मुख्य सामग्रीवर वगळा

तेथे कर माझे जुळती ...

उगवतीचे रंग 
तेथे कर माझे जुळती ...
आचार्य अत्रेंनी सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर ' संबोधले आणि ही उपाधी सावरकरांच्या नावामागे कायमची चिकटली.आणि खरोखरच स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांना खऱ्या अर्थाने शोभून दिसते. सावरकर  हे व्यक्तिमत्वच असे आहे की देशासाठीच्या आपल्या सर्वस्व त्यागाने ते झळाळून उठते. ज्यांना दोन दोन जन्मठेपेची शिक्षा झाली, आणि ती पूर्ण करून जे पुन्हा राष्ट्राच्या सेवेत सक्रिय झाले असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांनी अंदमानच्या एकांतवासाच्या कोठडीत खिळ्याने आणि कोळशाने भिंतीवर कविता लिहिल्या, त्या पाठ केल्या आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर या दहा हजार ओळी पुन्हा लिहून काढल्या असा एकमेव कवी स्वातंत्र्यवीर सावरकर.

सावरकरांच्या कवितांनी मला लहानपणापासूनच मोहून टाकले आहे. ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' या कवितेत किती सूक्ष्म, तरल आणि सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, की ज्या फक्त एक संवेदनशील हृदयाचा कवीच करू शकतो. या पुढील दोन ओळीतले सौंदर्य पहा -

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली.

कुसुमासमान असलेल्या गालांवरची लाली किंवा कुसुमांच्या म्हणजे फुलांच्या गालावर असलेली लाली, हे स्वतंत्रदेवते, ती म्हणजे तूच आहेस. किती सुंदर कल्पना ...! किंवा

तुजसाठी मरण  ते जनन
तुजवीण जनन ते मरण

अशी सुंदर रचना सावरकरच करू जाणे.

किंवा मातृभूमीबद्दलची केवढी ओढ आणि तळमळ ' सागरा प्राण तळमळला ' या गीतातून व्यक्त झाली आहे. मला तर असे वाटते की सावरकरांनी इतर काही केले नसते आणि फक्त या दोन कविता लिहिल्या असत्या तरीदेखील कवी म्हणून ते अजरामर झाले असते. आणि अर्थात ते अजरामर आहेतच. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले कार्य कोणीही पुसून टाकू शकणार नाही. आज जे सावरकरांवर टीका करतात, त्यांनी सावरकरांनी सोसलेल्या हालअपेष्टांची केवळ कल्पना करून बघावी. त्या ठिकाणी स्वतःला कल्पून बघावे. तरच त्यांना सावरकरांच्या त्यागाची थोडीफार कल्पना येऊ शकेल.

 देशासाठी केवढ्या यातना त्यांनी सहन केल्या , घरादारावर तुळशीपत्र ठेवले हे त्यांचे ' माझी जन्मठेप ' वाचताना आपण अक्षरशः थरारून जातो. जाज्वल्य देशभक्ती शिकावी ती सावरकरांकडूनच. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, देखणे सोन्यासारखे पिळदार शरीर आणि हातात बॅरिस्टरची पदवी. एवढे भांडवल हाताशी असल्यावर एखाद्याला स्वर्ग चार बोटेच उरला असता. लग्न झालेले , मोठ्या घराण्यातून आलेली देखणी तरुण मुलगी पत्नी  लाभलेली आणि हा तरुण देशभक्तीच्या वेडाने झपाटलेला. आज ज्या पद्धतीने सगळे जग चालले त्याच्या अगदी उलट. जगाच्या दृष्टीने वेडाच म्हटला पाहिजे.
ते डोंगरीच्या तुरुंगात होते. तेंव्हा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल आला. त्यानुसार त्यांना इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड केले म्हणून पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. इंग्रज सरकार आपल्याला फ्रान्सच्या ताब्यात देईल ही आशाही त्यामुळे मावळली होती. अशा वेळी एखादा सामान्य मनुष्य असता तर खचून गेला असता. पण ज्यांनी देशासाठी साऱ्याच सर्वस्वाचा होम केला होता त्या विनायक दामोदर सावरकरांना ही शिक्षा त्यांच्या विचारांपासून परावृत्त करू शकली नाही.
तेथून पुढे त्यांना अंदमानच्या तुरुंगात नेण्यासाठी भायखळ्याच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यापूर्वी डोंगरीच्या कारागृहात त्यांची पत्नी सौ. यमुना ( माई ) त्यांना भेटण्यास आली. पन्नास वर्षाची जन्मठेपेची शिक्षा म्हणजे ही जवळजवळ त्यांची शेवटचीच भेट होती. क्षणभर सावरकरांचे मन ताटातुटीच्या विचारांनी भरून आले. त्यांची पत्नी तेव्हा फार तर एकोणीस वीस वर्षांची असावी . तेव्हा अशा तरुण वयात ताटातुटीचे विचार मनात येणे अगदी स्वाभाविक होते. पण ते अगदी क्षणभरच. पण दुसऱ्याच क्षणी ते त्यांचे लखलखीत तेजस्वी शब्द बाहेर पडले. अगदी जीव ओवाळून टाकावा असे शब्द. स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे शब्द, " बरे, ईश्वराची दया असेल तर पुनः भेट होईलच. तोवर जर कधी ह्या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की , मुलामुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणावयाचे असेल तर असला संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा ह्याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूल-बोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे हजारोजणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल."
सावरकरांच्या या तेजस्वी शब्दांवर आणखी काही बोलण्यासारखे नाही. ही प्रखर देशभक्ती पाहून नकळत हात जोडले जातात. ' दिव्यत्वाची जेथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती. '
    ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
        9403749932

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...