(आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन आहे त्यानिमित्ताने...)
‘ प्लॅस्टिक मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल...’
एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम कळल्यानंतरही आपण काही वेळा ती गोष्ट करण्याचे सोडत नाही. आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा काही वर्षांपूर्वी प्लास्टिक मुक्तीची घोषणा केली होती. त्यामुळे काही काळापुरता का होईना पण प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद झाला होता. खरोखर प्रश्न असा पडतो की कुठलीही गोष्ट कायद्याचा बडगा उगारला की मगच आपण का करतो ? अशा गोष्टी स्वयंस्फूर्तीने आपण का करीत नाही ? काही काळासाठी बंद झालेला हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर आता मोठ्या प्रमाणावर पुन्हा सुरू झाला आहे आणि प्लास्टिक पिशव्या बंदीची ही चळवळ पुन्हा हाती घेण्याची आवश्यकता आहे.
खरं तर प्लास्टिकचे दुष्परिणाम आपल्याला अनेक वर्षांपासून लक्षात आले आहेत. शेकडो वर्षे ते नष्ट होत नाही. त्याचे विघटन होत नाही वगैरे. तरीही आम्ही वापरायला सोयीस्कर म्हणून त्याचा वापर करीतच राहतो. कोणत्याही दुकानात गेलो की दुकानदाराला आपणच ‘ अहो, प्लीज कॅरी बॅग द्या ना ‘ म्हणून आपणच मागे लागतो. घरी मग अशा प्लास्टिक पिशव्यांचा ढीग साचत असतो. बऱ्याच वेळा काम झाले की आपण त्या सरळ फेकून देतो. पण त्यातून आपण पर्यावरणाचे केवढे मोठे नुकसान करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. यामागे एक भावना ही पण असते की सगळेच वापरताहेत. मग माझ्याच न वापरण्याने असा कोणता मोठा फरक पडणार आहे ? पण हीच भावना नेहमी आपल्याला घातक ठरत आली आहे. Charity begins at home. नेहमी सुरुवात ही स्वतःपासून करायची असते हे आपण विसरतो. कदाचित सोयीस्कर विसरतो.
या फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बऱ्याच वेळा उरलेले अन्नपदार्थ भरून आपण त्या फेकून देतो. गाईगुरे अशा पिशव्यांमधील अन्न खाण्यासाठी प्रयत्न करताना त्या पिशव्याही त्यांच्याकडून गिळल्या जातात. अनेक गुरांच्या पोटात अशा पिशव्या जाऊन त्यांना आजार झाले. त्यांची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांच्या पोटात किलोने प्लास्टिक साठल्याचे लक्षात आले. आपल्याला आठवत असेल की दहाबारा वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या भयंकर पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले होते. प्रचंड नुकसान झाले. बळी गेले. कारण पाण्याचा निचरा होऊ शकलेला नव्हता. या सगळ्याला कारणीभूत होता प्लास्टिकचा महापूर. त्यामुळे सगळीकडे पाणी साचले होते. त्यामुळे मध्यंतरी राज्य सरकारने पन्नास मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आणली होती. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
या बाबतीत पुण्यासारख्या काही शहरातील नागरिकांना आणि दुकानदारांना मात्र गुण द्यावेच लागतील. ते प्रशंसेस पात्र आहेत. तसे पुणेकरांच्या स्वभावाबाद्द्दल, वागण्याबोलण्याबद्दल बरेच विनोद आपण ऐकत असतो. पण याबाबतीत मात्र त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते. पुण्यातील बरेच दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्या देत नाहीत. दिल्यास कागदी पिशव्या देतात. नागरिकही दुकानात जाताना स्वतः कापडी पिशव्या बरोबर घेऊन जाताना दिसतात. पण अलीकडे जी मॉल संस्कृती उदयास आली आहे त्यातून मात्र प्लास्टिकचा अतोनात वापर होतो. घरी जाताना मोठमोठ्या प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात. अलीकडे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा प्लास्टिकचे कप, ग्लास, वाट्या, थर्माकोलच्या प्लेट्स इ. चा वापर होतो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर हा सगळा कचरा रस्त्यावर फेकला जातो. ते दृश्य इतके घाणेरडे असते की पाहवत नाही. त्याचबरोबर हल्ली बऱ्याच वस्तू प्लास्टिकच्या आवरणासोबत येतात. त्यामध्ये दुधाच्या पिशव्या औषधे आणि बऱ्याच खाद्यपदार्थांचा समावेश असतो. बऱ्याचश्या भेट वस्तू सुद्धा प्लास्टिक पॅकिंग मध्येच येतात. या गोष्टींचा वापर झाल्यानंतर हे प्लास्टिक आवरण काढून फेकून दिले जाते आणि हा प्लॅस्टिकचा कचरा पुन्हा वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण करतो.
पण आशादायी गोष्ट अशी आहे की बऱ्याच संस्था प्लास्टिक पिशव्या मुक्तीच्या चळवळीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या वाटपाचे उपक्रम देखील स्वखर्चाने राबवत आहेत. बरेच जागरूक नागरिक सुद्धा या चळवळीला हातभार लावत आहेत. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आईवडील आणि गुरुजन यांनीच प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवला तर मुले सुद्धा आपोआपच त्याचे अनुकरण करतील.
आपल्याला कल्पना नसेल की प्लास्टिकचा हा भस्मासुर कुठपर्यंत पसरला आहे. अगदी हिमालयाची शिखरे सुद्धा या प्लास्टिक कचऱ्यापासून सुटलेली नाहीत. एवढेच काय पण अगदी खोल समुद्रात राहणारे प्राणी सुद्धा यातून सुटले नाहीत. प्रशांत महासागरात सात मैल खोल राहणाऱ्या काही सजीवांनी प्लास्टिक खाल्ल्याचे शास्त्रज्ञाना आढळून आले आहे. या बाबतीत संशोधन करणारे डॉ जेनिसन म्हणतात, “ मानवी हस्तक्षेपातून सागरी जीवांचीही सुटका झाली नाही. सागरी जीवांच्या शरीरातील प्लास्टिकचे प्रमाण पाहता समुद्राच्या तळाची परिसंस्था नष्ट झाली आहे असे वाटते. अन्नाच्या कमतरतेमुळे या प्राण्यानी मिळेल ते खायला सुरुवात केली आहे. “ महासागरांच्या पृष्ठभागावर जवळपास तीस कोटी टन प्लास्टिक तरंगत आहे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. माणसाला पुढील आयुष्य प्रदूषणमुक्त जगायचे असेल तर प्लास्टिकच्या वापराबद्दल गंभीरपणे विचार करावाच लागेल. या साठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. आपण स्वतःपासून सुरुवात करू या. बाजारात जाताना घरूनच कापडी पिशव्या घेऊन जाऊ या. प्लास्टिकचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा प्रयत्न करू या. पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता अन्य पर्यांयांचा वापर करू या. अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. Let’s begin. त्यासाठी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा !
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
3/7/2024
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा