मुख्य सामग्रीवर वगळा
उगवतीचे रंग

देगा उसका भला...
माझ्या लहानपणी आमच्या गावात भिक्षा मागण्यासाठी एक फकीर यायचा. त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज होते. आमच्या घराजवळ आला की मला म्हणायचा, दे दे बेटा, अल्ला  के नाम पे. त्याची मोहिनीच अशी होती की, मी त्याला कधीच रिक्त हस्ताने  परत पाठवले नाही. पण कधी कोणी त्याला भिक्षा दिली नाही तरी , तो चिडत नसे. हसतमुखाने पुढे जाई. तो म्हणत असे,  देगा उसका भला, ना देगा उसका भी भला. मला त्यावेळी त्याचे हे उद्गार फारसे कळत नसत. मी म्हणायचो, देगा उसका भला, हे तर ठीक आहे. कळण्यासारखे आहे. पण ना देगा उसका भी भला हे कसे काय ?
याचे उत्तर माझी आई मला द्यायची. ती म्हणायची, ' अरे आपण फक्त आपल्या  स्वार्थापुरता विचार करतो. दुसर्‍याचा विचार करतो का ? त्या फकीरच्या उद्गारामागे सर्वांचेच भले होवो ही शुभकामना आहे. कोणी देवो वा न देवो.'  किती सुंदर होते त्या फकिराचे तत्वज्ञान ! तो तर होता एक भिक्षा मागणारा फकीर. दुसर्‍यांना देण्यासारखे त्याच्याकडे काय होते ? पण जे होते ते तो भरभरून देत होता. जो दुसर्‍यासाठी आनंदाची कामना करतो, परमेश्वर त्याच्या झोळीत भरभरून आनंद टाकतो. मग अशा वेळी  देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी  अशी आपली अवस्था होते.
आपल्याला त्यासाठी खूप काही करावे लागत नाही. आपल्याजवळ जे आहे, त्यातून थोडे दुसर्‍याला पण द्यायला शिकायचे. आपण जे देऊ, ते शतपटींनी परत मिळते. शेतात मूठभर धान्य पेरले तर, ते शेत आपल्याला पोतेभर धान्य परत देते. तसे आनंदाचे आहे. तो आपण दुसर्‍याला दिला तर आपल्याकडे तो अनेक पटींनी परत येतो. दु:ख, द्वेष, राग, मत्सर, हेवेदावे यांची पेरणी केली तर, तर पीक त्यांचेच येणार हे उघड आहे.
आपल्याकडे संतांनी स्वार्थ आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला आहे. आपले कर्तव्य करता करता न कळत परमार्थ देखील करता येतो. बागेत फुलांवर बसणार्‍या मधमाशा फुलांवर बसून मध गोळा करतात. त्या आपल्या स्वार्थ साधत असतात. पण हे करीत असताना त्यांच्याकडून नकळत परागीभवनही होते. आणि त्याचा वनस्पतींना उपयोग होतो. याच पद्धतीने जंगलातील पक्ष्यांकडून फळे भक्षण केल्यानंतर, त्यांच्या विष्ठेतून ज्या बिया बाहेर टाकल्या जातात, त्यामुळे वनस्पती वाढीसाठी आपोआपच मदत होते. गांडूळ ज्या जमिनीत राहतात, ती जमीन भुसभुशीत करून झाडांसाठी उपयुक्त करतात. प्राणी, पक्षी आणि निसर्ग यांचे एकमेकांवर अवलंबून असलेले किती सुंदर नाते आहे. जणू ते एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. त्यांच्या या निसर्गक्रमात व्यत्यय आणतो तो माणूस. अनेक प्रकारे. पिकांवर, फुलांवर जेव्हा कीटक नाशकाची फवारणी केली जाते, तेव्हा याच पराग सिंचन करणार्‍या कीटकांचा गोंधळ उडतो. त्यांना आपले काम करता येत नाही. ते ती जागा सोडून दुसरीकडे निघून जातात. अशाच प्रकारे वाढलेल्या सर्वच प्रकारच्या बेसुमार प्रदूषणामुळे मानवासहित सर्व पशू, पक्षी, प्राणी आणि निसर्ग हे घटक धोक्यात आले आहेत. हे थोडे विषयांतर झाले, पण ते ओघानेच आले.
तर असे हे निसर्ग आणि प्राणी यांचे सुंदर नाते. एकमेकांना किती सहकार्य !  सहनाववतू सह नौ भूनक्तू . जणू उपनिषदातील मंत्राचे  पालनच ! स्वार्थ आणि परमार्थ यांचा सुरेख संगम. मागे  सोशल मीडियावर एक छोटा व्हिडिओ पाहण्यात आला होता.  त्या व्हिडिओत एक पती घरी येताना दिवाळी आली म्हणून दिवाळीसाठी पणत्या खरेदी करून आणतो. पण त्या पणत्या साध्या असतात, रंगीत, आकर्षक आणि कलात्मक नसतात. त्याच्या पत्नीला त्या आवडत नाहीत. ती म्हणते की पणत्या साध्या आहेत. त्या मी कशा लावू ? तुम्हाला दुसर्‍या सुंदर, आकर्षक पणत्या दिसल्या नाहीत का ? तेव्हा आपली पत्नी नाराज झालेली पाहून तो पती तिला आपल्यासोबत दुसर्‍या पणत्या खरेदीसाठी घेऊन जातो.
ती एका दुकानातून आकर्षक, महागड्या पणत्या खरेदी करते. मग तिचा नवरा तिला त्याने आधी ज्या माणसाकडून पणत्या घेतल्या होत्या त्या ठिकाणी घेऊन जातो. आणि म्हणतो,  त्या आधीच्या पणत्या त्या माणसाला परत करून ये . ती पाहते की तो माणूस गरीब आहे, उन्हात पणत्या विक्रीसाठी बसला आहे. आकर्षक, महागड्या पणत्या बाजारात आल्यामुळे त्याची फारशी विक्री होत नाही. त्याच्याही घरी दिवाळी असणार आहे. तिच्या मनात एकाएकी एक विचार येतो. ती नवर्‍याला म्हणते,  मला तुमच्याजवळ असलेली दोन हजार रु. ची नोट द्या.  ती आपल्या नवीन घेतलेल्या पणत्या, दोन हजार रुपये आणि स्वत:साठी खरेदी केलेला मिठाईचा बॉक्स त्या माणसाला देऊन येते. आणि त्याच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद अवर्णणीय असतो. असेच जेव्हा आपण आपल्या आनंदात दुसर्‍याला सहभागी करून घेतो, तेव्हा तो आनंद द्विगुणित होतो. दुसऱ्याला दिलेला आनंद शतपटींनी आपल्याकडे परत येतो. 
©️   विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
           ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...