उगवतीचे रंग
माणसाची पारख ..
लीळाचरित्रात एक कथा आहे. एक साधुपुरुष फिरत फिरत एका गावात येतो. त्या गावातील एका गरीब माणसाच्या घरी तो थांबतो. त्या घरातील स्त्री त्याची सेवा करते. त्याला बसायला पाट देते. पाय धुते. गरमागरम जेवण करून त्याला खाऊ घालते. तो तिच्या सेवेवर प्रसन्न होतो. रात्री झोपताना तो सांगतो की तुझ्या घरात असलेल्या सगळ्या लोखंडाच्या वस्तू माझ्या बिछान्याजवळ आणून ठेव. त्या स्त्रीचा नवरा शेतकरी असतो. त्यामुळे त्यांच्या घरात सगळी शेतीची अवजारे असतात. कुदळ , पावडे, विळा ,कुऱ्हाड , नांगर इ. या सगळ्या वस्तू एकत्र करून ती त्या साधुमहाराजांजवळ आणून ठेवते. भल्या पहाटे साधुमहाराज उठून आपल्या पुढील प्रवासाला निघून जातात.
त्या स्त्रीचा नवरा ती शेतीची अवजारे घेऊन शेतावर जातो. नांगर चालवायला लागतो तर नांगराचा फाळ वाकतो. कुऱ्हाडीने झाडे तोडण्यास जातो तो कुऱ्हाडही चालत नाही. विळ्याचीही तीच अवस्था झालेली असते. शेवटी तो सगळी अवजारे घेऊन घरी येतो. आणि बायकोला सांगतो की काल तू ज्या साधूला आपल्या घरी ठेवून घेतलेस, त्याने आपल्याला फसवले. आपल्या सोन्यासारख्या वस्तू आता निरुपयोगी झाल्या आहेत. तोवर चांगले उजाडलेले असते. त्याची बायको निरखून पाहते तर तिला त्या वस्तू पिवळ्या रंगात चमकत असताना दिसतात. त्यांचे रूपांतर सोन्यात झाले आहे हे तिच्या लक्षात येते. मग ती आपल्या नवऱ्याला सत्य परिस्थिती समजून सांगते.ती सांगते त्या माणसाने आपल्याला फसवले नाही, तर आपले जन्मोजन्मीचे कल्याण केले आहे.
बऱ्याच वेळेला आपलेही असे होते. आपण फक्त वरवर बघतो. एखादी घटना जाणून घ्यायची असेल, तिचे मूल्यमापन करायचे असेल किंवा एखादया व्यक्तीविषयी मत बनवायचे असेल, तर फक्त वरवर पाहून चालणार नाही. घटनेच्या मुळाशी जावे लागेल. त्या व्यक्तीलाही समजून घ्यावे लागेल. घाईघाईने निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. लोखंडाच्या अवजारांनीच शेती करता येते. सोन्याच्या अवजारांनी शेती करता येत नाही. पण सोन्याची अवजारे झाली असतील तर त्यातली काही विकून आपण हवी तेवढी लोखंडी अवजारे घेऊ शकतो आणि उत्तम शेती करू शकतो. तसेच तात्पुरता विचार न करता एखाद्या घटनेचे दूरगामी परिणाम काय होतील याचाही विचार व्हायला हवा. फक्त जवळचे पाहून चालणार नाही.
पण आपण ही गोष्ट समजून घेतली नाही तर मित्रालाही आपण शत्रू समजायला लागू. तो गरीब माणूस त्याच्या वस्तू सोन्याच्या झाल्या हे ओळखू शकला नाही. त्याचे हित करणाऱ्याला तो ओळखू शकला नाही. उलट त्या साधू पुरुषाला तो दोष देऊ लागला. बरेचदा आपल्या हिताची गोष्ट आपल्याला कटू वाटते. ती आपल्याला सांगणारा आपला शत्रू वाटू लागतो. आणि गोड गोड बोलून भुलवणारी एखादी व्यक्ती आपल्याला मित्र वाटू लागते.त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा उद्देश मात्र वेगळा असू शकतो.
( कृपया या गोष्टीचा सध्याच्या राजकीय परिस्थितीशी संबंध जोडू नये. )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा