उगवतीचे रंग
आमची पहिलीवहिली युरोपवारी ( भाग २ )
मुंबई विमानतळावरून सुटलेले विमान लंडनच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. तसे काही विमानात पहिल्यांदाच बसलो होतो असे नव्हे. यापूर्वी भूतानला जाताना, तसेच राजस्थान, बंगलोर आदी ट्रीप करताना विमानप्रवास झाला होता. तरी असा लांबचा प्रवास पहिल्यांदाच होत होता. आपण मुंबईहून केवळ साडेनऊ तासात चक्क लंडनला पोहोचणार याची एक वेगळीच भावना मनात येऊन एक प्रकारची उत्सुकता आणि अनोख्या आनंदाची भावना होती. पूर्वीच्या काळी जेव्हा जलमार्गाने प्रवास होत होता, तेव्हा अशा ठिकाणी पोहोचण्यास चक्क काही महिने लागत. आज तो प्रवास एका दिवसात नव्हे तर काही तासात होणार होता.
विमानातील सर्व सीट प्रवाशांनी भरले होते. बसण्यासाठीची जागाही तशी फार ऐसपैस नव्हती. त्यामुळे साडेनऊ तास कसे जाणार हा प्रश्न होता. पण तसे काही फारसे जाणवले नाही. बसल्याजागी थोडावेळ डुलकी घेतली. विमानात हवाई सुंदरींची लगबग चालू होती. वेळोवेळी चहापाणी, नास्ता आणि जेवण अगत्यपूर्वक दिले जात होते. प्रत्येक व्यक्तीच्या पुढे एक छोटासा टीव्ही स्क्रीन होता. त्यावर विविध चॅनल्स, सिनेमा आदी करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यामुळे वेळ कसा निघून गेला हे कळले नाही.
विमानाची लंडनला पोहोचण्याची वेळ भारतीय वेळेनुसार रात्री ११. ३० वा होती. माझ्या मनात आले की आपण तिथे उतरु तेव्हा साधारण मध्यरात्र झालेली असेल पण मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आम्ही लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरलो तेव्हा तेथील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे सात वाजले होते. ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही असे ज्या इंग्लंडबद्दल बोलले जात होते, त्या देशात आम्ही पाय ठेवला होता. खरोखरच सूर्य मावळला नव्हता. आपल्याकडे संध्याकाळी ४/५वाजेच्या दरम्यान असतो, तेव्हढा लख्ख सूर्यप्रकाश होता. हिथ्रो विमानतळावरची ती एक प्रसन्न संध्याकाळ होती. इंग्लंडचे घड्याळ भारताच्या साडेचार तास मागे आहे. उतरल्यावर आमच्याबरोबरच्या मंडळींनी आपापली घड्याळे स्थानिक वेळेनुसार लावून घेतली. आमचा मोबाईल मात्र जणू काही सर्वज्ञ होता. त्याने न सांगताच तेथील वेळेनुसार स्वतःला अपडेट करून घेतलं होतं. इतरांनी आपल्या हातावरील घड्याळे स्थानिक वेळेनुसार लावली तरी मी मात्र माझ्या हातावरील घड्याळ तसेच राहू दिले. मोबाईल मला युकेमधील वेळ दाखवत होता, तर हातातील घड्याळ भारतातील. त्यामुळे एकाच वेळी दोन्हीकडे किती वाजले हे चटकन लक्षात येत होते.
आमचे गाईड राहुल देसाई यांनी आम्हाला आमचे सामान कुठे मिळेल आणि ते घेऊन कुठे थांबायचं याच्या सूचना दिल्या. अर्थात ते आमच्या सोबतच होते. कन्व्हेयरबेल्ट वरून आम्ही आमच्या बॅग्स घेतल्या. विमानतळावरील तपासणी आदी सर्व सोपस्कारातून बाहेर पडलो. आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी थांबलो. थोड्याच वेळात आमची बस आल्याची सूचना मिळाली. आम्ही आमचे सामान बसमध्ये ठेवले. मर्सडिज कंपनीची अत्यंत आधुनिक आणि आरामदायी अशी बस होती. बसमधील सर्वांच्या जागा राहुल देसाई यांनी ठरवून दिल्या. बुकिंग केलेल्या क्रमानुसार बसमधील सीट्स देण्यात आल्या होत्या. त्याच पुढील प्रवासात कायम राहणार होत्या.
परदेशात प्रवास करताना पासपोर्ट ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. पासपोर्ट हरवला तर पुढील प्रवास करणे वा परत आपल्या देशात येणे अत्यंत अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे आमचे गाईड आम्हाला वारंवार आपले पासपोर्ट सांभाळा अशी सूचना देत होते. काही वेळातच आम्ही आट्रियम या हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथेच आज रात्रीचा मुक्काम होता. आमच्या रूममधील टीव्हीसारख्या असणाऱ्या स्क्रीनवर आमचे दोघांचे नाव आणि तुमचे स्वागत आहे असे वाक्य वाचायला मिळाले. हा एक आश्चर्याचा सुखद धक्का होता. फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही लंडन शहर पाहण्यासाठी निघणार होतो. सकाळी साडेसातला तयार होऊन नाश्ता करून आठ वाजता आपल्याला निघायचे आहे अशी सूचना मिळाली. उद्या आपली लंडनमधली सफर कशी होते, कोणकोणती ठिकाणे बघायला मिळतात याची सुखद कल्पना करीत आम्ही निद्राधीन झालो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१९/०७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा