उगवतीचे रंग
खरोखरच आपण सुखी आहोत का ?
खरोखरच आपण सुखी आहोत का असा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो, तेव्हा खरं तर आपण त्याबद्दल साशंक असतो. मानवी जीवनात सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो. कधी कधी तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशीही परिस्थिती असते. पण परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहणे, समाधानी राहणे आपल्याच हातात असते. सुख आणि दुःख हे बाहेरील घटनांवर जरी अवलंबून असले तरी सुख आणि दुःख या आपल्या मनाच्या अवस्था आहेत. सुख आणि दुःख या गोष्टी सापेक्ष आहेत. एका व्यक्तीला ज्या परिस्थितीत सुख वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच असे नाही. उदाहरण सांगायचं झालं तर मला प्रवास आवडतो, गाणी ऐकायला आवडतात. पण सगळ्यांना या गोष्टी आवडतीलच असे नाही.
पण आपण सुखी आहोत का यापेक्षा आपण समाधानी आहोत का असा प्रश्न खरं तर आपण स्वतःला विचारायला हवा. कारण आपल्या सुखाच्या कल्पना याच बहुधा आपल्याला त्रासदायक ठरतात. सुखाचा पाठलाग कधीच संपत नाही. पण समाधान मात्र कोणत्याही परिस्थितीत मिळू शकते. आज सायकल ही माझी गरज आहे. ती मिळाली की मी आनंदी होईन असे मला वाटते. मला सायकल मिळते. पण मग माझी सुखाची कल्पना तिथेच थांबत नाही. मला मग हवी असते मोटारसायकल, ती मिळाल्यावर मला कार हवी असते. घर झाले की मोठे घर हवे असते, आवश्यक तेवढा पैसे जवळ असले तरी अजून हवे असतातच. एकूण काय सुखाचा शोध कधी संपत नाही. पण आपण ठरवलं तर समाधान मात्र प्रत्येक अवस्थेत राहू शकतं.
मला या ठिकाणी एक वाचलेली गोष्ट आठवते आहे. एक शेतकरी असतो. जमिनीचा छोटासा तुकडा त्याच्याजवळ असतो. त्यातच मोठ्या कष्टाने तो शेती पिकवतो. आनंदी आणि समाधानी राहतो. एकदा शहरातून एक श्रीमंत व्यक्ती त्या गावात येते. त्या व्यक्तीला गावात कसला तरी कारखाना काढायचा असतो. त्याला त्या शेतकऱ्याची जमीन हवी असते. तो ज्यावेळी शेतकऱ्याला भेटायला जातो, तेव्हा तो शेतकरी आपल्या शेतातील एका झाडाच्या सावलीत आरामात पहुडलेला असतो. मुखाने परमेश्वराचे नामस्मरण सुरु असते. तो श्रीमंत माणूस त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणतो, ' अरे, तू ही जमीन मला विकून टाक. मी तुला भरपूर पैसे देतो. ' शेतकरी विचारतो, ' भरपूर पैसे मिळाले म्हणजे काय होईल ? '
श्रीमंत माणूस म्हणतो, ' अरे वेडा आहेस का ? तुझ्याकडे भरपूर पैसे आल्यावर तू श्रीमंत होशील.'
शेतकरी विचारतो, ' श्रीमंत झाल्यावर काय होईल ? '
' अरे वेड्या, तुला हवे ते घेता येईल. अजून दुसरी शेती तू घेऊ शकतो, बंगला बांधू शकतो. नोकरचाकर सेवेला ठेवू शकतो. ' तो माणूस म्हणाला.
' बरं, मग तसं झाल्यावर काय होईल ? ' शेतकरी विचारतो.
' अरे वेड्या, तू सुखी आणि समाधानी राहू शकशील, तुला भरपूर निवांत वेळ मिळेल. आपल्या मुलाबाळांमध्ये आनंदाने राहता येईल, ' श्रीमंत माणूस म्हणाला.
शेतकरी म्हणाला, ' मग त्यासाठी मला शेतीच कशाला विकायला हवी ? आणखी पैसा कशाला हवा ? कारण सुखी आणि समाधानी मी आताही आहेच. आताही माझ्याकडे निवांत वेळ आहेच. आणि माझ्या मुलाबाळांसाठीच तर मी हे सगळे करतो. आम्ही सगळे आहे त्यात मजेत जगतो.' त्या सामान्य शेतकऱ्याला सुख कशात आहे हे बरोबर कळले होते म्हणून आपल्या छोटयाशा जमिनीच्या तुकड्यावर तो समाधानी होता.
आपल्याकडे तर सर्व संतांनी जीवनातील सुख आणि दुःख याची जाणीव आपल्या अभंगातून मानवाला फार पूर्वीच करून दिली आहे. समर्थ रामदास म्हणतात, ' जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधूनि पाहे. ' जगात सुखी आहे अशी व्यक्ती आढळणे कठीणच. सामान्य माणूसपासून ते अगदी उद्योगपती असलेल्या टाटा, बिर्ला, अंबानी पर्यंत प्रत्येक जण काहीना काही तरी कमी आहे म्हणून दुःखी असतो. माणूस सतत सुखाच्या शोधात धावत असतो. पण सुख हे मृगजळ आहे. ते सतत हुलकावणी देत राहते. आपण लहान असतो तेव्हा वाटतं की मी मोठा झाल्यावर सुखी होईन. मोठा झालो की चांगली नोकरी मिळाली आणि भरपूर पैसा मिळाला की सुखी होईन. मग सुखाच्याच शोधात असताना लग्न होतं, मुलंबाळं ही होतात. पण तरी सुख सुख असं जे काय म्हणतात, ते काही हाती लागत नाही.
सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते तर समाधान ही मनाची अवस्था असते. ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवते. ग. दि. माडगूळकर आपल्या एका गीतात म्हणतात, ' पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. ' मला जास्त नको. पोटापुरते मिळाले म्हणजे पुरे असे मागणे देवाकडे मागणारा माणूस खरोखरच सुखी असतो.
आज आपण भौतिक प्रगती खूप केली आहे. हाताशी विविध अत्याधुनिक गोष्टी उपलब्ध आहेत. विज्ञानाच्या प्रगतीतून हाती लागलेली अनेक यंत्र मानवाची सेवा करत आहेत. माणूस अगदी चंद्रावर, मंगळावर जाऊन पोहोचला आहे. पण हे सगळे असले तरी सुख मात्र दूर दूर पळते आहे. त्याला कारण म्हणजे सुखाच्या आपल्या असलेल्या अवास्तव कल्पना. खरं सुख त्यात नाही याची जाणीव असूनही आपण त्यामागे व्यर्थ धावत राहतो. उंदीर एकदा एखाद्या सापळ्यात अडकला आणि त्यातून निसटला की तो पुन्हा म्हणून तसल्या सापळ्यात अडकत नाही. आपण मात्र सुखासाठीच्या अनेक सापळ्यात पुन्हा पुन्हा अडकत राहतो. हे सापळेही आपणच तयार केलेले असतात.
आपण जगाला दाखवताना बऱ्याच वेळा निरनिराळे मुखवटे धारण करतो. मी सुखी आहे, सुसंस्कृत आहे, सभ्य आहे, प्रेमळ आहे, मला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही इ. हे सगळे लोकांना सांगण्यासाठी असते. पण खरी परिस्थिती काय आहे ते आपल्या मनालाच माहिती असते. ब्रोनी वेरी यांनी एक फार सुंदर पुस्तक लिहिले आहे. ' द टॉप फाईव्ह रिग्रेट्स ऑफ द डायिंग ' असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ब्रोनी ही एका रुग्णालयात सिनिअर नर्स होती. तिच्यापुढे बऱ्याच वेळा जगण्याच्या अंतिम स्थितीतले रुग्ण यायचे. त्यांना मृत्यू समोर दिसत होता आणि ते कधीही हे जग सोडून जातील अशी परिस्थिती होती. अशा हजारो रुग्णांच्या मुलाखती तिने घेतल्या. त्यांना तिने विचारले की जीवन जगताना काय करायचे राहून गेले असे तुम्हाला वाटते ? त्या रुग्णांच्या मुलाखतीतून विविध उत्तरे समोर आली. तरी त्या काही उत्तरांमध्ये काही समान अशी उत्तरे होती. त्यातील प्रमुख पाच गोष्टींचा उल्लेख ब्रोनी यांनी या पुस्तकात केला आहे. त्या पाच गोष्टी अशा
१. माझं आयुष्य मी मनासारखं जगलो असतो तर... ?
२. जीवनात एवढे कष्ट मी उगीचच केले...
३. अनेकदा मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत. वेळोवेळी त्या व्यक्त करायला हव्या होत्या.
४. मी माझ्या जिवलग मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर...
५. मी मला आयुष्यभर खुश ठेवलं असतं तर... ?
या पाचही गोष्टी खूप काही सांगून जातात. आपण सतत दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्यासाठी जगलो. स्वतःसाठी जगलोच नाही अशा प्रकारची खंत या लोकांना आपल्या आयुष्याच्या अखेरीस होती. मला वाटतं या पाचही गोष्टी प्रातिनिधिक आहेत. कारण त्या समस्त मानवजातीला लागू आहेत.
चिनी लोकांमध्ये एखाद्या प्रसंगी दुसऱ्याला शुभेच्छा देताना, तुम्हाला सहा सुखे प्राप्त होवोत असे म्हणतात. त्यातील पाच गोष्टी म्हणजे आरोग्य, संपत्ती, चांगला नावलौकिक, चांगली मुले, आणि आयुष्याचा चांगला जोडीदार. मग सहावे सुख कोणते ? तर ते ज्याचे त्यानेच शोधायचे आहे असं शुभेच्छा देणारा म्हणत असतो. या सहाव्या सुखाची कल्पनाच किती अभिनव आणि आगळीवेगळी आहे ! आपलं आयुष्य आनंदात जावं, कोणतीही उणीव राहू नये म्हणून माणूस आयुष्यभर किती धडपड करतो ! सुखाच्या मागे धावत असतो. पण त्याला या वर सांगितलेल्या पाच गोष्टी मनासारख्या मिळाल्या तरी त्याला स्वतःसाठी वेगळे असे काहीतरी हवे असते. हेच सहावे सुख . हे सुख ज्याचे त्यानेच शोधून काढायचे आहे. हे सुख प्रत्येकाचं वेगळं. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या. कोणाचं सुख छोटया गोष्टीत, तर कोणाचं मोठ्या ! धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात प्रत्येकजण स्वतःचं अस्तित्व विसरला आहे, स्वतःला विसरला आहे आणि म्हणूनच खरं जगणं विसरला आहे. एखाद्याच्या हृदयात आपल्याला जागा मिळणं, कोणाचा तरी मायेचा, प्रेमाचा हात आपल्या अंगावरून फिरणं, आपण कोणाला तरी हवेहवेसे वाटणं अशा अनेक गोष्टी या सहाव्या सुखाच्या कल्पनेत असू शकतील. म्हणूनच आपल्या आनंदाचा शोध आपल्या स्वतःलाच घ्यायचा आहे. तो घेता आला तर आपण नक्कीच सुखी, समाधानी आहोत असं म्हणता येईल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०१/०८/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा