मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ७१

 उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७१

जयाचेनि नामें महादोष जाती ।

जयाचेनि नामें गती पाविजेती ।

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७१।।

अर्थ 

भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे. 

( महादोष - मोठमोठी पापे/पातके/दोष, गती - अवस्था/मुक्ती/मोक्ष )

विवेचन 

भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान ( दारू )करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद आणि ऋषींच्या उपदेशामुळे त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला. आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन त्याने रामनामाचा आश्रय घेतला. रामनामाची जादू एवढी मोठी आहे की वाल्या कोळ्याचे रूपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. रामायणासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून ते जगासाठी वंदनीय ठरले. 

रामनामामुळे गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात येणे यासारखे भाग्य नाही. ' अंते मती सा गती: ' असे म्हटले जाते ते यामुळेच. शेवटचा दिस गोड व्हावा असे तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ हाच आहे. पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी माणसाच्या मुखात अचानक रामनाम येत नाही. त्यासाठी सतत मनाने भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय असावी लागते. ही सवय असेल तरच अंतकाळी भगवंत आठवतो. 

समर्थ तिसऱ्या ओळीत म्हणतात की नामाच्या योगाने पुण्यठेवा घडतो म्हणजे वाढतो. बँकेतील आपल्या खात्यात आपण बचत म्हणून थोडे थोडे पैसे टाकत राहतो. यात सातत्य असले तर ही पुंजी वाढत जाते. मुद्दलावरही व्याजही लागू होते. रामनाम ही तर अत्यंत मौल्यवान ठेव ! थोडीथोडी जमा करत गेलो की पुण्यसंचय वाढत जातो. संत मीराबाई म्हणतात," पायो जी मैने रामरतन धन पायो..." हे असं अमोलिक धन आहे की " खर्च न खुटे, चोर न लुटे." इतर धन खर्चल्याने संपतं. पण याची महती काही वेगळीच. हे तर दिवसेंदिवस वाढतच जातं. विशेष म्हणजे हे धन असं आहे की याला चोरही लुटू शकत नाही. सातत्याने रामनाम घेणाऱ्याचा पुण्यसंचय वाढतच राहतो. 

नामस्मरणाने वासनांचा क्षय होतो. म्हणजे भगवंत प्राप्तीखेरीज इतर वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात. शेवटी केवळ भगवंत प्राप्तीची इच्छा उरते. आपल्या पुण्यसंचयानुसार ती या जन्मी किंवा पुढील जन्मी भगवंत नक्की पूर्ण करतो. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन कर. दिवसभरही त्याचे नित्य स्मरण ठेव. हे नाम तुला मोक्षाकडे घेऊन जाईल. 

स्वसंवाद 

१. मी रोज माझ्या बँक खात्यातील शिल्लक (Balance) तपासतो, पण माझ्या खात्यात 'पुण्यठेवा' किंवा रामनामाची पुंजी किती जमा होत आहे, याचा हिशेब ठेवतो का ?

२. "शेवटचा दिस गोड व्हावा" असे मला वाटते, तर मग शेवटच्या क्षणी ते नाम सहज मुखात यावे म्हणून मी आजपासूनच अंतःकरणाला तशी सवय लावत आहे का? 

३. माझ्या हातून कळत-नकळत होणारे छोटे-मोठे दोष किंवा वाईट विचार दूर व्हावेत म्हणून  मी नामस्मरणाचा आधार घेतो का? 

४. मीराबाईंनी म्हटल्याप्रमाणे, मला हे 'अमोलिक धन' मिळवण्याची खरी आस लागली आहे का की अजूनही चोरांनी लुटल्या जाणाऱ्या नश्वर धनामागेच धावत आहे ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२०/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या