मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग वक्ता दशसहस्त्रेषु

उगवतीचे रंग 

वक्ता दशसहस्त्रेषु 

बऱ्याच वेळा टीव्ही वरचे रटाळ कार्यक्रम पाहिले की माझ्या मनात असा विचार येतो की खरोखर एखादे टीव्ही चॅनेल आपल्या  मालकीचे असायला हवे होते. खरं तर हे एक अत्यंत प्रभावी माध्यम. पण व्यापारी आणि स्पर्धात्मक मनोवृत्तीने यातली मजा आणि आनंद हरवला आहे. बोटांवर मोजण्याइतके क्वचितच काही चांगले कार्यक्रम बघायला मिळतात. विनोदी कार्यक्रमातही तेच ते रटाळ विनोदी प्रसंग,अचकट विचकट आणि अश्लीततेकडे झुकणारे विनोद बघायला मिळतात. कधी कधी हे  विनोदी कार्यक्रम हाच एक मोठा विनोद वाटावा अशी परिस्थिती आहे. पण अशा वेळी दोनच पर्याय तुमच्या हातात असतात आणि ते म्हणजे मुकाट्याने हे कार्यक्रम पाहणे ( ते छान आहेत असा समज करून घेऊन पाहणे ) आणि दुसरा पर्याय म्हणजे रिमोट तुमच्या हातात असते. तुम्ही ते बंदही करू शकता. बरेच वेळा हा दुसरा पर्याय मला अवलंबावा लागतो. आपण मराठीतील काही दर्जेदार विनोदी लेखकांचे साहित्य वाचले असेल तर आपल्या लक्षात येईल तो दर्जा आता राहिला नाही. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, द मा मिरासदार, राम गणेश गडकरी ( बाळकराम ), चिं वि जोशी आदींच्या विनोदातील खुमारी काही वेगळीच होती. 

आपल्याकडील विविध बातम्यांचे चॅनल्स हेही नको त्या बातम्या नको तेवढ्या रंगवून सांगतात. एखाद्या राजकीय नेत्याने काय विधान केले, मग त्याला दुसऱ्याने कसे प्रत्युत्तर दिले याच्याच बातम्या जास्त. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायलाच तयार नाही. सर्वसामान्यांचे नाहीतरी पडले आहे कोणाला ? ना नेत्यांना ना टीव्हीवाल्याना. असो, तर हा खूप वेगळा विषय आहे. 

तर मला काय म्हणायचं ते मी सांगतो. म्हणजे तसा मीच तुमच्याशी बोलतो आहे त्यामुळे जे काही सांगायचं ते माझंच असेल. तर मंडळी मी सुरुवातीला म्हटलं ना की माझ्या ( आणि तुमच्या सुद्धा ) मालकीचं एखादं टीव्हीचॅनेल असतं ना तर अनेक दर्जेदार, बहारदार कार्यक्रम आपण सादर केले असते. अहो आपल्या महाराष्ट्रात आणि देशात विविध विषयांवर बोलणारे, अभ्यासू, तज्ज्ञ असे अनेक वक्ते, लेखक आहेत. साहित्य, विज्ञान, अध्यात्म, देशसेवा, नागरिकांची कर्तव्ये अशा अनेक विषयांवर या सारख्या मंडळींना बोलते करता आले असते. असे कार्यक्रम तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरले असते. पण जाऊ द्या. आपल्या हातात काही नाही. 

चांगलं पाहायला मिळत नसलं तरी चांगलं ऐकता मात्र येऊ शकतं. विविध ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी काही वक्त्यांची भाषणं आयोजित केलेली असतात. त्यांना शक्य झालं तर हजेरी लावता येते. विविध संस्थांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वर्षातून कधीतरी व्याख्यानमालांचे आयोजन केलेले असते, त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. 

काही चांगल्या वक्त्यांची भाषणे आज इंटरनेटवर किंवा यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. अटलजी, इंदिरा गांधी, राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले, पु ल देशपांडे, अशी काही निवडक नावे सांगता येतील. या दिग्गजांची भाषणे ऐकणे म्हणजे एक पर्वणी असायची. चौफेर वाचन, बहुश्रुतता, समयसूचकता, नर्म विनोद यामुळे त्यांची भाषणे ऐकणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत असत. स्वा. सावरकर, स्वामी विवेकानंद यांची भाषणे रेकॉर्डिंग करून ठेवायची त्यावेळी आजच्यासारखी सहज सोय उपलब्ध नव्हती. नाहीतर आज आपल्याला ते अक्षरधन उपलब्ध झाले असते. 

आपल्या एका व्याख्यानात शिवाजीराव भोसले यांनी स्वा. सावरकर यांच्या भाषणाचा एक किस्सा सांगितला आहे. ते पुण्यात कॉलेजला शिकत असताना एकदा काही कारणाने कॉलेजचे तास होऊ शकले नाहीत. थोडा वेळ होता म्हणून ते टिळक स्मारक मंडळाजवळील एका ठिकाणाजवळ आले. पाहतात तर त्या ठिकाणी एक मंडप टाकलेला होता. कुठल्या तरी वक्त्यांची भाषणे सुरु होती. आधीच्या वक्त्याचे भाषण नुकतेच संपले होते. नंतर एक म्हातारे दिसणारे गृहस्थ हातात छत्री घेऊन उभे राहिले. तसे ते शरीरानेही किरकोळ होते. आता असा माणूस काय विशेष बोलणार असे त्यांना वाटले. पण त्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली आणि पाहता पाहता सभा जिंकून घेतली.  श्रोते त्यांच्या वाकगंगेत न्हाऊन निघाले. वाणीचा विलास, भाषेचे सौंदर्य, आपले म्हणणे श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची तळमळ हे सारे सारे त्यांच्या भाषणात होते. त्या शब्दांना सरस्वतीचा स्पर्श होता, श्रीरामांच्या बाणांचे तेज आणि तिखटपणा होता. एकही श्रोता जागचा हलत नव्हता. ती भाषण करणारी व्यक्ती होती स्वा सावरकर. 

अशी व्यासंगी भाषणे ऐकायला मिळणे हे त्या त्या पिढीचे भाग्य असते. अशा भाषणातून संस्कार, जीवन जगण्याची दिशा मिळते. लोकजागृती होते. अशी लोकजागृती लोकशाहीसाठी आवश्यक असते. लोकमान्य टिळकांच्या भाषणातून स्वातंत्र्यपूर्व काळात अशा प्रकारची जनजागृती झाली. वृत्तपत्रे आणि त्यांची भाषणे यातून ही जनजागृती त्यांनी घडवून आणली. त्यांच्या हातात शस्त्रे नव्हती पण त्यांची वाणी आणि त्यांची लेखणी हेच त्यांचे शस्त्र होते. कुठल्याही शस्त्रापेक्षा अत्यंत प्रभावी असे हे अस्त्र होते. त्यामुळेच इंग्रजांना सळो की पळो असे त्यांनी करून सोडले. गांधीजींच्या भाषणांनी सुद्धा अशाच प्रकारे लाखो लोक त्यावेळी प्रभावित झाले होते. सरदार पटेल यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक लढे दिले, सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पटेलांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव होता. लोक त्यांची भाषणे ऐकून भारून जात. अनेक अशिक्षित शेतकरी, स्त्रिया पटेल यांच्या सत्याग्रहात सामील झाल्या. सरदार पटेल सांगतील तेच प्रमाण, त्यांचा शब्द अखेरचा असे मानणारी ती मंडळी होती. हे पटेल यांच्या लढ्याचे सर्वात मोठे यश होते असे म्हणावे लागेल. म फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांनी लोक असेच भारून जात असत. 

अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तर डॉ राधाकृष्णन, सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर यांच्यासारखी अनेक अत्यंत विद्वान आणि दिग्गज मंडळी कार्यरत होती. अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार होते. या सगळ्या लोकांनी पिढ्या घडवल्या आहेत. आपला वारसा पुढील पिढ्यानं दिला आहे. ज्या काळात टीव्ही, मोबाईल यासारखी करमणुकीची साधने नव्हती, सिनेमा सारखे माध्यम नुकतेच बहरात येऊ लागले होते अशा काळात या नामवंतांच्या वक्तृत्वाने तरुणांच्या पिढ्या घडवल्या. विचारांचा वसा आणि वारसा दिला. 

या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते की ही सगळी मंडळी उच्चशिक्षित होती. अगदी पं नेहरू,म गांधी, लाल बहादूर शास्त्री,  स्वा सावरकर , डॉ आंबेडकर, सरदार पटेल यासारखे कोणतेही नेते पाहिले तर ते उच्चविद्याविभूषित होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात विचारांची खोली, वाणीची प्रासादिकता, लोकांवर प्रभाव टाकू शकणारे विचार आणि वक्तृत्व होते. बोलणे आणि वागणे यांच्यात ताळमेळ होता. त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव जनमानसावर पडत होता. म्हणूनच त्यांच्या शब्दाला लोक प्रमाण मानत होते. 

आजचे चित्र काय दिसते ? आज उच्चविद्याविभूषित नेते फार कमी दिसतात. किंबहुना नेतेपदासाठी कोणतीही पात्रता किंवा निकष नाही. निकष असेल तर तो म्हणजे निवडून येण्याची पात्रता हाच म्हणावा लागेल. मग त्या काळातल्या नेत्यांच्या बोलण्याचे मोल आजच्या काळातील राज्यकर्त्यांच्या बोलांना कसे प्राप्त होणार ? सगळाच प्रकार म्हणजे ' उथळ पाण्याला खळखळाट फार ' असा आहे. 

परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान आणि जीभ मात्र एकच दिली आहे. दोन डोळ्यांनी भरपूर पाहावे, निरीक्षण करावे, वाचावे. दोन कानांनी भरपूर ऐकावे, बहुश्रुत व्हावे. जीभ मात्र एकच आहे. म्हणून ' उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ' असे होऊ नये. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर ' अभ्यासोनि प्रकटावे. ' एखाद्या उद्यानाच्या बाजूने आपण गेलो तर उद्यानातून आपल्याला सुगंध येतो. तो सुगंध उद्यानाचा नसतो तर उद्यानातील फुले उद्यानाला सुगंध प्राप्त करून देतात. असाच सुगंध आपलीही कर्मे, आपले ज्ञान आपल्याला प्राप्त करून देते. हा सुगंध नैसर्गिक असतो. कुठलाही कृत्रिम परफ्युम वापरण्याची गरज नसते. नववर्षानिमित्त आज एक संकल्प करू या. चांगली भाषणे, चांगले वक्ते ऐकू या. आपण एखाद्या अभ्यासू वक्त्याला जेव्हा ऐकतो तेव्हा त्याने अभ्यासलेल्या शेकडो पुस्तकांचे ज्ञान आपसूकच साररूपाने आपल्याला मिळत असते. चांगला वक्ता व्हायचे असेल तर आधी चांगले श्रोते होऊ या. म्हणूनच म्हटले जाते, ' वक्ता दशसहस्त्रेषु... ' दहा हजारात एखादाच चांगला वक्ता असतो. 

आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
०१/०१/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या