शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या विचारवंतांना, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि जे पालक अपार शारीरिक, मानसिक आणि आर्थिक झळ सोसून आपल्या पाल्यांचे शिक्षण करतात, या सगळ्यांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.

याचे एक प्रमुख कारण म्हणजे परीक्षेतील यश आणि त्यात मिळणारे गुण याला आपण आपल्या शिक्षण पद्धतीत सर्वोच्च प्राधान्य देऊन ठेवले आहे. परीक्षेतील गुण म्हणजेच सगळे काही. ज्याला ऐंशी नव्वद टक्के गुण, तोच खरा काय तो हुशार अशी मनोवृत्ती पालकांची आणि विद्यार्थ्यांची आम्ही तयार केली आहे. आणि अप्रत्यक्षरीत्या मुलांच्या या गुणांचा संबंध त्यांच्या पुढील जीवनातील यशापयशाशी जोडला आहे. जीवनातील यशापयश आणि परीक्षेतील यश या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.परीक्षेत कमी गुण मिळवणारे किंवा अपयशी होणारे अनेक विद्यार्थी आपल्याला भावी जीवनात यशस्वी झालेले दिसतात.

अरुण शेवतेंनी संपादित केलेले ' नापास मुलांची गोष्ट ' हे पुस्तक आपल्याला माहिती असेल, कदाचित आपण वाचलेही असेल. या पुस्तकात महात्मा गांधी, आईन्स्टाईन, जे कृष्णमूर्ती, विन्स्टन चर्चिल इ ची उदाहरणे दिली आहेत. ही सगळी महान माणसे कधी तरी कोणत्या तरी परीक्षेत अपयशी झाली होती. पण त्यांनी हार मानली नाही. ते निराश झाले नाहीत. परीक्षेतील गुण किंवा अपयश म्हणजेच सगळे काही अशी त्यांची भावना नव्हती. त्यामुळे हार न मानता जिद्दीने त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात कार्य केले. आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. समाजाच्या भल्यासाठी काम केले.

पण आमचे शिक्षक, पालक अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावर परीक्षेतील गुण म्हणजेच सगळे काही हे बिंबवत असतात. गुणांपेक्षाही जो विषय मी शाळेत शिकतो तो मला कितपत कळला आहे ही गोष्ट महत्वाची आहे. कालपरवाच मी भारतातून आणि आपल्या महाराष्ट्रातून इस्रायलमध्ये जे लोक आपल्या मायदेशी परत गेले त्यांनी सुद्धा आपल्या मुलांना मराठी यावे म्हणून केलेल्या प्रयत्नांबद्दल लिहिले होते. नुकताच गेल्या महिन्यात आपण मराठी राजभाषा दिन साजरा केला. हे सारे असताना आमच्या विद्यार्थ्यांना मराठीच्या पेपरला कॉपी करावी लागते, त्यांना कॉपी पुरवली जाते, प्रश्नपत्रिका फुटतात हे सारे लांच्छनास्पद आहे. एका बाजूला लाभले ' आम्हास भाग्य बोलतो मराठी ' म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच मराठीत उत्तीर्ण होण्यासाठी वाममार्गाचा आधार घ्यायचा..!

 इथेच आमच्या शिक्षणपद्धतीचे अपयश आहे. त्यांना आम्ही लहानपणापासून एखाद्या विषयावर स्वतंत्रपणे विचार मांडायला, लिहायला कितपत शिकवतो ? नुसते एका वाक्यात उत्तरे द्या, गाळलेल्या जागा, भरा, जोड्या लावा यासारखे प्रश्न त्यांना पाठांतर आणि घोकंपट्टी करायला लावतात. अगदी एम पी एस सी /यु पी एस सी या सारख्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा हीच स्थिती आहे. मुलांनी एखाद्या विषयावर स्वतंत्रपणे त्यांचे विचार मांडणे या गोष्टीला आम्ही कितपत महत्व देतो ? दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगितला, तर त्यांना सुसंगतपणे आपले विचार मांडता येत नाही. कारण त्याचा सरावच त्यांच्याकडून करून घेतला जात नाही.

शिक्षकांनी वर्षभरात एका ठराविक संख्येत विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घ्यावेत असे त्यांना सांगितले जाते. बरेचशे शिक्षक असे निबंध विद्यार्थ्यांनाच घरून लिहून आणायला सांगतात. मग विद्यार्थीही कधी गाईडमधून तर कधी पालकांकडून निबंध लिहून आणतात. शिक्षकांना आपण निबंध घेतल्याचे समाधान, विद्यार्थ्यांना निबंध लिहिल्याचे समाधान आणि पालक, शिक्षकांना निबंधाची वही भरल्याचे समाधान. या खोट्या समाधानात आपण आपली स्वतःची फसगत करून घेतो आणि विद्यार्थ्यांचे नकळत मोठे नुकसान करतो.

मी शिक्षक म्हणून काम करत असताना निबंधाच्या तासाला विद्यार्थ्यांना ज्या विषयावर निबंध लिहून आणायचा आहे, त्याची वर्गात चर्चा करीत असे. मुलांनाच त्याविषयावर बोलायला सांगत असे. मग ते मुद्दे फळ्यावर लिहीत असे. कधी कधी मुले अगदी नवीन मुद्दे सांगत, ज्यांचा मी विचारही केलेला नसे. आपण विद्यार्थ्यांना जेव्हा स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य देतो तेव्हा काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मुलं बोलायला लागतात, नवनवीन मुद्दे मांडतात. मग मी मुलांना त्या मुद्द्यांवर आधारित निबंध घरून लिहून आणायला सांगत असे आणि अनेक मुले मग त्यांच्या भाषेत उत्तम लिहून आणत . यातूनच त्यांना एखाद्या विषयावर आपले विचार व्यक्त करण्याची सवय लागत असे. अशाच पद्धतीने त्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी सुद्धा मुद्दे काढण्यास मी सांगत असे. यातूनच मुले तयार झाली. मग त्यांना कॉपी करण्याची वा इतरांची उत्तरे पाहण्याची गरज उरली नाही.

                                         ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                                                   ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...