मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ११

उगवतीचे रंग  

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ११ 

टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी एक सुंदर आणि हळवी कहाणी

मागील दहा भागात आपण रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी होत गेली ते आणि त्यांच्या शिक्षणविषयक कल्पना त्यांनी शांतिनिकेतनमध्ये प्रत्यक्षात कशा आणल्या, त्याबद्दल सविस्तर चर्चा केली. यापुढील काही भागात आपण टागोरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी रवींद्रनाथांच्या जीवनात ज्या एका घटनेचा महत्वाचा संबंध आहे, ती घटना जाणून घेणार आहोत. या गोष्टीचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हीच गोष्ट महाराष्ट्र आणि प. बंगालमधील एक दुवा आहे. टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी ही एक सुंदर आणि हळवी कहाणी. काहीशी हुरहूर लावून जाणारी. 

शाळेत रवींद्रनाथांचं लक्ष लागत नव्हतं. इतर विद्यार्थी आणि हा जन्मजात प्रतिभेचं देणं घेऊन आलेला विद्यार्थी यांच्यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर होतं. शिक्षणाच्या तत्कालीन पारंपरिक चौकटीत बसणारं हे व्यक्तिमत्व नव्हतं. पण रवींद्रनाथांचा कौटुंबिक वारसा अतिशय उज्ज्वल आणि संपन्न होता हे आपण मागील काही भागात पाहिले आहे. त्यांचे कलकत्याजवळील निवासस्थान जोराशंको वाडी म्हणजे एक सांस्कृतिक केंद्रच होते. आईवडील, भाऊबहीण, काका, आजोबा आदी सगळीच मंडळी पुरोगामी विचारांची होती. या वाडीमध्ये कुटुंबाबातील ६०-७० सदस्य गुण्यागोविंदाने राहत होते.  प्रत्येकाजवळ कलेचा कुठलातरी वारसा होता, कौशल्य होते. अगदी घरातील नोकरचाकर मंडळी सुद्धा याला अपवाद नव्हता. विशेष म्हणजे या मंडळींचे हे पुरोगामी विचार केवळ सांगण्यापुरते नव्हते. त्याप्रमाणे त्यांच्या आचरणात या गोष्टी प्रतिबिंबित होत होत्या. म्हणूनच जेव्हा लहान असलेल्या रवीला शाळेत जाणे आवडत नव्हते, तेव्हा या कुटुंबातील लोकांनी त्याला मारून मुटकून शाळेत पाठवले नाही. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेऊ दिले. त्यामुळेच लहान वयापासून कविता करणे, नाटके लिहिणे, ती बसवणे यासारख्या गोष्टीत त्याच्या प्रतिभेची चमक दिसू लागली. 

पण केवळ कविता वा नाटक लिहून पुढील आयुष्यात भागणार नव्हतं. उपजीविकेसाठी काहीतरी विशेष शिक्षण तर घ्यायलाच हवं होतं असं त्यांच्या कुटुंबियांना वाटलं. त्यांनी मग रवींद्रनाथांना वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १७/१८ वर्षांचं. आता इंग्लंडला जायचं तर उत्तम इंग्रजी बोलता यायला हवं, तेथील एटीकेट्स, मॅनर्स माहिती असायला हव्यात यासाठी त्यांना आधी मुंबईला पाठवायचं ठरलं. मुंबईत असणारे डॉ आत्माराम पांडुरंग तर्खड हे सत्येंद्रनाथांचे मित्र होते. सत्येंद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथांचे थोरले बंधू. मुंबईतील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज सुरु झाल्यानंतर त्यातून डॉ होऊन बाहेर पडणारे पहिल्याच बॅचचे हुशार विद्यार्थी म्हणजे डॉ. तर्खड किंवा तर्खडकर. टागोरांच्या प्रमाणेच तर्खडकर यांच्याही घरातील सर्व मंडळी प्रगत विचारांची होती. मुंबईतील प्रार्थना समाजाच्या स्थापनेत डॉ आत्माराम पांडुरंग हे संस्थापक सदस्य होते. आपल्या सर्व मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले होते. त्यांची मुले इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन आली होती. त्यांना एक मुलगी होती. तिचे नाव अन्नपूर्णा. तिला अन्ना किंवा अना म्हटलं जाई. ही अनासुद्धा इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन आली होती. तिचं वय त्यावेळी साधारण १९-२० वर्षांचं असावं. आता ह्या रवींद्रला इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. 

त्याकाळात बंगालमध्ये स्त्री पुरुष किंवा मुलं आणि मुली यांच्या संबंधात फारसा मोकळेपणा नव्हता. पण मुंबईत अनाच्या सहवासात आल्यावर तिच्या मनमोकळ्या वागण्यामुळे रवींद्रनाथांचा बुजरेपणा हळूहळू कमी झाला. त्यांच्यात मनमोकळ्या गप्पा होऊ लागल्या. रवींद्रनाथ तिच्याकडून इंग्रजी कितपत शिकले याची माहिती मिळत नाही पण अना मात्र रवींद्रनाथांच्या साहित्याची महाराष्ट्रातील पहिली अनुरागिणी होती असे म्हणावे लागेल. 

अना म्हणजे मूर्तिमंत सौंदर्याचं प्रतीक होती. सौंदर्य तिच्या दिसण्यात जेवढं होतं तेवढंच तिच्या वागण्याबोलण्यातही होतं. रवींद्रनाथही अत्यंत देखणे होते. रवींद्रनाथांच्या देखणेपणाची ती तारीफ करत असे. तिचं नाव जरी अन्नपूर्णा असलं तरी रवींद्रांनी आपल्यासाठी खास एखादं नाव ठेवावं असं तिला वाटत होतं. रवींद्रनाथांनी तिच्यासाठी ' नलिनी ' या सुंदर नावाची निवड केली. रवींद्रनाथ तिच्याकडे साधारणपणे दोन महिने राहिले. ते तिला आपल्या ' कबिकाहिनी ' ( कवी कथा ) या काव्याचा अनुवाद करून ऐकवीत असत. ज्या ' भारती ' मासिकात हे काव्य प्रकाशित झालं होतं, त्या मासिकाचा अंकही त्यांनी तिला भेट म्हणून दिला होता. 

 मुंबईतील दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर रवींद्रनाथ इंग्लंडला निघून गेले. पण तर्खड कुटुंबियांना रवींद्रनाथ आणि अना यांच्या नात्याचा अंदाज आला होता. त्यांनी रवींद्रनाथ आणि अना यांच्या लग्नाचा प्रस्ताव टागोर कुटुंबीयांकडे पाठवला होता. पण अना ही रवींद्रनाथांपेक्षा वयाने मोठी असल्याने टागोर कुटुंबीयांनी या प्रस्तावाला नकार दिला. पुढे अनाचे लग्न बडोदा कॉलेजचे उपप्राचार्य हॅराल्ड लिट्लडेल यांच्याशी झाले. या विवाहाला तिची संमती होती का किंवा तिने हे लग्न कसं स्वीकारलं हे एक गूढच आहे. पुढे त्यांच्यासोबत ती स्कॉटलंडमध्ये स्थायिक झाली. पण तिला तेथील हवामान न मानवल्याने ती आजारी पडली आणि तिचे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी निधन झाले. 

अना आणि रवींद्रनाथ यांच्यातील संबंध केवळ शारीरिक आकर्षण या पातळीवर नव्हते. त्यांच्यातील अस्फुट, अव्यक्त प्रेमसंबंध हे दोघांच्याही जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव  पाडणारे होते. हॅरोल्ड लिट्लडेल यांच्याशी विवाह झाल्यानंतरही अनाने आपले ' नलिनी ' हेच नाव कायम ठेवले होते. तर रवींद्रनाथ आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत अनाला विसरू शकले नाहीत. त्यांच्या काव्यात ती आजही जिवंत आहे. बंगाली सण, उत्सवात अनेकदा गायिल्या जाणाऱ्या रवींद्र संगीतात प्रेमाचा अप्रतिम संगम आहे. ' भलोभेसे शोखी, निभ्रते जोतोन ' ( हे प्रिये, तुझ्या आत्म्याच्या मंदिरात प्रेम आणि प्रेमाने माझे नाव लिही. ) 

रवींद्रनाथांचं अनावर असणारं प्रेम शेवटपर्यंत जरी कायम असलं तरी ते दैहिक नव्हतं. त्यांच्या काव्याची ती प्रेरणा जरूर ठरली. पण आपली पत्नी मृणालिनीदेवी यांच्यावर रवींद्रनाथांनी निस्सीम प्रेम केलं. मृणालिनी ही त्यांच्या जगण्याची ओढ होती, त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी होती. असंही म्हणता येईल की अना आणि रवींद्रनाथ यांचं नातं नितळ, पारदर्शी होतं, काही नाती अशीही असतात की ज्यांना आपल्या नात्याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. रवींद्रनाथ आणि अना या दोघांचंही नातं अशाच प्रकारचं पारदर्शी आणि नितळ होतं. ते निभावण्यामागे दोघांच्याही मनाचा मोठेपणा दिसतो. खरोखरीच हेवा वाटावा अशा प्रकारचं हे नातं होतं. 

रवींद्रनाथांच्या अनेक कवितांची नलिनी ही प्रेरणा ठरली. त्यांच्या ' शैशवसंगीत ' या काव्यसंग्रहातील अनेक कविता तिच्याबद्दलची भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. त्यांची एक कविता ' शुन नलिनी खोल गो आँखि ' ( ऐक नलिनी उघड नेत्र ), तसेच ' आमि स्वप्ने रयेछि भोर, सखी आमारे जागायो ना ' ( मी स्वप्नात रमलो आहे, सखी मला जागे करू नकोस. ) यासारख्या कविता तिच्यावरच आहेत.याशिवाय १८८४ साली रवींद्रनाथांनी ' नलिनी ' या नावाचं एक नाटकही लिहिलं होतं. या नाटकाची स्मरणपत्रिका त्यांनी कोरीच ठेवली होती. त्यांना हे नाटक तिला अर्पण करायचं होतं असं सांगितलं जातं. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२६/७/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या