उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २८
दिनानाथ हा राम कोदंडधारी |
पुढे देखता काळ पोटी थरारी |
जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |२८|
अर्थ:
श्रीराम हा दीनांचा कैवारी/रक्षणकर्ता आहे. धनुर्धारी रामाला समोर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काळ म्हणजे यमराजाला देखील धडकी भरते. हे वाक्य सत्य समजा की भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आणि त्याचे रक्षण करणारा आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही.
( कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला, वाक्य - वचन, नेमस्त - निश्चितपणे )
मागील श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी म्हणजे प्रपंचाच्या भीतीने हे मानवा तू का घाबरतोस ? या श्लोकात ते भगवंत आपला रक्षणकर्ता कसा आहे आणि तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करीत नाही हे समर्थ निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवतात. त्यासाठीच भगवंत आपल्या दासाची/भक्ताची उपेक्षा करीत नाही हे सांगणारे ( नुपेक्षी कदा राम दासाभिमानी )हे पालुपद असलेले बरेच श्लोक आहेत.
मनुष्य अनेक अर्थाने दुबळा किंवा परावलंबी असतो. संकटप्रसंगी त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. कधी कधी हा आधार तो आपल्या नातलगांमध्ये किंवा मित्रांमध्ये शोधत असतो. परंतु या सगळ्याच गोष्टी बेभरवशाच्या असतात. परिस्थिती फिरली की ही मंडळी सुद्धा पाठ फिरवतात. पैसा सुद्धा सर्वप्रसंगी उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून संत आपल्याला कळकळीने सांगतात की आधार हा एकमेव परमेश्वराचाच असला पाहिजे कारण सर्व परिस्थितीत तोच आपल्याला साथ देईल. तो दीनानाथ आहे.
आपल्याला नुसता कोणाचातरी आधार आहे ही जाणीव सुद्धा खूप मानसिक बळ देणारी असते. स्वामी समर्थांच्या फोटोखाली," भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे वचन लिहिलेले असते. हे वचन लाखो भक्तांना जगण्याची शक्ती देते. स्वामी प्रत्यक्ष आपल्या पाठीशी आहेत या भावनेतून भक्त कठीण प्रसंगातूनही तरुन जातो. गीतेतील नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।जो भक्त निष्ठेने आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी उपासना करील त्याचे मी रक्षण करतो.
आजकाल बरीच शिकलेली मंडळी माझा देवावर विश्वास नाही असे म्हणत असतात आणि त्याचे निरनिराळ्या प्रकारे समर्थन करीत असतात. आपण आस्तिक म्हणून जगायचे की नास्तिक म्हणून जगायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अशा मंडळींनी आस्तिक लोकांचा बुद्धिभेद करून त्यांच्या जगण्याचा आधार काढून घेऊ नये. ईश्वराला विज्ञानाच्या कसोटीवर अनुभवता येत नाही. त्याची अनुभूती श्रद्धेच्या कसोटीवर घेता येते ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी त्याच्यावर दृढ श्रद्धा असावी लागते, निष्ठा असावी लागते. त्या भावनेने जोपर्यंत आपण त्याची भक्ती करीत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही.
समर्थांना प्रिय असलेला आणि त्यांचे आराध्य दैवत असलेला राम हा कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला आहे. त्याच्या नुसत्या धनुष्याच्या टणत्काराने काळ देखील थरारतो. तो दीनांचा, दुःखितांचा रक्षण करणारा आहे. दासाभिमानी आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. आपण त्याचे प्रिय भक्त व्हायला हवे. त्याचा प्रिय भक्त कोण ? तर जो आपले नेमून दिलेले काम निष्ठेने करतो आणि काम करताना त्याची आठवण ठेवतो, जमेल तेवढे नामस्मरण करतो अशी कोणतीही व्यक्ती ! त्यासाठी कोणी तपस्वी, साधुसंत, बैरागी असले पाहिजे असे नाही. सामान्य माणूस देखील भगवंताचा प्रिय भक्त होऊ शकतो. फक्त आपली त्याच्यावर दृढ श्रद्धा हवी.
संकटातून परमेश्वर आपले रक्षण करतो असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ संकटांशी सामना करण्याची शक्ती तो आपल्याला देतो आणि त्याच्या कृपेनेच हा भवसागर आपण तरुन जातो असा आहे. तेव्हा हे मना, तू अन्य सगळे आधार सोडून केवळ एका रामावर श्रद्धा ठेव. तोच तुझे कल्याण करील. जेव्हा आपल्याला आतून जाणवते की एक दिव्यशक्ती आपल्या सोबत आहे, तेव्हा चिंता, राग, भविष्याची भीती यासारख्या गोष्टी आपोआपच कमी होतात. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, आपल्याजवळ आहे ही अनुभूती आली की माणूस कोणत्याही संकटांना सहजपणे तोंड देऊ शकतो.
स्वसंवाद
१) मी खरोखरच परमेश्वराला अंतिम आधार मानतो का ? की पैसा, मित्र नातेवाईक हेच अंतिम प्रसंगी उपयोगी पडतील असे मला वाटते ?
२) संकटसमयी देवावरील माझा विश्वास डळमळतो का की अधिक दृढ होतो?
३) “राम दासाभिमानी आहे” या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे का ?
४) मी परमेश्वराला केवळ सुखात आठवतो की दुःखातही त्याच्यावर भार टाकतो ? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा