मुख्य सामग्रीवर वगळा

शाश्वत समाधानाचे मुक्त विद्यापीठ : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

उगवतीचे रंग 

शाश्वत समाधानाचे मुक्त विद्यापीठ : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज  

धर्म, अध्यात्म यांच्या नावावर बऱ्याच ठिकाणी बाजार मांडलेला पाहिला जात असताना, लोकांना साधी सोपी उपासना सांगणाऱ्या मुक्त विद्यापीठाचे नाव आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा, प्रपंच आणि परमार्थ एकमेकात कसा मिसळून द्यावा याचे सोप्या भाषेत लोकांना ज्ञान देणारे विद्यापीठ म्हणजे गोंदवलेकर महाराज. तुम्ही गरीब असा की श्रीमंत, शिकलेले असा की अशिक्षित, स्त्री असा की पुरुष, पंडित असा वा सामान्य व्यक्ती तुमची कोणतीही पात्रता पाहिल्याशिवाय प्रवेश देणारे एकमेक मुक्त विद्यापीठ म्हणजे गोंदवलेकर महाराज. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात जे थोर संत होऊन गेले त्यातील सर्वात सोपी शिकवण देऊन लोकांना परमार्थ मार्गाकडे वळवणारे महान संत म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. 

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले हे महाराजांचे गाव. गणेश रावजी घुगरदरे असे त्यांचे मूळ नाव होते. महाराजांच्या घरात परंपरेने चालत आलेली विठ्ठलभक्ती आणि पंढरीची वारी होती. कुल्कर्णीपण होते. महाराजांच्या अंगात लहानपणापासूनच विरक्ती होती. ते नऊ वर्षांचे असतानाच गुरूच्या शोधार्थ निघाले होते. वडिलांनी त्यांना परत घरी आणले. ते अकरा वर्षांचे असतानाच त्यांचा विवाह झाला. पण त्यांचे चित्त संसारात नव्हते. पुन्हा गुरूच्या शोधार्थ ते बाहेर पडले. शेवटी मिळालेल्या आदेशानुसार नांदेड जवळील येहेळेगाव येथे श्रीसंत तुकामाईंकडे ते गेले आणि तुकामाई हे त्यांचे गुरु झाले. त्यांनीच त्यांचे नाव ' ब्रह्मचैतन्य ' असे ठेवले. श्रीमहाराजांची गुरूंनी कठीण परीक्षा घेतली. पण ते गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. गुरूंची सेवा केली. पुढे गुरुंच्याच आदेशानुसार लोकांना त्यांनी भक्तिमार्गाला लावले. 

' संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश  ' असे संत तुकाराम महाराज म्हणतात. असे अखिल मानवजातीबद्दल प्रेम असणारी व्यक्ती म्हणजे संत. अशाच प्रकारची लोकांच्या उद्धाराची तळमळ श्री गोंदवलेकर महाराजांना लागून राहिली होती. त्यातूनच त्यांचे कार्य घडत गेले. गोंदवलेकर महाराजांचे रामावर फार प्रेम होते. त्यातूनच त्यांनी लोकांना रामनामाचे महत्व सांगून भक्तिमार्गाला लावले. पण महाराजांनी भक्ती आणि कर्म यांचा सुरेख संगम साधला. प्रपंचात राहून भक्ती करता येते हे स्वतःच्या उदाहरणाने लोकांना दाखवून दिले. रामनाम घ्यायचे म्हणजे आपले काम सोडून त्याची भक्ती करत बसायचे असे त्यांचे सांगणे नव्हते. काम करता करता रामनाम घ्या किंवा रामनाम घेता घेता आपले काम करा हे त्यांचे सांगणे होते. त्यांची शिकवण साधी सोपी होती. सर्वांसाठी होती. व्यावहारिक जीवनातले अनेक दाखले देऊन महाराज आपले म्हणणे पटवून देत. त्यांचे बोलणे जरी साधे सोपे असले तरी त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचे व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावरील विलक्षण तेज या सगळ्या गोष्टींचा लोकांवर प्रभाव पडत असे. महाराजांचे बोल लोकांच्या हृदयाचा ठाव घेत असत. त्याचे आणखीही एक कारण होते. ते म्हणजे महाराजांचे वागणे हा ' बोले तैसा चाले ' याचा उत्तम वस्तुपाठ होता. पोकळ उपदेश करणाऱ्याचे बोलणे लोकांवर फार प्रभाव टाकू शकत नाही. ' आधी केले मग सांगितले ' असे महाराजांचे वागणे होते. 

नाम घायलाच महाराज का सांगत ? तर ते म्हणतात, ' नाम हा जीव आणि शिव यांच्यातील दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम हे सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. नाम म्हणजे सत्संगाचा पाया आणि कळसही आहे. महाराजांच्या प्रत्येक वाक्यात जीवनाची खरीखुरी अनुभूती भरून राहिलेली असे. वेदांतातील कठीण तत्वज्ञान महाराजांच्या मुखातून येताना सोप्या शब्दांचे रूप धारण करून येई. ते म्हणायचे, ' जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव प्रपंच, तर भगवंत काय म्हणेल याचे भान ठेवून वागणे म्हणजे परमार्थ. जो कधी चुकतो आणि कधी बरोबर येतो तो साधक, आणि ज्याची दृष्टी रामरूप झाली तो गुरु. ज्याचे हवेपण जास्त तो गरीब, आणि ज्याचे हवेपण कमी तो श्रीमंत. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती तर विषयांची आवड म्हणजे प्रपंच. ' महाराजांच्या मनीध्यानी सतत भगवंत असल्यामुळे त्यांचे बोलणे अगदी आतून आलेले, भक्तीने ओथंबलेले आणि मनावर ठसणारे असे. त्यांची साधी सोपी वाक्ये म्हणजे परमार्थातील सूत्रे बनत. 

संत कोणाला म्हणावे असा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडतो. महाराज त्याचे फार सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात, ' संत ओळखण्याची अगदी सोपी खूण म्हणजे ज्याच्या सहवासात आपले मन समाधान पावते व अकारण मनाला प्रसन्नता येते तो संत असला पाहिजे. ' स्तोत्र म्हणणे म्हणजे पत्राने भगवंताची भेट घेण्यासारखे आहे, तर नाम घेणे हे भगवंताला प्रत्यक्ष भेटण्यासारखे आहे. 

महाराजांना एका व्यक्तीने एकदा विचारले की महाराज तुम्ही पाहिलेला जीवनातील सर्वात मोठा चमत्कार कोणता ? महाराजांनी मोठे छान उत्तर दिले. ते म्हणाले, ' तुम्ही सगळे एवढी दगदग सोसून गोंदवल्यास येता, आपल्या समस्या मांडता. मी दरवेळी तुम्हाला त्याच त्याच गोष्टी सांगतो. नाम घ्यायला सांगतो. तरी प्रत्येक वेळी तुम्ही येथे येतातच हा सगळ्यात मोठा चमत्कार नाही का ? ' 

गोंदवल्यास कशासाठी जायचे ? त्याचे महत्व काय हे सांगताना महाराज म्हणतात, ' जसे वडील मुलासाठी बँकेत पैसे ठेवतात आणि त्याचे व्याज आपल्या पश्चात मुलाला मिळावे अशी व्यवस्था करतात, त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धी व्हावी म्हणून भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे. गोंदवल्याला आल्यावर त्याच्या बुद्धीत पालट झालाच पाहिजे. 

गोंदवल्यात महाराजांनी जे राममंदिर बांधले त्या रामावर महाराजांचे फार प्रेम होते. त्या त्यांच्यासाठी फक्त मूर्ती नव्हत्या. तर प्रत्यक्ष रामराया त्यांच्या रूपाने इथे वास करतो आहे ही त्यांची दृढ धारणा होती. रामरायाशी त्यांचा नित्य संवाद असे. त्यांचे रामावर इतके प्रेम होते की ते जेव्हा नैमिषारण्यात जायला निघाले तेव्हा प्रत्यक्ष रामरायाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. जो जो मनुष्य त्यांच्याकडे जाई, त्याला ते म्हणायचे, ' अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा. ' एका भक्ताने त्यांना गोंदवल्याच्या रामाबद्दल विचारले असताना ते म्हणाले, ' ह्या रामापुढे उभे राहिले म्हणजे तो आपल्याला आपल्या अवगुणांची जाणीव करून देतो. आपल्या दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागताला अभय देणे हे रामाचे ब्रीदच असल्याने तो त्या मनुष्याला संकटातून सोडवील आणि त्याचे काम होऊन जाईल. ' 

' भुकेल्या व्यक्तीला उपाशी पोटी वेदांत सांगणे चुकीचे आहे, ' असे स्वामी विवेकानंद म्हणत. गोंदवलेकर महाराजांनीही भुकेलेल्याना खाऊ घातले. आईच्या मायेने भरवले. आईला आपली मुले जेवताना पाहून जसे समाधान वाटते तसे महाराजांना त्यावेळी वाटत असे. अन्नदान, गोरक्षण आणि नामस्मरण या तीन गोष्टी महाराजांच्या आवडत्या. आजही गोंदवल्याला त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण सुरु आहे. 

महाराजांचा शिष्यवर्ग मोठा आहे. गोविंद सीताराम गोखले यांनी महाराजांच्या प्रवचनांचे संकलन केले आहे. तारखेप्रमाणे दररोज एक प्रवचन वाचायचे असे त्याचे स्वरूप आहे. या प्रवचनांचे अनेक भाषात भाषांतर झाले असून त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. देशात आणि देशाबाहेरही हजारो लोक या प्रवचनांचे वाचन करतात. लोकांचा अनुभव असा आहे की त्यांना दैनंदिन जीवनात पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रवचनातून सहज मिळतात. अध्यात्मात अहंकार फार घातक ठरतो. सर्वसामान्य माणसाला मी एखादी गोष्ट केली याचा फार अभिमान असतो. एकदा एका व्यक्तीने महाराजांना विचारले की महाराज, तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते. काय देऊ ? महाराज म्हणाले, ' कोणालाही त्याच्याकडे जे नसेल ते दिले म्हणजे आनंद होतो. ' मी कर्ता आहे ' ही भावना माझ्याकडे नाही. तेव्हा तुम्ही तुमची ' मी कर्ता ' ही भावना मला देऊन टाकावी. त्याने मला आनंद होईल व तुमचेही कल्याण होईल. 

इ.स. १९१३ मध्ये गोंदवल्याला महाराजांच्या उपस्थितीत शेवटचा रामनवमीचा उत्सव झाला. नऊ दिवस अखंड नामस्मरण, कीर्तन, पुराण आदी सुरु होते. सुमारे पाच हजारावर माणसे गोंदवल्याला उपस्थित होती. महाराजांना नमस्कार करायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला महाराज पाठीवरून हात फिरवून सांगत, ' बाळ, भगवंताने प्रपंचात आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे, त्यात समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. ' 

जिथे जिथे नामस्मरण सुरु आहे, तिथे तिथे श्रीमहाराज असतातच. एकदा धरलेला आपल्या भक्ताचा हात ते कधीही सोडत नाही. नामात प्रेम आले पाहिजे. सुरुवातीला ते नसले तरी तुमची नामसाधना जसजशी वाढत जाईल ,तसतसे नामात प्रेम उत्पन्न होईल. हे नामच तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून देऊन भगवंतापर्यंत घेऊन जाईल. श्रीमहाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य रामरायाच्या नामस्मरणात घालवले. प्रपंच आणि परमार्थ दोन्हींचा आदर्श त्यांनी आपल्या वागण्याबोलण्यातून घालून दिला. 

जायचं जनीं जन्म नामार्थ झाला ।

जयाने सदा वास नामात केला ।।

जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ति । 

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ।। 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१८/१२/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या