मुख्य सामग्रीवर वगळा

होय, आम्ही आहोत कृतघ्न

 उगवतीचे रंग 

होय, आम्ही आहोत कृतघ्न 


देव्हाऱ्यात ठेवलेल्या मूर्तींची 

करायची असते पूजा 

नसते कधी विचारायचे 

त्या खऱ्या आहेत की खोट्या ?


पूजा असते बांधायची 

त्यांच्या विचारांची 

गायची असतात स्तोत्रे 

त्यांच्या पराक्रमाची 


पण आम्ही शोधत बसतो 

कुठे दिसतात का त्यांचे दोष 

जणू भलतेच आदर्श आम्ही 

त्यांच्या नावाने करतो कंठशोष 

दोषारोप करण्यात आम्ही भलतेच मग्न 

म्हणून तर म्हणावे लागते 

होय, आम्ही आहोत कृतघ्न !


आमच्या देव्हाऱ्यात असतात 

नेहरू गांधी टिळक 

कधी कधी थोडीफार स्वातंत्र्यवीरांची झलक 

पूजा मांडलेली असती छत्रपतींची सुद्धा 

करतो साजऱ्या जोशात जयंत्या अन पुण्यतिथ्या 

कुठले त्यांचे कार्य अन कुठला त्यांचा विचार ? 

कारण आम्ही तर असतो आमच्यातच मग्न 

म्हणूनच म्हणतो दोस्तहो 

होय, आम्ही आहोत कृतघ्न. 


नसतात आठवायची 

त्यांनी दिलेली माफीपत्रे 

आठवायची असते ती 

त्यांनी समुद्रात घेतलेली उडी 

अंदमानच्या काळकोठडीत 

अंगावरची बेडी. 


आठवायचे असतात 

तुरुंगातील कष्ट 

आठवा जरा त्यांची घराची राखरांगोळी 

आठवा जरा त्यांच्या संसाराची होळी 

पण कसले कष्ट, कसली होळी 

त्यांच्या आरोपांवर भाजून घेतो आमची पोळी 

आम्ही तर आहोत आमच्यातच मग्न 

म्हणूनच म्हणतो सावरकर 

होय, आम्ही आहोत कृतघ्न. 


म्हणे गांधी नेहरूंमुळे 

झाली देशाची फाळणी 

त्यागाला त्यांच्या साऱ्या 

ही कसली चाळणी ? 

असतीलही झाल्या काही 

त्यांच्याही हातून चुका 

माणसेच होती ती 

का दोष द्यावा फुका ? 


आठवा त्यांची ती दांडीयात्रा 

आठवा त्यांचा तो मिठाचा सत्याग्रह 

आठवा साधेपणा आणि सत्याचा आग्रह 

आठवा छोडो भारत आणि चले जावचा नारा 

कुठला महात्मा, कसला त्याग, कसला सत्याग्रह 

आम्ही तर बुवा आरोप करण्यातच मग्न 

म्हणूनच म्हणतो बापू आम्ही 

होय, आम्ही आहोत कृतघ्न. 


निघतो एखादा असाच कोणाचा नातू पणतू 

बोलण्यात त्याच्या असतात क्षुद्र आरोपांचे जंतू 

भारत जोडो म्हणताना उधळलेली मुक्ताफळे 

आम्हालाच थोडे राहावे लागेल दक्ष 

कोणाच्या बोलण्याकडे किती द्यायचे लक्ष ? 

पण कसला विचार, कसले दक्ष आणि कसले लक्ष ?

आमचा तर कायम एकच पक्ष 

आम्ही असतो फक्त आमच्यातच मग्न 

म्हणूनच म्हणावे लागते 

होय, आम्ही आहोत कृतघ्न. 


वेळ पडलीच तर 

छत्रपतींनाही लावतो आम्ही बोल 

नजरेआड करतो स्वराज्याच्या कार्याचे मोल 

भलतेच गुणी अन आदर्श आम्ही ! 

इतिहासाला पण लावतो बोल 

कळणार कसे आम्हाला त्यांच्या त्यागाचे मोल ? 

कारण आम्ही आहोत आमच्यातच मग्न 

म्हणूनच म्हणावे लागते राजे 

होय, आम्ही आहोत कृतघ्न. 


राम आणि कृष्णही सुटत नाहीत 

आमच्या तडाख्यातून 

फरक नाही पडत 

रामायण महाभारत वाचून 

दोष देतो रामाला सीतेचा त्याग केला म्हणून 

कृष्णाला बोल लावतो स्त्रीलंपट म्हणून 

नाही दिसत आम्हाला रामाने केलेले 

रावणाचे पारिपत्य, दुर्गुणांचा नाश 

नाही दिसत आम्हाला कृष्णाने 

अर्जुनाला सांगितलेली गीता. 

कोण राम, कोण कृष्ण, कोण रावण, कसली गीता 

कुठला पराक्रम, कसले विघ्न, कसली सीता ? 

कारण आम्ही तर आहोत आमच्यातच मग्न 

म्हणून तर हे रामराया 

होय, आम्ही आहोत कृतघ्न. 


म्हणूनच सांगतो पुन्हा एकदा 

करा विचार पुन्हा एकदा 

हा असा, तो तसा का लावता बोल ? 

त्यांच्या कार्याचे, त्यागाचे जरा तरी करा मोल 

मानवी देहात कार्य करताना झाल्या असतीलही काही चुका 

कार्य त्यांचे मार्गदर्शक, त्यापासून शिका. 

आपल्याच क्षुद्र विचारात राहू नका आता तरी मग्न 

नाहीतर कायमचेच ठरू आम्ही कृतघ्न. 


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२७/११/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया कविता नावासह अग्रेषित करावी ) 












टिप्पण्या