उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७५
समस्तामध्ये सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ।
जिवा संशयो वाउगा तो तजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७५।।
अर्थ
परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नाम हेच सार ( उत्कृष्ट साधन ) आहे. जर हे समजत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, उपनिषदे आणि संतांची वचने यांचा अभ्यास करून पहा. भगवंताच्या नामाबद्दल विनाकारण येणाऱ्या संशयाचा त्याग कर. पहाट समयी भगवंताचे चिंतन कर.
( समस्तामध्ये - भगवंत प्राप्तीच्या साधनांमध्ये, सार - महत्वाचे/शाश्वत सत्य, साचार - खरोखरच /आचरणात आणण्याजोगे, वाउगा -व्यर्थ/निरर्थक, तजावा - त्याग करावा )
विवेचन
समर्थ पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाची महती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी इतर साधनांपेक्षा रामनाम हे घेण्यासाठी किती सोपे आहे हे समजावून सांगितले. या श्लोकात ते म्हणतात की रामनाम हेच सार आहे. बाकी सर्व असार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " सार सार सार विठोबा, नाम तुझे सार, म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार." बा विठ्ठला, तुझे नाम हेच एक सार आहे. म्हणून तर प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्याचा वारंवार जप करीत असतात.
फळे जमिनीतील पाणी, जीवनसत्वे शोषून घेतात. फळातून ते सार आपल्यापर्यंत पोचवतात. नदी पर्वतातील गाळ, कचरा इ. वाहून आणते पण गोड पाणी आपल्यापर्यंत पोचवते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याची वाफ होते. मेघ आपल्याला जीवनदायी जलधारांचा वर्षाव करतात. आपले शरीर देखील आपण खाल्लेल्या अन्नातील सार शोषून घेते. असार आहे ते बाहेर टाकते. निसर्गातील सर्वच घटक अशा प्रकारे सार ग्रहणाचे कार्य करीत असताना आपल्याला दिसतील. त्याप्रमाणेच ज्याने हे विश्व निर्माण केले, त्याचे नामच सर्व सार आहे. नामातच त्याचा वास आहे. तेच नाम आपणही घ्यावे. पण आपण मात्र असार असलेला हा संसार खरा मानून सारभूत असलेले भगवंताचे नाम घेत नाही.
पण नामाचा महिमा वारंवार सांगूनही काही लोकांना पटत नाही. अशा लोकांना समजावणे अवघड असते. स्वतः शोध घेतल्याशिवाय त्यांची खात्री पटत नाही. त्यांच्या मनात अपार शंका असतात. यांना सांगायला काय जाते ? नुसत्या नामामध्ये एवढे सामर्थ्य असणे कसे काय शक्य आहे ? नुसते नाम घेऊन काय होणार आहे ? कशाला त्यात वेळ घालवायचा ? अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की माझे बोलणे तुम्हाला खरे वाटत नसेल तर स्वतः खात्री करून घ्या. विविध ग्रंथ, पुराणे, वेद, उपनिषदे अभ्यास. संतांच्या वचनांचे वाचन करा. हे सगळे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे ग्रंथ, पोथ्या पुराणे एकमुखाने भगवंताच्या नामाचा उद्घोष करीत आहेत. सर्व संतांनी देखील नामाचा महिमा एकमुखाने गायिला आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा आपल्या मनातील व्यर्थ शंकांचा त्याग करा. सर्व संशय टाकून द्या. ' संशयात्मा विनश्यति ' असे म्हणतात. तेव्हा परमेश्वराचे नाम हेच सर्व सार असल्याची जेव्हा खात्री होईल तेव्हा सगळ्या शंका टाकून देऊन निःशंक मनाने भगवंताचे नाम घ्या. कवी अशोक परांजपे आपल्या एका सुंदर गीतात म्हणतात
नाम आहे आदि अंती, नाम सर्व सार ।
आहे बुडत्याला नौका ठेवली जीवनी आधार ।।
या गीताच्या शेवटच्या कडव्यात ते म्हणतात
नाम जपो वाचा नित्य श्वासांतही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म
असे आपलेही कर्म नाममय व्हावे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
वायां आणिका पंथा जासील झणीं ॥
म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की प्रभात समयी भगवंताचे चिंतन करावे. म्हणजे दिवसभर त्याचे स्मरण राहते.
स्वसंवाद
१. निसर्गातील प्रत्येक घटक जर केवळ 'सार' ग्रहण करत असेल, तर मी मात्र संसारातील 'असार' (क्षणभंगुर) गोष्टींनाच आयुष्यभराचे सत्य मानून त्यात गुंतलो आहे का?
२. भगवंताच्या नामाबद्दल किंवा भक्तीबद्दल माझ्या मनात नकळत काही 'वाउगा' (व्यर्थ) संशय किंवा तर्क-वितर्क येत राहतात का?
३. सर्व संतांनी आणि श्रेष्ठ ग्रंथांनी ज्या नामाला 'जीवनाचा आधार' म्हटले आहे, त्या नामाचा अनुभव मी स्वतः कधी निःशंक मनाने घेऊन पाहिला आहे का?
४. माझे नित्य कर्म 'नाममय' व्हावे यासाठी मी रोजच्या धावपळीत किती जागृत राहतो?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा