उगवतीचे रंग
त्या फुलांच्या गंधकोषी...
पहाटेची प्रसन्न वेळ. सूर्यदेवाने आपल्या सोनेरी किरणांची पखरण अवघ्या चराचर सृष्टीवर केली आहे. या सोनेरी किरणांच्या मृदू स्पर्शाने झाडे वेलींना जाग आली आहे. कळ्यांचे रूपांतर फुलांत होऊ लागले आहे. आकाशात पक्षीगण विहार करत आहेत आणि फुलांवर मधमाशांचे गुंजन सुरु आहे. शीतल वायू आपल्या लहरींबरोबर फुलांचा सुगंध दूरवर घेऊन जात आहे. अशी प्रसन्न सकाळ.
अशा वेळी एक नको असलेले दृश्यही दिसते.चिल्ल्यापिल्ल्यांची एक टोळी बाहेर पडली आहे. हातात प्लॅस्टिकची कॅरीबॅग आहे. माझ्या घरासमोरच्या बागेतील फुले त्यांना तोडायची आहेत. मी जरा नजरेआड होताच ती मुले बागेच्या कंपाउंड वॉलवर चालून फुले काढायला सुरुवात करतात. त्यांना जेवढी फुले बाहेरून तोडता येतील तेवढी ती तोडतात, नव्हे ओरबाडून काढतात. आणि कोणी येताना दिसले की धूम ठोकतात. बरेचदा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. कधी तरी कोणी हक्काने बागेत येऊन कधी विचारून तर कधी न विचारता फुले घेऊन जातात.
ही फुले त्यांना देवपूजेसाठी हवी असतात हे उघड आहे. त्यांनी फुले घेण्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. ती देवाला वाहण्याबद्दलही माझे म्हणणे नाही. अवश्य अर्पण करावीत देवाला. पण पण... आपण देवाला जे अर्पण करतो, ते आपले कष्टाचे असावे. झाडांवरची फुले खरं तर झाडांवरच चांगली दिसतात. पण ज्या विधात्याने ती निर्माण केलीत, त्यालाच त्यालाच त्यातली काही समर्पण भावनेने अर्पण करण्यात काही हरकत नाही. पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या झाडांवरील फुले तोडतो, तेव्हा ती फुलवण्यासाठी कोणी तरी कष्ट घेतलेले असतात. ती लावणे, त्यांची निगा राखणे या गोष्टी केलेल्या असतात. आणि आपण किती सहज ती देवाला वाहायची म्हणून तोडतो. कधी कधी माझ्या बागेत फुले नसतात, आणि देवपूजेसाठी फुले हवीच असतात, तेव्हा मी ती बाजारातून विकत आणतो. पण आणलीच पाहिजेत असे काही नाही. नुसत्या मनोभावे जरी देवाला नमस्कार केला, तरी तो त्याच्यापर्यंत निश्चित पोहोचतो.
तेव्हा देवाला जे काही अर्पण करायचे, ते स्वतःचे असावे. एखाद्या धनिकाने शंभर रुपयांची नोट दानपेटीत टाकणे आणि एखाद्या निर्धन व्यक्तीने त्याच्याजवळ असलेला एखादा रुपया समर्पण भावनेने अर्पण करणे याचे मूल्य सारखेच आहे असे मला वाटते. गरीब, निर्धन सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेला, तेव्हा त्याच्याजवळ त्या द्वारकेच्या राजाला देण्यासारखे काही नव्हते. पण त्याच्याकडे असणारे पोहे तो भगवंतासाठी मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने घेऊन गेला. आणि भगवंताने सुद्धा मोठ्या आवडीने ते खाल्ले. विदुराघरच्या कण्या भगवंताला प्रिय होत्या. दुर्योधनाकडचे पंचपक्वान्नांचे भोजन त्याने नाकारले. श्रीरामाने शबरीने दिलेली बोरे मोठ्या आनंदाने खाल्ली. कारण बोरे उष्टी असली तरी शबरीचा भोळा भाव महत्वाचा होता. भगवंत भावाचा भुकेला आहे.
म्हणून भगवंताला समर्पण करताना आपले कष्टाचे, स्वतःचे अर्पण करावे, कष्ट आणि भाव यांचा समर्पण करताना संगम व्हावा. काही वर्षांपूर्वी मी भूतानला गेलो होतो. त्या ठिकाणी बुद्धाची विशाल आणि सुंदर मंदिरे आहेत. त्या ठिकाणी बुद्धमूर्तींसमोर लोकांनी त्यांना जे काही अर्पण करायचे ते ठेवले होते. एका मोठ्या भांड्यात लोकांनी अर्पण केलेल्या नोटा, नाणी यांचा खच पडला होता. हजारो रुपये उघड्यावर असून कोणीही हात लावत नव्हते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला कोणती आढळली असेल तर ज्याची जी ऐपत, ती वस्तू तो त्या ठिकाणी अर्पण करीत होता. कोणी पाच रुपयांचा उदबत्तीपुडा अर्पण केला होता, तर कोणी रुपया दोन रुपयांचा बिस्कीटपुडा. बुद्धाच्या चेहऱ्यावर अपूर्व प्रसन्नता आणि शांती विलसत होती. बुद्ध नेहमीच प्रसन्न आणि शांत असतो. तसेच परमेश्वराचेही आहे. तोही नेहमी प्रसन्न आणि शांत असतो. तुमचे समर्पण जसे असेल, त्याच्यातील भावना जेवढी प्रामाणिक आणि निर्मळ असेल, तशी ती त्याच्यापर्यंत पोहोचेल. आणि ती प्रसन्नता, ती शांती शतपटीने वाढून तुमच्यापर्यंत परत येईल.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा