उगवतीचे रंग
रेषा – नात्यांचा आरसा
शाळेत शिकताना आपण विविध प्रकारच्या रेषा अभ्यासतो. उदाहरणार्थ भूगोलातील अक्षांश-रेखांशाच्या उभ्या आडव्या रेषा. भूमितीतील विविध कोनांच्या रेषा. लहान मुलं वह्या पुस्तकांवर किंवा भिंतीवर रेषा मारून ठेवतात. शिक्षकही आपले पेपर किंवा वह्या तपासताना त्यावर बरोबर किंवा चूक असल्याच्या खुणा करतात. त्याही रेषाच असतात. पण या रेषा या फक्त भूगोलात किंवा गणितात नसतात. त्यांचा संबंध थेट मानवी जीवनाशी देखील असतो. त्या रेषा माणसांच्या मनात असतात. नात्यांमध्ये असतात. त्या भावनांच्या, सीमांच्या आणि समजुतीच्या असतात. रेषा म्हणजे एक वेध – कधी मोजमापाचा, कधी अंतराचा, तर कधी जिव्हाळ्याचा. आपण जगताना अशा अनेक रेषा चुकवतो, आखतो, पुसतो, आणि कधी कधी स्वतःभोवतीही आखून घेतो.
रेषा तीन प्रकारच्या असतात असं एक सुंदर तत्त्वज्ञान सांगतं.
पहिली — दगडावरची रेषा — जी कधीच पुसली जात नाही. ती कारागीर छिन्नी हातोड्याच्या साहाय्याने दगडावर कोरतो. किंवा कधी कधी नैसर्गिकरित्या देखील निर्माण झालेली असते.
दुसरी — वाळूवरची रेषा — जी काही वेळाने मिटते. वाहणारा वारा, माणसांच्या पाऊलांनी, प्राण्यांच्या पाऊलांनी या रेषा काही तासातच मिटून जातात. पुन्हा वाळू एकसारखी दिसते.
आणि तिसरी — पाण्यावरची रेषा — जी काही क्षणांतच नाहीशी होते. पाण्यावर काठी मारली तर क्षणभर पाणी दुभंगल्यासारखे वाटते. ही पाण्यावरील रेषा काही क्षणातच नाहीशी होते. पुन्हा सगळे पाणी एकसारखे दिसते.
आपले राग, वाद, गैरसमज हे कोणत्या रेषेत बसतात?
पती-पत्नीमधील वाद वाळूवरच्या रेषेसारखा असावा — काही तासांत मिटणारा.
आई-वडील आणि मुलांमधील राग पाण्यावर काठीने मारलेल्या रेषेसारखा असावा - क्षणात विरघळणारा.
पण काही राग मात्र दगडावर कोरल्यागत मनावर ठसतात... ते नात्यांच्या अंताला कारणीभूत ठरतात. दोन भावांमध्ये एकदा शेतातील बांधावरून भांडण झाले. बाब अगदी किरकोळ होती. समजून घेऊन, बोलून किंवा संवादाने प्रश्न सहज सुटला असता. पण अभिमान आणि अहंकार आड आला. क्षुद्र स्वार्थ भावाच्या उदात्त नात्यावर मात करून गेला. प्रकरण न्यायालयात गेले. तिथे मनासारखा न्याय मिळाला नाही म्हणून वरच्या कोर्टात गेले. या सगळ्या प्रकरणात सगळी प्रेमळ नाती मातीमोल झाली. न्यायालयाच्या खर्चासाठी शेतीचा तुकडा विकण्याची वेळ आली. पण कोणीही माघार घेतली नाही. उलट कोणी त्याबद्दल विचारले की हे म्हणायचे मी माझ्या भावाशी दहा वर्षांपासून बोलत नाही. ही काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे ? ही झाली दगडावरची रेषा. ज्याबद्दल आपण अभिमानाने बोलतो, ' माझ्या शब्दात काडीमात्रही बदल होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ' नात्यांमध्ये अशा रेषा तयार होऊ देता कामा नये.
पती-पत्नीतील संबंध, घरातील नाती ही वाळूवरील रेषांसारखी असावी. काही तासात पुसल्या जाणाऱ्या रेषा. किती सुंदर कल्पना आहे, नाही ? पती पत्नीत भांडण झाले तर एका गाण्यात पती पुढाकार घेतो. तो म्हणतो, ' हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, सोड ना अबोला. ' तर एका हिंदी गीतात एक पत्नी आपल्या पतीला म्हणते, ' रुठे रुठे पिया मनाउ कैसे ? ' रागाची मनात गाठ बांधून ठेवली की ती लवकर सुटत नाही. म्हणून ही निरगाठ असावी- लवकर सुटणारी. एका ठिकाणी तर रागाबद्दल असं म्हटलं आहे की राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीबद्दल तुम्ही स्वतःला करून घेतलेली शिक्षा ! म्हणून काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे.
रामायणात आपण वाचतो की लक्ष्मणाने सीतेच्या संरक्षणासाठी एक रेषा त्यांच्या झोपडीभोवती एक रेषा ओढली होती. ती ओलांडून सीतेने बाहेर जाऊ नये असे त्याने सांगितले होते. हीच रेषा लक्ष्मण रेषा म्हणून प्रसिद्ध झाली. पण सीतेसाठी आखलेली लक्ष्मणरेषा — केवळ एक सुरक्षा नव्हती, ती एक मर्यादा होती असाही त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल.
नात्यांमध्येही अशा लक्ष्मणरेषा असतात — स्वातंत्र्य आणि हस्तक्षेप यामधील सूक्ष्म सीमारेषा. सुसंस्कृत माणसं त्या पाळतात. त्या पार केल्या की सुसंवादाचं रूपांतर संघर्षात होतं.
एखाद्या पतीने पत्नीच्या स्वप्नांवर, तिच्या स्पेसवर अघोषित लक्ष्मणरेषा आखली तर?
एखाद्या पालकाने मुलाच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तर?
या रेषा मग लक्ष्मण रेषा राहत नाहीत. त्या बंदीरेषा बनतात आणि मग नात्याला गुदमरवतात.
खरी लक्ष्मणरेषा ही प्रेमाने आखलेली असते — विश्वासाच्या वाळूवर.
ती रेषा पाळली गेली, तर नातं आरशासारखं झळाळतं.
कधी कधी आपण अनेकदा स्वतःभोवती एक अदृश्य रेषा आखतो — "माझ्या भावना कुणाला दिसू नयेत", "मी कोणावर अवलंबून नको."
ही रेषा कधी संरक्षण बनते, तर कधी एकटेपणाचं कडवं आवरण.
जवळचं नातं या रेषेपर्यंत पोचतं, पण आत येऊ शकत नाही.
त्या रेषा माणसाला सांभाळतातही, पण खूप दिवस तशाच राहिल्या, तर त्या भिंती होतात. म्हणून त्यांच्या भिंती होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी.
रेषांचा विचार करताना आणखी एक छान विचार मनात येतो. एखाद्याचा उत्कर्ष, प्रगती आपल्याला सहन होत नाही. त्याची रेषा आपल्यापेक्षा मोठी होते आहे हे आपल्याला सहन होत नाही. मग अशावेळी आपण काय करतो ? तर त्याची रेषा लहान करण्याचा प्रयत्न करतो. पण असे न करता आपली रेषा मोठी करता आली तर.. ? दुसऱ्याची रेषा पुसून आपण मोठे होत नाही. स्वतःची रेषा वाढवली, की खरी उंची मिळते. स्वतःची रेषा एवढी उंच असावी की दुसऱ्याची रेषा मोजावीच लागू नये !
रेषा म्हणजे अंतर नाही, ती असावी एक विश्वासरेषा. रेषा फक्त विभाजनाची नसते — ती जोडणीही असते. दोन पिढ्यांमधील रेषा, भिन्न स्वभावांमधील रेषा, भूतकाळ आणि वर्तमान यामधील रेषा. या सर्व रेषा जर विश्वासाच्या, समजुतीच्या आणि प्रेमाच्या असतील, तर त्या नात्यांचा आरसा अजूनच झळाळून उठतो.
रेषा म्हणजे नात्यांचा आरसा असतो. त्या आरशात आपण किती स्पष्ट, निर्मळ आणि प्रेमळ दिसतो, हे आपल्या वर्तनाच्या रेषांवर अवलंबून आहे. वाद असतीलच, पण ते पाण्यावरच्या रेषेसारखे निघून गेले पाहिजेत. मर्यादा हव्यातच, पण त्या लक्ष्मणरेषेसारख्या संरक्षणार्थ आणि सन्मानार्थ हव्यात.
कारण शेवटी...
रेषा फक्त आखायच्या नसतात,
त्या ओलांडूनही पाहाव्यात —
शांततेसाठी, प्रेमासाठी, माणुसकीसाठी.
एखाद्या सुंदर चित्रातील रेखीव रेषा चित्र आकर्षक बनवतात आणि वेड्यावाकड्या रेषा चित्र बिघडवतात. आपल्या रेषांनी सुंदर चित्र तयार व्हावे. प्रेमाचे, माणुसकीचे, आपुलकीचे रंग त्यात भरावे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२९/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा