मुख्य सामग्रीवर वगळा

ये दिल मांगे मोअर ...

उगवतीचे रंग

ये दिल मांगे मोअर ...

माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला अधिक अधिक हवे असते. हवे , हवे आणि हवे. या हवेची हाव कधी संपत नाही. या अर्थाने तो ' हवेशीर ' प्राणी आहे. म्हणून तर आमच्या जाहिरातीत सुद्धा ये दिल मांगे मोअर अशा असतात. झालं असं की सुरुवातीला माझ्याकडे एक सायकल होती. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा स्कूटर, मोटरसायकल चालवणाऱ्यांचा हेवा वाटायचा . मग पुढे मोटारसायकल आली . तेव्हा बऱ्याच मंडळींकडे फोरव्हीलर म्हणजे मराठीत आपली चारचाकी हो, ती असायची. तिचे सुख काही वेगळेच. आणि ज्या प्राण्यांकडे म्हणजे मनुष्यप्राण्यांकडे बरं का, ती असायची त्यांचा भाव वेगळाच असायचा. म्हणजे आताच्या भाषेत ' लई भारी.'

पण करणार काय ? आपल्याला जे काही घ्यायचे ते आपल्याच बळावर. आपल्या पूर्वजांनी काही गडगंज संपत्ती कमावून ठेवली नव्हती. त्यांचा उदात्त हेतू इतकाच होता की पुढच्या पिढीच्या कर्तुत्वाला वाव मिळावा.
त्यामुळे जोपर्यंत हातात पैसे येत नाही, तोपर्यंत गाडीत बसून फिरण्याचे स्वप्न फक्त पाहत होतो. दुसरं काय करणार ?

ते किशोरकुमारचं गाणं आम्हाला आपलं वाटायचं.

' थोडा है, थोडे की जरुरत है..
जिंदगी फार भी यहां खूबसूरत है..

आणि त्या गाण्यातली पुढची ओळ -

जिस दिन पैसा होगा, वो दिन कैसा होगा ?
जिस दिन पहिये घुमेंगे और किस्मत के लब चुमेंगे ..

तर या गाण्याप्रमाणे खरोखरीच एक  दिवस आला. आणि अस्मादिकांजवळ म्हणजे माझ्याजवळ हो, नवी कोरी करकरीत मारुती उभी राहिली. जणू जन्मोजन्मीची तपश्चर्या फळाला आली . तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. म्हणजे गाडीला हो. अर्थात कुठे ठेवणार ? ठेवली घरासमोर. मग काही दिवस हिम्मत करून गाडी चालवण्याचा सराव म्हणजे मराठीत प्रॅक्टिस का काय म्हणतात ते केले ? सुरुवातीला सौ आमच्याबरोबर गाडीत बसायला तयार नव्हती.

काय म्हणता , का बरं ..?
अहो असे भलते प्रश्न विचारून आम्हाला अडचणीत नका आणू ना राव..

म्हणजे आमचे नाव जरी विश्वास असले तरी सुरुवातीला अविश्वास होता. पण आम्ही नावाला जागलो बरं का, म्हणून तर मग पुढे सहकुटुंब गाडी घेऊन लांब लांबची सफर करून आलो. मग असं सगळं छान छान काही दिवस बरं चाललं. आता आमच्या शेजाऱ्याला होंडा सिटीची गाडी घ्यायची काही गरज होती का ? म्हणजे इतके दिवस वधारलेला आमचा भाव धाडकन शेअर मार्केट कोसळावे तसा खाली आला ना राव. पण आणली त्यानं. आमचा विचार कोण करतो ? मग आम्हाला उगीचच असं वाटू लागलं की छे, थोडं थांबलो असतो पण हीच गाडी घेतली असती. जाऊ द्या तर हे असं चालूच राहणार.

समर्थ रामदासांनी ही मनाची अवस्था अचूक ओळखली होती बरं का ! ही जी सुखाची हाव आहे, ती कधीच पूर्ण होत नाही. सारखं ' ये दिल मांगे मोअर. ' मन हे चंचल आहे. आणि ते सारखं सुखाला लालचावलेलं आहे. आम्ही ठरवतो काही अन होतं काही. म्हणून समर्थ म्हणतात-

घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा,
म्हणऊनि करुणा हे बोलतो दीनवाचा .

म्हणून आपल्याकडे जे असलं, त्यात समाधान मानायला शिकलं तर जगणं सोपं होईल,सुंदर होईल. तीच सुखी होण्याची गुरुकिल्ली आहे, नाही का ?

                        ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                                 ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...