उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३१
महा संकटी सोडिले देव जेणे|
प्रतापे बळें आगळा सर्वगूणें|
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी|
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३१|
अर्थ
सर्व देवांवर जेव्हा अत्यंत कठीण संकट आले तेव्हा प्रभू रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. असा तो श्रीराम पराक्रमाने, बळाने आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. असा हा दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या दासाची म्हणजेच भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही.
विवेचन
मागील श्लोकात भगवंताचे सेवक असलेल्या व्यक्तीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही असे समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात तो भगवंत कसा श्रेष्ठ आहे ते सांगताना त्याच्या गुणांचे किंवा चरित्राचे गुणवर्णन समर्थ करतात.
रावण हा महापराक्रमी होता परंतु आपल्या सामर्थ्याचा त्याने दुरुपयोग केला आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवांनाही बंदिवान केले. हे म्हणजे देवांवर आलेले मोठे संकट होते. श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका केली, अनितीने वागणाऱ्या रावणाचा वध केला आणि त्याच्या बंदीवासात असलेल्या देवांना मुक्त केले. असा हा राम महाप्रतापी आणि महाबलशाली आहे.
समर्थ रामाचे वर्णन करताना म्हणतात," आगळा सर्वगुणें..."म्हणजे भगवंत सर्व गुणसंपन्न तर आहेच परंतु अनेक परस्परविरोधी गुण त्याच्या व्यक्तिमत्वात एकवटले आहेत. तो जसा महापराक्रमी आणि शूरवीर आहे, त्याचवेळी तो भक्तवत्सल आहे. शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाणारा आहे, आपला भक्त असलेल्या पुंडलिकासाठी युगानुयुगे वीटेवर उभा राहणारा आहे, जनाबाईला दळण दळू लागणारा आहे, नाथांघरचे पाणी भरणारा आहे. अशी त्याची किती रूपे वर्णावी !
त्याचप्रमाणे देवांवर जेव्हा संकट आले त्या त्यावेळी विष्णूने अवतार धारण करून देवांचे रक्षण केले आहे. पुराणातून अशा प्रकारच्या कथा आपण नेहमीच वाचतो. जेव्हा जेव्हा देवांवर संकट येत असे तेव्हा तेव्हा सर्व देव इंद्राच्या नेतृत्वाखाली श्रीविष्णूकडे आश्रय मागण्यासाठी जात असत आणि मग तो वेगवेगळे अवतार धारण करून त्यांचे रक्षण करीत असे.
विष्णू हा जगाचा पालन कर्ता आहे. ब्रह्मदेव हा जन्म देणारा आहे आणि भगवान शिव संहार करणारा आहे. पालन करणारा हा नेहमी जन्म देणाऱ्या आणि संहार करणाऱ्या पेक्षाही श्रेष्ठ असतो. यशोदेने श्रीकृष्णाचे पालनपोषण केले, त्याच्यावर संस्कार केले म्हणून जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा श्रीकृष्णाची माता म्हणून यशोदेला आधी मान मिळतो. मुलांना जन्म देणे सोपे असते परंतु पालक होणे मात्र कठीण! काही लोक मुलांना जन्म देऊन सोडून देतात परंतु जे लोक अशा अनाथ मुलांना आई-वडिलांची माया देतात, त्यांचे पालनपोषण करतात ते माता पिता श्रेष्ठ होत. कुंतीने कर्णाला जन्म देऊन सोडून दिले परंतु धृतराष्ट्राचा सारथी असलेल्या अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाचा सांभाळ मोठ्या प्रेमाने केला. म्हणूनच तो राधेय म्हणून ओळखला जातो.
अशाप्रकारे संपूर्ण जगाचे पालनपषण करणारे श्रीविष्णू किंवा श्रीराम श्रेष्ठ आहेत. प्रत्यक्ष पार्वती म्हणजे शैलजा आणि शूलपाणी म्हणजे भगवान शंकर हे देखील त्याचे स्मरण करतात एवढा तो श्रेष्ठ आहे. रामनामाचा महिमा प्रत्यक्ष शंकर पार्वतीला वर्णन करून सांगतात. तेव्हा महापराक्रमी, महाबलशाली आणि सर्व गुणांनी संपन्न असलेला हा भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही. हे लक्षात घेऊन आपणही त्याचेच स्मरण नित्य केले पाहिजे.
स्वसंवाद
१) देवांनाही संकटे येतात आणि ते परमेश्वराचा आश्रय घेतात मग मी माझ्या संकटात त्याचा आश्रय घेण्यास का संकोचतो ?
२) पालनकर्ता हा जन्म देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो मग माझे खरे पालन करणारा कोण आहे हे मी ओळखले आहे का ?
३) प्रत्यक्ष शंकर-पार्वती रामाचे स्मरण करतात. माझ्या दिनक्रमात त्याचे स्मरण कितीपत होते ?
४) भगवंत "आगळा सर्वगुणें" आहे. माझ्या जीवनात मी कोणत्या गुणांचा आदर्श त्याच्याकडून घेतो आहे ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा