मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या मातीचे गायन...

उगवतीचे रंग

माझ्या मातीचे गायन...

     काल पेपर वाचत असताना एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. दै पुण्यनगरीत आलेल्या या लेखाचे शीर्षक होते ' इस्रायल हृदयात; पण मराठी रक्तात .' हा लेख चंद्रशेखर बर्वे यांचा आहे. या लेखात त्यांनी सुरुवातीला असे म्हटले आहे की मराठीला संजीवनी देणारे दोन निर्णय जागतिक पातळीवर घेण्यात आले आहेत. पहिला महत्वाचा निर्णय घेतला तो महाराष्ट्र सरकारने. दहावीपर्यंत मराठी सक्तीची करून. आणि दुसरा निर्णय घेतला गेला तो इस्रायलमध्ये. मराठी भाषा आपल्या व्यवहारात सदैव राहावी याची काळजी महाराष्ट्रापेक्षा जास्त बेने इस्रायल यांना वाटते.

     खरं म्हणजे या बातमीवर माझा विश्वास बसला नाही. पेपरमध्ये काहीतरी चुकीचे छापले गेले असावे किंवा वाचताना आपलीच काहीतरी चूक होत असावी असे मला वाटले. पण मग मी काळजीपूर्वक तो लेख वाचत गेलो. आणि जसजसा तो लेख वाचत गेलो, तसतसा आपण भारतीय असल्याचा, त्यातही महाराष्ट्रीयन असल्याचा आणि आपली मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान वाटला . तो आनंद तुमच्यासोबत वाटून घ्यावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.

     इस्रायल हे एक चिमुकले राष्ट्र. पण राष्ट्रभक्ती, शौर्य, जाज्वल्य देशाभिमान इथल्या लोकांच्या नसानसात भिनलेला. तसा या राष्ट्राला चार साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ मध्ये इस्रायल स्वतंत्र देश म्हणून खऱ्या अर्थाने आकारास आला. जगाच्या पाठीवरील हा एकमेव ज्यू लोकांचा देश. जेरुसलेम ही या देशाची राजधानी. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठी सुद्धा पवित्र असे हे ठिकाण. होली लँड . या देशातल्या लोकांनी वंशविच्छेदाच्या आणि नरसंहाराच्या भयानक कळा सोसल्या. वंशाने किंवा जन्माने ज्यू म्हणजेच यहुदी असणे हाच काय तो एकमेव या लोकांचा अपराध. इंग्लंड, जर्मनी आणि अरब राष्ट्रांनी या लोकांची ना घरका ना घाटका अशी स्थिती केली होती. डेव्हिड बेन गुरियन या बुद्धिमान, लढवय्या आणि दूरदृष्टी नेत्यामुळे हा भूभाग एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अभिमानाने उभा राहिला.

     यानंतर जगभरातून हजारो ज्यू आपल्या देशात म्हणजे इस्रायलमध्ये परतू लागले. भारतातून इस्रायलमध्ये परतणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. भारतातून कोचीन, कलकत्ता, गुजरात आदी ठिकाणांहून हे लोक परतले. त्यातही सर्वाधिक संख्या आहे ती महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. या लोकांना तिकडे जाऊन आता जवळपास सात दशके झाली. पण मराठी मातीशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. मराठी संस्कृती आणि भारतीय संस्कृती या लोकांनी टिकवून ठेवली आहे. महाराष्ट्रीयन आणि भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. महिला साडी नेसतात. जे महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत, त्यांच्या घरात मराठी बोलली जाते. ' मायबोली ' नावाचे मराठी मासिक तेथे गेल्या ३५ वर्षांपासून चालवले जात आहे. तेथील मुलांचे शिक्षण हिब्रू भाषेत होत असल्याने ते हिब्रू भाषा चांगल्या प्रकारे लिहू, वाचू आणि बोलू शकतात. मराठी बोलणे आणि वाचणे त्यांना कठीण जाते. म्हणून या मासिकात हिब्रू भाषेतील सुद्धा काही साहित्य अंतर्भूत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचा उद्देश हा की हिब्रू वाचता वाचता त्या मुलांचे लक्ष मराठीकडे जावे. मराठी साहित्याचे त्यांनी वाचन करावे, मराठीची गोडी त्यांच्यात निर्माण व्हावी.

     ५० च्या दशकात तेथे गेलेल्या काही ज्यूंनी तेथे चांगली वागणूक मिळत नसल्याने भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पं नेहरूंनी लगेच विमान पाठवून शेकडो ज्यूंना भारतात परत आणले. हे लोक आज भारतीय संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. त्यांची आडनांवेही अस्सल भारतीय आहेत. त्यांचं हे भारतावरचं प्रेम आणि भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ कदापिही तुटणे शक्य नाही. सिनेगॉग हे त्यांचे प्रार्थनास्थळ. दिल्लीतील सिनेगॉगचे धर्मगुरू इझिकल इसहाक मळेकर म्हणतात. " इस्रायल आमच्या हृदयात आहे ; पण मराठी आमच्या रक्तात आहे. या जगाच्या पाठीवर भारतासारखा दुसरा देश नाही. सहनशीलता, वसुधैव कुटुंबकम , अतिथी देवो भव आणि विश्वची माझे घर असं मानणारा कोणता देश या पृथ्वीतलावर असेल तर तो फक्त भारत होय. " ( संदर्भ दै पुण्यनगरी दि २/३/२०२० )

                      ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
                               ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...