मुख्य सामग्रीवर वगळा
उगवतीचे रंग

जगण्याचे भान देणारी गाणी ...


मी शाळेत काम करत असताना परीक्षा झाल्या की पेपरचे गट्ठे माझ्याकडे तपासण्यासाठी येत असत. तासनतास ते तपासण्यासाठी बैठक मारावी लागत असे. अशा वेळी संगीत माझ्या मदतीला येई. माझी आवडती गाणी ऐकता ऐकता ते काम सहज होऊन जाई . गृहिणी स्वयंपाक करीत असताना देखील बऱ्याच वेळेला संगीताच्या सुरात सूर मिसळून आपले काम करीत असतात. त्यांचा स्वयंपाक मग सहज होऊन जातो. गाण्यांच्या सुरातली गोडी मनात भिनते, गाण्याची लय काम करताना हाताचा ताबा घेते. आणि एकूणच प्रसन्न वातावरणात या सगळ्या मधुर सूर, ताल आणि लय यांचा संगम होऊन ती गोडी अन्नात उतरते. खाणाऱ्यांच्या मनापर्यंत पोचते. अशी ही गाण्यातली जादू.

पण कधी कधी मन उदास झालेले असते. आपल्याला जीवनातल्या रोजच्या समस्यांनी हैराण केलेले असते. प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. निराशा निश्चितच नसते. पण तरीही एक अनामिक उदासी भरून राहिलेली असते. ' तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मै ..' अशा सारखी अवस्था येते. ही अवस्था तुम्ही, मी सगळ्यांनी कधी ना कधी तरी अनुभवलेली असते. अशा वेळी संगीत आपल्या मदतीला येते. कोणाला शास्त्रीय संगीत आवडते , कोणाला नाट्य तर कोणाला भाव किंवा भक्तिगीत . संगीत कोणतेही असो, पण त्यात जादू मात्र आहे. आपल्या मनाला उभारी देण्याचे, मरगळ घालवण्याचे आणि नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य संगीतात आहे.  एरव्ही सुद्धा आपण आपले काम करत असताना बरेचदा गाणी ऐकत असतो. आपल्याला आवडणारी अशी गाणी ऐकता ऐकता काम पण सहज होत असते. जनाबाई तर ' दळीता कांडिता, तुज गाईन अनंता ' असे म्हणतात.

 जगण्याचे भान देणारी गाणी खूप आहेत. ही गाणी आपला उदास मूड घालवतात, प्रसन्नतेचा शिडकावा करतात आणि जगण्याचे बळही देतात. आज तुमच्याशी मला आवडणाऱ्या अशाच एका गाण्याबद्दल बोलणार आहे. हे गाणे आहे अभिषेकी बुवांनी गायिलेले. ' माझे जीवनगाणे. ' या गीताचे शब्द आहेत माझे आवडते कवी आणि गीतकार मंगेश पाडगावकर यांचे. आणि संगीत आहे पु ल देशपांडे यांचे. अभिषेकी बुवांचा जादुई सूर, पाडगावकरांचे अर्थघन शब्द आणि पुलंचं संगीत यांचा त्रिवेणी संगमच जणू. आपण काय करायचं अशा वेळी ? तर या सुरनदीत स्वतःला झोकून द्यायचं आणि चिंब भिजायचं.

असं म्हणतात की अभिषेकी बुवांनी गायनाच्या विविध घराण्यांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या गायनातही नैसर्गिकपणे त्यांच्या अभ्यासाचे प्रत्यंतर येते. ' माझे जीवनगाणे ' ऐकताना पं जितेंद्र अभिषेकींचे स्वर जेव्हा कानावर पडतात, तेव्हा कानातून ते थेट मनात उतरतात, रक्तात भिनतात . पाडगावकरांचे अर्थवाही शब्द आणि पुलंचं संगीत आपल्याला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात.

कधी विचार केला का हे गाणं ऐकताना की या गाण्यात केवढी स्थितप्रज्ञता आहे !

व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे,
माझे जीवनगाणे.

परिस्थिती कशीही असो. व्यथा असो किंवा आनंद. प्रकाश असो वा मनाला घाबरावणारा समस्यांचा घनघोर अंधार. कदाचित वाटचाल करताना समोरची वाट दिसणार नाही. पण निर्भयपणे वाटचाल करीत राहायची आहे. कशी ? रडतकढत ? नाही. तर गात पुढे मज जाणे. निःशंक , निर्भय मनाने पुढील वाटचाल करीत राहायची आहे. निसर्गात, मनात, झऱ्यात संगीत भरलेले आहे. ते आपल्या तनामनात उतरवायचे. या संगीताच्या सुरांवर पक्षांसोबत आनंदाचे गाणे गात विहार करायचा आहे. ' गीत गाता चल ओ साथी, गुनगुनाता चल ' जीवन म्हटले की ताणतणाव, समस्या, दुःख, चिंता असणारच ! ते कोणाला चुकले आहे. अशा वेळी ' निःशंक हो, निर्भय हो मना  रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे 'अशी स्वामींवर, जीवनावर प्रगाढ श्रद्धा असली की वाटचाल सुकर होते. जीवनगाणे हे आनंदगाणे होते. असे हे जगण्याचे भान देणारे गाणे. आणखी काही गाण्यांबद्दल पुढील वेळेला.

                  ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

  1. हो सर अगदी बरोबर संगीत हा घटक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहेच, संगीताशिवाय आपली दुनिया अधुरीच म्हणता येईल, आपल्याला कितीही कंटाळा किंवा आळस आला असेल तर एखादे आवडीचे संगीत ऐकल्याने आपला कंटाळा कुठच्या कुठं पळुन जातो, आपल्या लेखाने मला ही एक संगीत आठवले 'का रे दुरावा'मंगेश पाडगावकर यांनी केलेलं हे संगीत खुपच छान

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...