मुख्य सामग्रीवर वगळा

वो फिर नही आते...

उगवतीचे रंग

वो फिर नही आते...

आपल्या आयुष्यात  काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.

आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते.

पण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते.

मी मधू गानू यांचं  ' सहवास गुणीजनांचा ' हे पुस्तक वाचत असताना पु ल देशपांडे यांनी मधू गानू यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत  नाहीत. पण हे मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो.
या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी. मधू गानू हे पुलंच्या अत्यंत निकटचे. जणू त्यांच्या घरातीलच एक. पण काही कारणाने मधू गानूंचा गैरसमज झाला आणि त्यांनी संतापून पुलंना नको ते लिहिले आणि जणू त्यांच्यातले संबंध तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी पुलंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते अप्रतिम आहे. निमित्त जरी मधू गानूंचं असलं तरी ते तुम्हा आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक आहे. या पत्रात पुल म्हणतात -

'... माणसाने एकदा स्वतःच्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला की प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. तू रागावलास, रुसलास, चिडलास तरी हरकत नाही. आपण कोणीच रागलोभ जिंकलेले संतमहंत नाही. पण त्याची परिणीती ' मधू मेला ' अशासारखी वाक्ये लिहिण्यात होऊ नये... तू आमच्या घरी येणार नाही असे म्हटलेस तरी तू जिथे असशील तिथे आम्हाला यावे लागेल. आयुष्यात फारतर एक किंवा दोन माणसे अशी येतात, की जिथे क्षुद्र व्यक्तिगत मानापमानाचे विचार उद्भवण्यापूर्वीच मोडून टाकावे लागतात. अशी स्नेहबंधने फार नसतात. तसे परिचित किंवा मित्रआप्त वगैरे खूप असतात. पण जिथे स्नेहबंधने एकरूपता असते अशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्याइतकी दुर्मिळ असतात. सुखदुःखाच्या क्षणी त्यांनी जवळ नसणे हे दुःसह असते. अशा माणसांनी ही अशी आततायी वृत्ती धरून चालत नसते. '

पुल पुढे लिहितात, ' हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू  देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा. ..'

असे खूप सुंदर काही या पत्रात आपल्याला वाचायला मिळेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुळातून वाचावे. जागेच्या आणि वेळेच्या मर्यादेअभावी येथे सर्व लिहिणे शक्य नाही.

पण हे पत्र वाचल्यावर मला किशोरकुमारने गायलेलं ' जिंदगी के सफर मे  गुजर जाते है..' हे आपकी कसम या चित्रपटातलं गाणं आठवलं. एकदा अशी माणसं दुरावली की ती पुन्हा नाही येणार. म्हणून जपा आपल्या माणसांना जी आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.

                ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                             ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...