उगवतीचे रंग
किस्से साहित्यिकांचे...
उगवतीचे रंग रोज झाले सुरु
चला म्हटलं आज त्यात
थोडे हास्यरंग भरू.
निरनिराळ्या साहित्यिकांचे साहित्य जसे आपल्याला आवडते, तसेच वेळप्रसंगी त्यांच्या भाषणातून, संभाषणातून निर्माण झालेले विनोदही आपल्याला आवडतात. त्यातून त्यांची विनोदबुद्धी, प्रसंगावधानता आणि चातुर्य या गुणांचे दर्शन होते. त्यातून ते कधी समोरच्याची विकेट घेतात, कधी समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करतात तर कधी सभा जिंकून घेतात. बिरबलाच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तसेच आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी इ चे किस्सेही प्रसिद्ध आहेत. पणआपण नेहमी ऐकले आहेत, त्यापेक्षा थोडे वेगळे किस्से आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
य गो जोशी हे कथाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा इ कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे साहित्यिकांचे नेहमी येणेजाणे सुरु असायचे. एकदा त्यांच्याकडे त्या काळातले प्रसिद्ध कवी आणि विडंबनकार ज के उपाध्ये त्यांना भेटण्यासाठी आले होते. पण काही कामानिमित्त य गो बाहेर गेले होते. तेव्हा त्यांनी यगोंच्या पत्नीजवळ निरोप ठेवला आणि त्यांना उपाध्ये येऊन गेले म्हणून सांगा असे सांगितले.
यगो घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने कोणी पाध्ये म्हणून येऊन गेल्याचे सांगितले. यगोंनी बरेच आठवण्याचा प्रयत्न केला पण पाध्ये आडनावाचे कोण येऊन गेले असतील ते काही त्यांच्या लक्षात येईना. दुसऱ्या दिवशी परत उपाध्ये त्यांना भेटण्यासाठी आले. तेव्हा यगो घरीच होते. उपाध्ये म्हणाले, ' काल मी येऊन गेल्याचे वहिनींनी तुम्हाला सांगितलेच असेल. ' तेव्हा यगो म्हणाले, ' अच्छा, तुम्ही आला होतात होय ? मला पाध्ये येऊन गेल्याचे सांगितले गेले. '
तेव्हा हजरजबाबी उपाध्ये चटकन म्हणाले, ' उ ' वहिनींच्या डोक्यात राहिली . '
प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांची घनिष्ठ मैत्री होती. एकदा यशवंतरावांनी ते दोघे निवांत असताना रणजित देसाईंना दमात घेऊन विचारले -
' काय रणजित, अलीकडे फार पितोस असं ऐकलंय .'
' हो, पितो दादा, पण मला त्याचा लोभ नाही. '
' काय बोलतोस, कळतं का ? '
' कळतं दादा. तुमच्यापासूनच शिकलो. '
' म्हणजे ? काय म्हणायचं तुला ? '
' म्हणजे कायम ह्या ना त्या सत्तेच्या खुर्चीवर बसून मला त्याचा लोभ नाही असं म्हणण्यासारखंच आहे ना हे ? '
यावर यशवंतराव काय बोलणार ?
एकदा मॉरिशसला दुसरी जागतिक मराठी परिषद भरली होती. या मराठी परिषदेला महाराष्ट्रातून गेलेले अनेक नामवंत साहित्यिक आणि कलावंत उपस्थित होते. त्यात लोकसत्ताचे संपादक माधव गडकरीही होते. तेव्हा माधव गडकरींनी सुधीर गाडगीळांना म्हटले, ' इथे नामवंत साहित्यिक, कलाकार उपस्थित आहेत. त्यांच्या थोडक्यात मुलाखती घेऊन टाका. ' त्यानुसार गाडगीळ मुलाखती घेण्यासाठी व्यासपीठावर गेले. त्यावेळी व्यासपीठावर गाडगीळांच्या उजवीकडे पु ल देशपांडे आणि डावीकडे प्रख्यात गायिका माणिक वर्मा बसलेल्या होत्या.
गाडगीळांनी पहिला प्रश्न माणिक वर्मांना विचारला. ' माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना, तुम्हाला भावगीत किती उपयोगी पडलं ? '
माणिकबाई काही उत्तर देणार तोच पुलं म्हणाले, ' अरे, कशाला तिच्या वर्मावर घाव घालतोस ? '
हे ऐकल्याबरोबर सारं सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेलं. थोडी शांतता झाल्यावर गाडगीळ म्हणाले, ' अहो, त्यांच्या वर्मावर मी पामर काय घाव घालणार ? त्यांचा वर्मा ' अमर ' आहे. माणिक वर्मांच्या पतीचं नाव अमर आहे हे ज्यांना माहिती होतं त्यांनी या विनोदाला मनमोकळे हसून दाद दिली. अशी होती या साहित्यिक आणि कलाकारांची समयसूचकता. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा