उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २७
भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ।
रघुनायकासारिखा स्वामी शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।
अर्थ :
हे मना, एखाद्या भित्र्या माणसासारखा तू प्रपंचाला का घाबरतोस? भीती सोडून धैर्य धारण कर. कारण तुझ्या पाठीशी रघुनायकासारखा स्वामी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अगदी यमाचा कोप झाला तरी तो तुला कधीही सोडणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही.
(भव – प्रपंच, लंडी – भित्रा/कमजोर मनाचा, दंडधारी – यम)
विवेचन :
मानवी जीवन हे अनेक अनिश्चिततांनी भरलेले आहे. उद्या काय होईल याची चिंता, नोकरीची काळजी, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा असंख्य विचारांनी मन व्यापलेले असते. त्यामुळे माणूस आतून अस्वस्थ आणि भयग्रस्त होतो.
प्रपंचाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या भीतीने खचून जाणे योग्य नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला धीर देतात
“धरी रे मना धीर, धाकासि सांडी”
हे मना, तू भीती झटकून टाक आणि धैर्याने उभा रहा.
आपले जीवन हे जर एक रणांगण मानले, तर या रणांगणावर शूरवीराप्रमाणे लढणे आवश्यक आहे. हातात तलवार किंवा बंदूक आहे पण हात पाय कापताहेत, तर लढाई कशी लढणार ? शत्रूसाठी मग तुम्ही सोपे लक्ष्य असाल. मनात भीती असेल तर विजय शक्य नाही.
संकटेही अशीच असतात. आपण त्यांना जेवढे घाबरतो, तेवढी ती अधिक मोठी वाटतात. धैर्याने सामना केला, तर ती हळूहळू नाहीशी होतात.
या संदर्भात स्वामी विवेकानंद यांच्या बालपणातील प्रसंग अत्यंत बोलका आहे. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र. ते अत्यंत अवखळ आणि खोडकर होते. ते झाडावर चढत. आईला असे वाटले की झाडावर चढून हा खाली पडला तर त्याला इजा होईल. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना झाडावर चढू नकोस. तिथे ब्रह्मराक्षस राहतो असे सांगितले. पण नरेंद्राने आईला विचारले, "ब्रह्मराक्षस ? कुठे आहे तो मला त्याला पाहायचेच आहे.?" ब्रह्मराक्षस प्रत्यक्षात नव्हताच. आपली मनच अशा गोष्टींची निर्मिती करते. म्हणूनच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे आपण म्हणतो.
समर्थ पुढे आपल्याला एक मोठा आधार देतात
रघुनायकासारखा स्वामी आपल्या पाठीशी आहे.
राम म्हणजे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाही, तर तो धैर्य, धर्मनिष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. वाल्यासारख्या बलाढ्याला संपवणारा, रावणासारख्या अहंकारी व्यक्तीचा नाश करणारा हा राम सज्जनांचा त्राता आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात
प्रत्यक्ष यम जरी कोपला, तरी राम तुला कधीही सोडणार नाही. तुझी उपेक्षा करणार नाही. याचा अर्थ असा नाही की की श्रीरामांना शरण जाण्यामुळे आपला मृत्यू टळणार आहे. मृत्यू तर अटळ आहे परंतु श्रीराम आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो तेव्हा मृत्यूची भीती कमी होते. संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते.
शेवटी, भय, आनंदी आणि धैर्याचे जीवन जगण्यासाठी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की श्रीरामावर (भगवंतावर) श्रद्धा ठेवा, धैर्य धरा आणि निर्भयपणे जगायला शिका. श्रीराम तुमच्या पाठीशी आहेतच.
स्वसंवाद
• मी माझ्या आयुष्यातील समस्यांना धैर्याने सामोरे जातो का, की त्यांना घाबरून जातो?
• माझी भीती वास्तव आहे की ती माझ्या मनाने निर्माण केली आहे ?
• संकटांच्या वेळी मला ईश्वरावर खरोखर विश्वास वाटतो का?
• माझ्या मनातील श्रद्धा आणि धैर्य वाढवण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे,चाळीसगाव.
२१/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा. )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा