उगवतीचे रंग
देखो रुठा ना करो...
पुणे तेथे काय उणे असे म्हणतात ते उगीच नाही. झालं असं की परवाच्या दिवशी ( हा ' परवाच्या दिवशी ' फार सोयीस्कर शब्द आहे बरं का ! यात खरोखरच्या परवाच्या दिवसापासून तो थेट आठवडा, पंधरवडा एवढंच काय वर्ष दोन वर्ष देखील खपून जातात. ही गोष्ट नक्की केव्हा घडली हे सांगण्याची आवश्यकता राहत नाही. ) पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी जे काही सांगितले ते अतिशय महत्वाचे आहे. अशा पद्धतीने आजपर्यंत ( आणि तेही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने अधिकारवाणीने सांगणे )कोणी सांगितले नव्हते.
ते म्हणाले, " नवरा बायकोच्या भांडणाच्या खूप तक्रारी आमच्याकडे येतात. पण माझ्या मते सगळ्या पुरुषांनी जर आपल्या बायकांचे ऐकले तर भांडणे होणार नाहीत. " तात्पर्य म्हणजे असा सल्ल्ला त्यांनी समस्त पुरुष वर्गाला दिला आहे. पण त्यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने देखील हे सांगावे म्हणजे त्यात निश्चितपणे काही तरी अर्थ असलाच पाहिजे असा अर्थ आमच्या सुमार बुद्धीनुसार आम्ही काढला. अर्थात तुम्हाला म्हणून सांगतो आम्ही आयुष्यभर हेच करत आलो आहोत. आमच्यात भांडणे नाहीत असे नाही. पण शेवटी आम्ही आमची चूक मान्य करून माघार घेतो. त्यामुळे एवढी वर्षे झाली तरी आमचा सुखी संसार सुरु आहे. खरे तर वारंवार घटस्फोट घेणाऱ्या पाश्चात्य लोकांनी आमच्याकडे येऊन काही दिवस प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही.
मागे एकदा एक किस्सा वाचलेला आठवतो. बहुधा अकबर बिरबलाच्या गोष्टीतला असावा. एकदा दरबारात प्रश्न विचारला जातो की आपल्या पत्नीच्या आज्ञेत कोण कोण आहेत त्यांनी हात वर करा. तेव्हा अगदी बादशहापासून सगळी मंडळी हात वर करतात. पण एका कोपऱ्यात एक गरीब फाटका माणूस हात वर न करता उभा असलेला त्यांना दिसतो. सगळ्यांनाच त्याचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. त्याच्या धैर्याचा हेवा वाटतो. बादशहाला तर वाटते की आपण बादशहा असूनही काय कामाचे ? हा सामान्य माणूस आपल्यापेक्षा लाख पटीने श्रेष्ठ. तेव्हा सगळे खोदून खोदून त्याला त्याच्या वागण्याचे रहस्य विचारतात. तेव्हा तो सांगतो, ' माझ्या पत्नीनेच मला असे सांगून ठेवले आहे की जेव्हा असा काही प्रश्न तुला विचारेल तेव्हा तू नाही म्हणून सांगायचे. ' घ्या, आता काय बोलणार ?
आणखी एक मजेदार किस्सा आठवला. पुरुष हा लग्नापूर्वी वाघ असतो. तो लग्नानंतर देखील वाघच असतो. फक्त त्या वाघावर दुर्गादेवी स्वार होते. मग दुर्गादेवीची आरती म्हणण्यावाचून गत्यंतर नसते. ' दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी...' असो.
वपु काळेंची एक ' पंतवैद्य ' नावाची कथा आहे. आता सविस्तर आठवत नाही. पण या कथेतला जो नवरा असतो तो थोडा भोळा, बावळट वगैरे दाखवला आहे. त्याची बायको मात्र स्मार्ट असते. तीन मुले, आपला संसार आणि नवरा मोठ्या हुशारीने ती सांभाळते. एकदा वपु त्या माणसाला म्हणतात, ' तुम्ही असे वागतात म्हणूनच लोक तुम्हाला बाहेर बावळट म्हणतात. घरात काय परिस्थिती आहे ? तेव्हा तो माणूस उत्तरतो. मी तिला विचारतो, तुला काय हवे ? ' ती म्हणते, ' सत्ता. ' मग ती मला विचारते, ' तुम्हाला काय हवे आहे ? ' मी सांगतो, ' शांतता ' झाले तर मग. तिला हवी ती सत्ता मी देऊन टाकतो आणि मला हवी ती शांतता मला मिळते...! किती बोलकी आहे ही कथा !
लेखात मी काही गमतीदार उदाहरणे दिली असली तरी दोन घटका करमणूक व्हावी म्हणून ! प्रत्यक्षात संसार म्हटला की तडजोड दोघांना करावी लागते कारण संसार दोघांचा असतो. एक जण चुकला तर दुसऱ्याने सांभाळून घ्यायचे असते. कधी कधी पत्नी तिच्या जागी बरोबर असते तर कधी कधी पती सुद्धा...! पण दोघांनीही मीच बरोबर असे म्हटले तर वाद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी संत कबीरांची वाचलेली एक गोष्ट मला आठवते. ती सांगून मी या लेखाचा शेवट करतो.
कबीरांकडे अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येत असत. एकदा आपल्या पत्नीच्या भांडणामुळे अशीच त्रस्त झालेली एक व्यक्ती त्यांच्याकडे येते. आपली पत्नी आपले अजिबात ऐकत नाही असे सांगून तो माणूस कबीरांना आपल्या समस्येवर तात्काळ काही उपाय सांगा म्हणून विनंती करतो. कबीर शांतपणे त्या माणसाचे ऐकून घेतात. ते आपल्या मुलाला बोलावतात. त्याला म्हणतात, ' बेटा, तुझ्या अम्मीकडे जा आणि तिला सांग की अब्बूनी कंदील लावून मागितला आहे. ' तो मुलगा घरात जातो आणि लावलेला कंदील बाहेर घेऊन येतो. कबीर तो कंदील त्या दोघांच्या मध्ये ठेवतात. आता भर दुपारी त्या कंदिलाचे काय काम असा प्रश्न त्या गृहस्थाला पडतो. पण कबीरांचा काही उद्देश असेल असे वाटून तो गप्प बसतो.
आता कबीर आपल्या बायकोला हाक मारून म्हणतात, ' अरी, सुनती हो ? हमारे घर मेहमान आये हैं. उनके लिये दूध का कुछ प्रबंध करो. '
' जी, अभी लायी, ' असं म्हणून कबीरांची बायको घरात जाते. थोड्या वेळाने दुधाने भरलेले दोन ग्लास घेऊन येते. कबीर ग्लास तोंडाला लावल्याबरोबर सारे दूध एका झटक्यात पिऊन टाकतात. तो गृहस्थ मात्र एकच घोट पिल्याबरोबर तोंड वेडेवाकडे करतो. तेव्हा कबीर त्याला विचारतात, ' कुछ समझे भाई ? ' तेव्हा तो गृहस्थ नकारार्थी मान हलवतो. मग कबीर म्हणतात, ' भल्या गृहस्था, मघाशी मी कंदील लावून मागितला. पण माझ्या बायकोने मला काही एक न विचारता कंदील लावून आणून दिला. भर दुपारी कंदील कशाला हवा आहे असं तिनं विचारलं नाही. आता नुकतंच तिनं दूध आणून दिलं. एकवेळ दुधात साखर टाकली नसती तरी चाललं असतं. पण दुधात तिच्या हातून चुकून मीठ पडलं. पण हे मी समजून घेतलं. काही न बोलता दूध पिऊन घेतलं. ठरवलं असतं तर आताच तुझ्यासमोर आमची भांडणं झाली असती. पण असं करायचं नसतो. संसार हा दोघांच्या विश्वासावर उभा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. हे ऐकल्यावर तो गृहस्थ समाधानाने परतला. ही कथा आपल्याला खूप काही सांगून जाते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५/०५/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा