उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ९ )
कमालीचा साधेपणा आणि मनाची श्रीमंती
महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन लोकांना केले होते. त्याची सुरुवात बंगालमध्येच कलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये ऑगस्ट १९०५ मध्ये अधिकृतपणे झाली. बंगालच्या फाळणीला लोकांचा विरोध होता. हा विरोध लोकांनी ' वंदे मातरम ' गाऊन व्यक्त केला. एकतेचा निर्धार केला. या प्रसंगी रवींद्रनाथांनी ' आमार शोनार बांगला ' या गीताची रचना केली. पुढे हे गीत बांगला देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विदेशातून आलेले कापड वापरायचे नाही असा निर्धार केला.
रवींद्रनाथ आणि त्यांचे सहकारी शांतिनिकेतनमध्ये स्वदेशी वापरावरच भर देत होते. स्थानिक कारागिरांनी हातमागावर तयार केलेले कापड रवींद्रनाथ, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी वापरत असत. त्या कापडावर स्थानिक कारागिरांनी सुरेख असे नक्षीकाम केलेले असे. टागोरांच्या शांतिनिकेतनात श्रीमंती आणि ऐश्वर्याला स्थान नव्हते. पण तेथील लोकांची मनाची श्रीमंती इतकी मोठी होती की त्यांना पैशाने मिळणाऱ्या सुखसोयी, भोगविलास आदींची आठवण सुद्धा येत नसे. माणसे जोडण्याची कला टागोरांपाशी उत्तम होती. अत्यंत विद्वान आणि ऋषितुल्य माणसे त्यांच्या शांतिनिकेतनात मोठ्या आनंदाने राहत होती. तिथे काम करण्यासाठी स्वतःहून येत होती. शिवाय हे सगळे पैशांची कोणतीही अपेक्षा न करता. तेथे जे काही मिळे, त्यावर ते संतुष्ट असत. या मंडळींचा पैशांचा कोष भलेही रिता असेल, पण ज्ञानाची श्रीमंती मोठी होती आणि ती उदार हस्ते ते आपल्या सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वाटत होते.
शांतिनिकेतनमध्ये नंदलाल बोस हे विख्यात चित्रकार होते. ते नवनवीन डिझाइन्स तयार करीत. आज आपण ज्याला ग्राफिक्स म्हणतो, त्या चित्रकलेची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली असे म्हणायला हरकत नाही. आपल्या चित्रकलेच्या प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन व्हायला तिथूनच सुरुवात झाली. पण रवींद्रनाथांच्या बाबतीत एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आपल्या प्राचीन रूढीपरंपरांचं अंधानुकरण त्यांना अमान्य होतं. त्यातील जे जे उत्तम ते स्वीकारायला ते नेहमीच आघाडीवर असत. त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती, सुधारणा यांनाही त्यांचा विरोध नव्हता. किंबहुना त्यांच्या शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन यांच्यात प्राचीन आणि अर्वाचीन यातील चांगल्या गोष्टींचा सुरेख संगम झाला होता.
आपल्या देशातील शेतकऱ्यांनी शेती करण्याच्या तंत्रात होत असलेल्या आधुनिक सुधारणा लक्षात घेऊन शेती केली पाहिजे असे त्यांना वाटे. त्या गोष्टी आपल्याकडील शेतकऱ्यांनी शिकून घ्यायला हव्यात अशी त्यांची इच्छा होती. श्रीनिकेतनची स्थापना याचसाठी झाली होती. रवींद्रनाथांच्या प्रेरणेने तिथे आधुनिक शेतीतील प्रयोगांना सुरुवात झाली. नवनवीन गोष्टींच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रयोगशाळांची स्थापना झाली. त्यालाच जोडून ग्रामीण भारतातील लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. लोकांना होणारे आजार, त्यावरील उपचार यावर संशोधन सुरु झाले.
शेतीच्या कामात रवींद्रनाथांना मदत करण्यासाठी प्रा. एल्महर्स्ट हे ब्रिटिश शेती तज्ज्ञ श्रीनिकेतनात येऊन राहिले. रवींद्रनाथांच्या कार्यपद्धतीमुळे ते अतिशय प्रभावित झाले होते. शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन येथील शिक्षण आणि शेतीचे प्रयोग पाहून त्यांनी इंग्लंडमध्ये परत गेल्यावर तिथल्या एका लहानशा खेड्यात शांतिनिकेतनासारखे शिक्षण देणारी शाळा सुरु केली. रवींद्रनाथांचे शिक्षण आणि शेतीचे प्रयोग पाहून प्रभावित झालेल्या प्रा एल्महर्स्ट यांनी रवींद्रनाथांवर ' The Poet and the Plough ' हे सुंदर पुस्तक लिहिले. श्रीनिकेतनातील प्रयोग पाहण्यासाठी आणि त्यांच्या आपल्या शेतीत होणाऱ्या प्रयोगांची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक जपानी शेतकरी देखील तिथे येऊन राहिले होते.
रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव एवढा दांडगा होता की विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी तेथे येऊन राहत. यात देशातील तसेच विदेशातीलही अनेक मंडळी असत. शांतिनिकेतनात तिबेटातील लामा येऊन राहिले. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या सिल्व्हेन लेवींसारख्या फ्रेंच महापंडितांचा निवास तेथे राहिला आहे.
सिल्व्हेन आणि रवींद्रनाथांची भेट पॅरिसमध्ये १९२०-२१ च्या सुमारास झाली. ते प्राच्यविद्यापंडित होते. ते पॅरिसमध्ये संस्कृतचे अध्यापन करीत होते.The Indian Theatre या नावाचा ग्रंथ आजही महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. या भेटीत रवींद्रनाथांनी त्यांना विश्वभारतीत येण्याचे आमंत्रण दिलं. त्यांनीही ते तात्काळ स्वीकारलं आणि काही काळ येऊन ते शांतिनिकेतनात राहिले. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना फ्रेंच, चिनी आणि तिबेटी भाषा शिकवल्या. परत गेल्यावर आपल्या पत्रात त्यांनी रवींद्रनाथांना लिहिले आहे, " शांतिनिकेतन जगातील सर्वात विकसित शिक्षण संस्थामंध्ये कधी स्थान प्राप्त करील ते मला माहिती नाही पण तुम्ही एक अतुलनीय शांततेचे निवासस्थान तयार केले आहे. तेथील आम्रवृक्षांच्या रम्य वातावरणात, शाळेच्या परिसरात फिरायला मला आवडेल. तेथील पक्ष्यांचे कूजन, संगीत, श्लोक ऐकणे, प्रिय मित्रांच्या सहवासात काळ घालवणे या गोष्टी माझ्यासाठी आनंदाच्या आहेत. आणि तुमच्या आनंददायी सहवासात पुन्हा कधी वावरायला मिळेल त्याची मला प्रतीक्षा आहे. "
रवींद्रनाथांच्या आश्रमात मोठ्या आनंदानं राहणारी ही ज्ञानी आणि थोर मंडळी म्हणजे ज्ञान वाटणाऱ्या पाणपोई होत्या. ज्याला कोणालाही काही हवं असेल, त्याच्याजवळ आपल्या ज्ञानाची ओंजळ ही मंडळी आनंदाने खुशाल रिकामी करत. मग ती व्यक्ती विद्यार्थी असो की प्राध्यापक किंवा तिथे असलेली कोणीही सामान्य व्यक्ती. शांतिनिकेतन, श्रीनिकेतन यात वावरणाऱ्या लोकांमध्ये कमालीचा साधेपणा होता. पण या साधेपणातही कमालीचा आनंद भरून राहिला होता. नृत्य, नाट्य, गीत, संगीत, विविध कला यांचा आनंद ही मंडळी घेत असत आणि दुसऱ्यालाही देत. रवींद्रनाथ जीवनातील सौंदर्याचे उपासक होते. आपल्या शिक्षण संस्थेत त्यांनी साधेपणाच्या नावाखाली कधीही रुक्षता किंवा कोरडेपणा येऊ दिला नाही. सौंदर्याशी कधीही फारकत होऊ दिली नाही.
साधारणपणे आपला असा समज असतो की पैसा असेल तरच आपण सौंदर्यदृष्टी जोपासू शकतो. पण हा समज रवींद्रनाथांनी चुकीचा ठरवला. त्याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणी सांगितल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये क्षितिमोहन सेन हे शिक्षक होते. ते अत्यंत विद्वान आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांची मुलगी अमिता देखील याच शाळेत शिकत होती. आश्रमात विविध प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी कलकत्त्याहून श्रीमंतांच्या मुली यायच्या. त्यांच्या अंगावर सोन्याचे मौल्यवान दागिने असायचे. ते पाहून अमिताला देखील आपल्याला सोन्याचे दागिने हवे असे वाटू लागले आणि आपले वडील क्षितिमोहन यांच्याकडे तिने तो हट्ट धरला. मुलीने लाडाने एखादा हट्ट केला आणि तो पुरवता येत नसेल तर पित्याच्या काळजाला किती वेदना होतात, हे अनुभवीच समजू शकतील. क्षितिमोहन यांनी अमिताला ' बाबा मोशाय ' यांच्याकडे जा म्हणून सांगितले. रवींद्रनाथांना सगळे बाबा मोशाय म्हणत असत.
सोन्याच्या दागिन्यांचा हट्ट करणाऱ्या लहानग्या अमिताला रवींद्रनाथांनी फुलांचे दागिने किती सुंदर असतात, त्यांचे रंग किती सुंदर आणि वेगवेगळे असतात आणि अंगावर सोन्यांच्या दागिन्यांपेक्षा ते किती शोभून दिसतील हे पटवून दिले. आश्रमात तर विविध प्रकारच्या फुलांची कमी नव्हतीच. त्यांनी फुलांचे सुंदर दागिने बनवून घेतले. अमिताने ते घातले. तिच्याबरोबरच आश्रमातील इतर मुलींनी देखील हे सुदंर सुवासिक दागिने परिधान केले. जेव्हा कलकत्त्याहून श्रीमंतांच्या मुली सोन्याचे दागिने घालून आल्या, तेव्हा आश्रमातील या निसर्गकन्या फुलांच्या आभूषणात मोठ्या सुंदर दिसत होत्या. आता कलकत्त्याहून आलेल्या त्या मुलींनी देखील आपल्या आईवडिलांकडे आपल्याला तसे फुलांचे दागिने हवेत म्हणून हट्ट धरला. अशी होती रवींद्रनाथांची समजावून देण्याची पद्धत.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा