मुख्य सामग्रीवर वगळा
उगवतीचे रंग

अद्भूत, अदम्य, अनुपम, अनुकरणीय... !


मंजिल उन्हीको मिलती हैं जिनके सपनोमें जान होती हैं 
पंखोसे कुछ नहीं होता, हौसलोंसे उडान होती हैं  ।।

या ओळींचा प्रत्यय यावा अशी बातमी रविवार दिनांक ४मे २०२५ च्या लोकसत्तेत वाचायला मिळाली आणि आश्चर्याला पारावर राहिला नाही. अशी कोणती बातमी होती ती ? ती बातमी होती अमूर फाल्कन या पक्ष्याबद्दल. मूळचा सैबेरियातील अमूर नदीकाठचा हा पक्षी. म्हणून अमूर फाल्कन ! कबूरतरापेक्षा किंचित मोठा. रंग राखाडी आणि लाल रंगाचे पाय नर आणि मादी यांच्या दिसण्यात किंचित फरक केला आहे. शिकारी पक्षांमधील सर्वात लांब स्थलांतर करणारे हे पक्षी ! 

 सैबेरियातून प्रचंड अंतर पार करून भारतात हा पक्षी येतो. या पक्ष्याला भारतीय वन्यजीव संस्थेने उपग्रह टॅगिंग केले होते. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती मिळणे शक्य झाले. सहनशक्ती आणि उल्लेखनीय पराक्रमासाठी ओळखला जाणारा हा पक्षी सोमालियाहून अवघ्या ९३ तासात ३८०० किमीचे अंतर पार करून भारतात परतला. या बातमीत पुढे म्हटले आहे की या पक्ष्याने एवढ्या मोठ्या प्रवासात कुठेही न थांबता सरासरी ४१ किमीचा ताशी वेग कायम राखला. म्हणजे जवळपास चार हजार किमीचे अंतर या पक्ष्यांनी सलगपणे कापले होते. दरवर्षी हजारोंच्या संख्येने हे परदेशी पाहुणे आपल्या देशात मणिपूर आणि नागालँडमध्ये येतात. आणि उत्तरेकडे प्रयाण करण्यापूर्वी येथे थोडी विश्रांती घेतात. मणिपूर आणि नागालँड म्हणजे जणू त्यांचे इंधन भरण्याचे ठिकाण ! 

हे सगळं वाचून मला आठवलं डॉ रिचर्ड बाख यांचं ' जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल ' हे सुंदर पुस्तक. या पुस्तकाचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे. विक्रमी खपाचे केवळ शंभरेक पानांचे हे पुस्तक अक्षरशः झपाटून टाकते आणि एका वेगळ्या अद्भुत अनुभवाचे आपण साक्षीदार होतो. पांढराशुभ्र बंगल्यासारखा दिसणारा ' जोनाथन ' हा समुद्रपक्षी या कथेचा नायक. समुद्राच्या किनाऱ्यावर असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला आढळतात. वेगवेगळ्या जातींचे आणि रंगांचे. पण हे सगळे समुद्रपक्षीच ! या सगळ्या समुद्रपक्ष्यांचे एक वैशिष्ट्य मात्र समान आहे. ते समुद्राच्या पृष्ठभागालगत लाटांच्या वर उडतात. उडत उडता आपलं भक्ष्य म्हणजे समुद्रातील मासे दृष्टीपथात आलं की त्यावर अचूक झडप घालून ते मटकावतात. पण हे समुद्रपक्षी फारसे उंच मात्र उडू शकत नाहीत. साधारणत: समुद्रपक्ष्यांचं जगणं साधं, सरळ असतं. दोन वेळेच्या खाण्यासाठी धडपडणं, पोट भरणं, पिल्लांना जन्म देणं इतकंच. छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडणं, तंटे करणं किंवा कळपाकळपाने राहणं. हेच त्याचं रुटीन जगणं असतं; पण जोनाथन मात्र वेगळा असतो या सर्वांमध्ये. आकाशात भरारी घेणं ही त्याची आवड नव्हे तर पॅशन असते. त्यात त्याला अपरिमित आनंद मिळत असतो. तो त्याच्यासाठी स्वर्गीय
अनुभव असतो. आपलं उडणं अधिकाधिक निर्दोष व परिपूर्ण व्हावं यासाठी तो झटत असतो. त्याला गाठायचा असतो परिपूर्णतेचा स्वर्ग ! त्याच्या या प्रवासाची ही कथा. समाजात दोन प्रकारची माणसं असतात. आपल्या आखून दिलेल्या मार्गानं वाटचाल करणारी आणि चाकोरीबद्ध जीवन जगणे नाकारून काहीतरी वेगळं करू पाहणारी. अशा या दुस-या क्रमांकाच्या माणसांना असतो ध्यास परिपूर्णतेचा. ती स्वप्नं पाहतात, कल्पना करतात. आऊट ऑफ द वे जाऊन विचार करतात आणि स्वप्नांचा पाठलाग करतात. हे करताना त्यांना सापडतो अर्थ जगण्याचा. जो केवळ ‘त्यांचा’ असतो. कोणी तरी उसना दिलेला किंवा सांगितलेला नसतो. ते जे जगतात ते त्यांना सापडलेले, पटलेले नियम घेऊन. जोनाथन त्यातीलच एक ! 

 केवळ समुद्राच्या पृष्ठभागालगत उडणे आणि मासे पकडून पोट भरणे एवढेच जोनाथनला मंजूर नाही. त्याची दृष्टी त्यापलीकडे पाहणारी आहे. आकाशात उंच झेप त्याला घ्यायची आहे. आपल्याला जे पंख दिले आहेत, ते केवळ समुद्रालगत उडून पोट भरण्यासाठी नाहीत असे तो मानतो. आपले पंख आकाशाला गवसणी घालण्यासाठी आहेत. त्यांच्या साहाय्याने आकाशात उंच भरारी घ्यायची आहे आणि तेथील आनंद लुटायचा हे त्याचे स्वप्न आहे. काहीतरी विशेष करायचं असेल तर आधी त्याचं स्वप्न नजरेसमोर असावं लागतं. तसं त्याचं हे स्वप्न ! 

पण केवळ स्वप्नं पाहून ध्येयप्राप्ती होत नाही. त्यासाठी ध्येयमार्गावर अविरतपणे चालत राहावं लागतं. महत्त्वाकांक्षेच्या स्वप्नांना प्रयत्नांचे पंख लावावे लागतात. ' हौसला ' बुलंद असावा लागतो. तसाच आपला हा जोनाथन आहे. तो सतत सराव करतोय. आपल्या पंखात बळ जमा करतोय. आपल्या स्वप्नांच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु आहे. आता कोणी काही जगावेगळं करायला लागलं की लोक नावं ठेवणारच. जोनाथनालाही तसे अनुभव येतात. त्याचे बांधव त्याला वेड्यात काढतात. त्यांना त्याची कीव येते. त्यांना वाटते की असा किती उंच उडणार आहे हा ? आणि उडून उडून काय करणार ? एक दिवस त्याला आपल्यातच परत यावं लागेल. पण त्यांचा हा अंदाज जोनाथन चुकीचा ठरवतो. तो आपल्या ध्येयाशी प्रामाणिक आहे. बाकीचे नावं ठेवत असताना तो आकाशाला गवसणी घालतो देखील ! 

पण उडणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांऐवजी त्यांचे पंख कसे कापता येतील अशा प्रवृत्तीची माणसे पक्ष्यात देखील आढळतात. त्यांच्याच जमातीतील एक ज्येष्ठ अण्णा, दादा किंवा तात्या त्याला विचारतात की आपल्याला ही उडण्याची जी मर्यादित क्षमता प्राप्त झाली आहे, ती मासे पकडून पोट भरण्यासाठीच. तू हा आगाऊपणा करून काय साध्य करू पाहतो आहेस ? 

यावर जोनाथनने दिलेले उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, ' आकाशात गवसणी घातल्याशिवाय त्यातील स्वर्गीय आनंदाचा प्रत्यय तुम्हाला येणार नाही. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या आणि या अनुभवात सामील व्हा. मग तुम्हीही या आनंदाचे साक्षीदार व्हाल. आपल्या मर्यादा शेवटी ठरवल्या कोणी ? आपणच ना ! आपण ठरवलं तर या शृंखला तोडू शकतो. या मर्यादा पार करू शकतो. पण रुढीग्रस्त आणि परंपरांचे अभिमानी असलेल्या तात्यांना हे त्याचं उत्तर रुचत नाही. त्यांना तो त्याचा उद्धटपणा वाटतो. ते आणि त्यांचे काही चेले आपल्या जोनाथनला समाजबहिष्कृत करतात. आता जोनाथन एकटा पडलाय. पण त्याला पर्वा नाही. अजून हौसला बुलंद आहे. त्याचं उंचीचं वेड कधीही न संपणारं आहे. त्याला असं उडताना पाहून आता त्याच्या तरुण मित्रांना त्याचा हेवा वाटू लागतो. तो त्यांनाही आपल्यासोबत येण्याचं आवाहन करतो. स्वर्गीय आनंदाचं धनी त्याला एकट्यालाच व्हायचं नाही. आपल्या सहकाऱ्यांना त्याला बरोबर घ्यायचं आहे, त्यात सामील करून घ्यायचं आहे. 

तुम्हाला काय वाटतं ? ही कथा केवळ जोनाथन नावाच्या पक्ष्याची आहे ? ही कथा खरं तर सीगलची नसून आपल्या प्रत्येकाची आहे – जेव्हा आपण इतरांच्या अपेक्षा झुगारून ' आतला आवाज  ' ऐकतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने "उडता" येतं. जोनाथनने आपल्या आतला हा आवाज ऐकला आणि म्हणूनच तो केवळ एक सीगल राहिला नाही, तर प्रेरणा बनला. जर तुम्हाला इतर समुद्रपक्ष्यांसारखं रुटीन लाईफ जगायचं असेल तर हरकत नाही; पण आकाशात भरारी घेतल्यावर मिळणाऱ्या आनंदाला तुम्ही मुकाल, हवेतल्या हवेत पहिल्यांदा वळण्यासाठी करावी लागणारी धडपड, संघर्ष याला तुम्ही मुकाल आणि यातून एखादा नवा शोध लागला तर त्यातून होणा-या आनंदाला तुम्ही मुकाल...!

आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला, ध्यास घेतला, निरंतर शोध घेतला तर कोणत्याही क्षेत्राच्या अत्युच्च शिखरावर पोहोचू शकतो, हेच या गोष्टीचं सार आहे. असे अनेक ' जोनाथन ' आपल्या जगात होऊन गेले आहेत की ज्यांनी वेगळा मार्ग चोखाळला. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणले. संत तुकारामांनी समाजातील अनिष्ट रूढींवर प्रहार केले. या सगळ्यांना समाजाने खूप त्रास दिला. बहिष्कृत केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध संघर्ष करून स्वराज्य निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध संघर्ष करून आपल्या समाज बांधवांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला आणि त्यांना आपल्या सोबत घेतले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाचे अजोड कार्य केले. महर्षी कर्वे यांना देखील स्त्री शिक्षणासाठी आणि विधवांसाठी काम करताना समाजाने खूप त्रास दिला पण त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. बाबा आमटे यांनी सुखासिन जगणे सोडून देऊन कुष्ठरोग्यांसाठी स्वतःला वाहून घेतले. समाजातील सर्वांना आपल्याबरोबर घेऊन सर्वांच्या सुखाची कामना केली. त्यांच्यामुळेच समाजाची, संस्कृतीची प्रगती झाली. आजही आपल्या आजूबाजूला पाहिलं तर असे अनेक जोनाथन आपल्याला दिसतील फक्त आपले डोळे आपण उघडे ठेवले पाहिजे.

 आपल्याला काय व्हायचंय ? जोनाथन की सामान्य समुद्रपक्षी ? 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
८/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


















टिप्पण्या