उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३६
सदा सर्वदा देव सन्निध आहे |
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे|
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३६|
अर्थ
परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही.
( सन्निध - समीप/जवळ, अल्प धारिष्ट - परीक्षा/कसोटी, कैवल्य - मोक्ष )
विवेचन
आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समीप असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.
असे जर आहे तर मग आपल्याला त्याचे अस्तित्व का जाणवत नाही ? आपली देहबुद्धी एवढी प्रबळ असते की त्यामुळे हा देह म्हणजे मी नाही आणि आपल्या अंतरात्म्यात त्याचा वास आहे हे आपल्याला जाणवतच नाही. सकाळी उठल्यानंतर आपण " कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्" हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्या अंतर्यामी परमेश्वर वसतो आहे.
आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही परंतु साधकांना मात्र पदोपदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण आपले मूळ स्वरूप विसरल्यामुळे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. परंतु तुकाराम महाराजांसारखे संत ईश्वर चिंतनातच रममाण झालेले असल्यामुळे त्यांना स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. परमेश्वर कायम आपल्याबरोबरच आहे याची जाणीव त्यांना होत असते. म्हणूनच ते म्हणतात
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |
चालविशी हाती धरुनिया ||
परंतु परमेश्वराची अशी कृपा होण्याआधी तो आपली परीक्षा पाहतो. ही परीक्षा पाहण्यामागे आपल्या भक्ताला मानसिक दृष्ट्या खंबीर करावे, आपल्या कृपेसाठी पात्र करावे अशीच सध्या भगवंताची इच्छा असते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. पण कधी कधी त्याचे धरलेले बोट सोडून देते. एखादेवेळी तो पडेल हे तिला माहिती असते. परंतु त्याला स्वतःला चालता यावे, तो स्वावलंबी व्हावा म्हणून ती हे करत असते. अनेक संतांनी सुद्धा आपल्या अनुयायांना अनुग्रह देण्यापूर्वी त्यांची परीक्षा पाहिली आहे. आपल्या कृपेसाठी आपला शिष्य पात्र आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच गुरु त्याच्यावर कृपा करतात. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पण ज्याला पुढे जायचे आहे तो अशा प्रकारच्या परीक्षांना, संकटांना न डगमगता सामोरा जातो.
तसेच भगवंताच्या एकनिष्ठ भक्ताचे आहे. "देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो" अशी त्याची वृत्ती असते. खरा भक्त संकटप्रसंगी डगमगत नाही. परमेश्वरावरील त्याची श्रद्धा अविचल असते. परमेश्वराचा भक्त असलेल्या छोट्या प्रल्हादावर अनंत संकटे येतात. परंतु तरीदखील परमेश्वरावरील त्याची श्रद्धा ढळत नाही. मागील श्लोकात समर्थ आपल्याला जी अनन्यभक्ती सांगतात ती हीच !
अशी आपली त्याच्यावर संपूर्ण निष्ठा असली आणि त्याने घेतलेल्या परीक्षेत एकदा का आपण उत्तीर्ण झालो की मग त्याच्या कृपेचे जणू भांडारच खुले होते ! अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी भक्ताची अवस्था होते. सुख, समाधान, आनंद आणि कैवल्य म्हणजे मोक्षमार्गाचा दाता असलेला परमेश्वर आपल्याला या सर्व गोष्टी सहजच प्रदान करतो.
स्वसंवाद
१) "परमेश्वर अंतर्यामी आहे" हे मी जाणतो पण माझ्या दैनंदिन जीवनात मला त्याची प्रत्यक्ष जाणीव होते का ?
२) आईने बोट सोडले तरी ती दूर नसते. माझ्या संकटकाळात परमेश्वराबद्दल अशी भावना माझी असते का ?
३) परमेश्वर परीक्षा पाहतो हे मान्य आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांकडे मी त्या दृष्टीने पाहतो का ?
४) "अनंत हस्ते" देणारा भगवंत आहे. मग मी त्याच्याकडे क्षुल्लक गोष्टींचीच मागणी करत राहतो का ?( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा