उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग चार
रामकथा आणि रामायण यामध्ये अवीट गोडी आहे. एखादं मधाचं पोळं असावं आणि त्यातून सतत मधुर, अमृतासमान मकरंद स्रवत असावा, तशी ही रामकथा आहे. अगदी माणिक वर्मांनी जे गीत गायलंय, ' अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.' अक्षरशः तशीच गोडी रामकथेची आहे. हिचं कितीही वाचन, श्रावण केलं तरी कंटाळा येत नाही. वाल्मिक ऋषींच्या लेखणीत एवढं सामर्थ्य आहे, की रामायणातलं प्रत्येक पात्र त्यांनी अजरामर केलं आहे. वाल्मिकींचा मानवी मनाचा सखोल अभ्यास आहे, त्याशिवाय हे शक्य नाही. रामायणात चार भावांचा उल्लेख येतो. राम , लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. हे चारही भाऊ एकमेवाद्वितीय असेच आहेत. तिघं भावांचं रामावर अपार प्रेम आहे. आणि रामसुद्धा या तीनही भावांशिवाय राहू शकत नाही. रामायणात या भावांच्या दोन जोड्या आहेत. राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. जिथे राम असेल तिथे लक्ष्मण असायचाच आणि जिथे भरत असेल तिथे शत्रुघ्न हमखास असणारच. आज आपण रामकथेतील एक अत्यंत महत्वाचे पात्र म्हणजे लक्ष्मण, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.
लक्ष्मण म्हणजे रामाची सावली आहे. शरीराशिवाय सावलीला वेगळे अस्तीत्व असू शकत नाही. शरीर जाईल, तर सावली जाणारच. शरीर आहे आणि सावली नाही असे शक्य नाही. अशी ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. तसे या चारी भावांच्या वयात फार अंतर नाही. राम त्यांच्यात थोडा मोठा आहे. पण त्या सगळ्यांना रामाची आज्ञा प्रमाण आहे, शिरसावंद्य आहे. लक्ष्मणावर रामाची आज्ञा मोडण्याचा प्रसंग आयुष्यात दोनच वेळा आला. तोही नाईलाजाने. हे दोन प्रसंग कोणते ते पुढे येतीलच. खरं तर लक्ष्मण हा सुमित्रेचा मुलगा, सुमित्रानंदन. रामाची माता कौसल्या. तरी देखील राम त्याला सहोदर म्हणतो. सहोदर म्हणजे एकाच आईच्या उदरी जन्माला आलेला. इथे खरं म्हणजे दोघांच्या माता वेगळ्या आहेत. पण रामाचे चरित्र, त्याचा स्वभाव एवढा उदात्त आहे की त्याला सगळ्या माता या कौसल्येसमानच आहेत. म्हणूनच तो एका ठिकाणी लक्ष्मणाचा उल्लेख करताना त्याला सहोदर म्हणतो. आजच्या काळात आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे.
लक्ष्मण हा अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी आहे. पण त्याने आपले अवघे व्यक्तिमत्व, स्वार्थ, स्वाभिमान रामामध्ये विलीन करून टाकले आहे. त्याला वेगळे अस्तित्व जणू नाहीच. पण लक्ष्मण आहे म्हणून राम आहे. जसा लक्ष्मण रामाशिवाय राहू शकत नाही, तसाच रामसुद्धा लक्ष्मणाशिवाय राहू शकत नाही. कसा ते आपण पुढे पाहणारच आहोत.
विश्वामित्र ऋषींच्या यज्ञात जेव्हा राक्षस विघ्न आणतात, तेव्हा विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे येतात आणि राक्षसांपासून यज्ञाच्या रक्षणासाठी ते रामाची मागणी करतात. जेव्हा वसिष्ठ ऋषींच्या सल्ल्यानुसार रामाला पाठवण्याचे ठरते, तेव्हा लक्ष्मण रामाबरोबरच जातो. तो एकट्या रामाला जाऊ देत नाही. जेव्हा कैकेयी दशरथाकडून वर मागून घेते, तेव्हा एका वराने रामाला वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला राज्य द्यावे असे ठरते, त्यावेळी लक्ष्मण रामाबरोबर जायचे ठरवतो. वास्तविक तो अयोध्येत राहून राजसुखांचा उपभोग घेऊ शकला असता. त्याला वनवासात जायचे काही कारण नव्हते. पण रामाशिवाय तो राहूच शकत नाही. आपल्या पत्नीला आणि आईला तो फक्त सांगतो की मी रामासोबत जातो आहे. पत्नीला ' जाऊ का ' म्हणून विचारत नाही, एवढा तो राममय झाला आहे. एका रामाशिवाय त्याच्या मनात दुसरा कशाचाच विचार नाही. त्याची पत्नी उर्मिला सुद्धा धन्य आहे. तिने आपल्या पतीच्या इच्छेत तिची स्वतःची इच्छा विलीन करून टाकली आहे.
लक्ष्मणाचे रामावर निरतिशय प्रेम आहे. रामाला जेव्हा वनवास होतो, तेव्हा तो दशरथाला विचारतो की रामाचा गुन्हा काय आहे ? त्याला वनवासात पाठवायचा तुम्हाला काय अधिकार आहे ? प्रजेच्या हितासाठी प्रसंगी दशरथाला तुरुंगात टाकून रामाने राज्य घ्यावे असे त्याला वाटते. पण जेव्हा राम त्याला सांगतो की आपल्याला पितृआज्ञेचं पालन करायचं आहे, तेव्हा लक्ष्मण एक शब्दही न बोलता त्याच्यासोबत जातो. जेव्हा लक्ष्मणाला कळते की हे सगळे कैकेयीच्या वरामुळे झाले आहे, तेव्हा तो संतापून तिला मारायला धावतो. पण राम त्याला समजावून सांगतो की जशी कौसल्या, सुमित्रा तशीच कैकेयी ही आपली माता आहे. तिचा अनादर करणे योग्य नाही. तेव्हा लक्ष्मण शांत होतो. रामापुढे काही बोलत नाही. जेव्हा भरत रामाला भेटण्यासाठी दंडकारण्यात येतो. त्याच्यासोबत सेना असते. ती सेना पाहून लक्ष्मणाला असे वाटते की भरत रामाला मारण्यासाठीच आला आहे. तो रामाकडे भरताशी युद्ध करण्याची परवानगी मागतो. कारण जिथे रामाचा विषय येतो, तिथे लक्ष्मणाला एका रामाशिवाय आणि रामाच्या सुरक्षेशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. पण राम त्याला सांगतो की तू भरताला ओळखले नाहीस. तुला अयोध्येचे राज्य हवे आहे का ते सांग. ते सुद्धा तो लगेच देईल.
लक्ष्मण पराक्रमी तर होताच पण त्याचे चारित्र्यही अत्यंत उज्ज्वल होते. जेव्हा वनवासात रावण सीतेला पळवून नेतो आणि सीतेचे दागिने ओळखण्याचा प्रश्न येतो, तेव्हा राम लक्ष्मणाला विचारतो की हे दागिने सीतेचेच आहेत का ? तेव्हा तो उतरतो
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।
तो म्हणतो सीतेचे हस्तभूषणे, कर्णभूषणे मी ओळखत नाही. मी फक्त सीतेचे चरण वंदन करीत असल्यामुळे तिची नूपुरे ( पैंजण ) ओळखतो. जेव्हा शूर्पणखा सुंदर स्त्रीचे रूप घेऊन लक्ष्मणाला मोहित करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाही तो विचलित होत नाही. एवढे उच्च दर्जाचे चारित्र्य लक्ष्मणाकडे आहे.
लक्ष्मणच्या पराक्रमामुळे रामाला युद्ध जिंकणे सोपे झाले. रावणाचा तरी पूर्वी अनेकदा पराभव झाला होता. पण रावणाचा मुलगा इंद्रजित हा अपराजित होता. त्याला कोणी पराजित करू शकत नव्हते. त्याचा वध लक्ष्मणाने केला आहे.
रामाची आज्ञा दोनच वेळेला लक्ष्मणाला नाईलाजाने मोडावी लागली आहे. पहिला प्रसंग म्हणजे जेव्हा मारीच सुवर्णमृगाचे रूप घेऊन येतो आणि राम त्याच्या शिकारीसाठी त्याच्या मागे जातो, तेव्हा लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करण्याबद्दल सांगून जातो. जेव्हा मारीच श्रीरामाचा नकली आवाज काढून सीतेला भ्रमित करतो, तेव्हा सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्यास सांगते. तेव्हा लक्ष्मणाला माहित असते की हा रामाचा आवाज नाही, आणि रामाला काही होऊ शकत नाही. पण सीता या प्रसंगी लक्ष्मणाला नको ते बोलते. आणि तू गेला नाहीस तर मी जीव देईन अशी भीती घालते, तेव्हा नाईलाजाने लक्ष्मणाला जावे लागते. तरी जाताना सीतेच्या रक्षणासाठी तो आश्रमाभोवती लक्ष्मणरेषा ओढून जातो
दुसरा प्रसंग रामायणाच्या शेवटी येतो की जेव्हा रामाच्या आज्ञेचे उल्लंघन लक्ष्मणाला नाईलाजाने करावे लागते. रामायणात शेवटी कालपुरुष रामाच्या भेटीला येतो. त्यावेळी ते दोघे बोलत असताना मध्ये कोणी येऊ नये अशी अट तो रामाला घालतो आणि जो कोणी मध्ये येईल, त्याला प्राणदंड देण्यास सांगतो. राम लक्ष्मणाला दरवाज्यावर पहारा देण्यास सांगतो आणि आमचे बोलणे पूर्ण होईपर्यंत कोणालाही मध्ये सोडू नकोस असे सांगतो. अशा वेळी नेमके शीघ्रकोपी दुर्वास ऋषी तिथे येतात आणि रामाला आताच भेटायचे आहे म्हणून लक्ष्मणाला सांगतात. लक्ष्मण त्यांना नम्रतेने सांगतो की ते आतमध्ये महत्वाची चर्चा करीत आहेत. मला त्यांनी कोणाला आत सोडण्यास मनाई केली आहे. अशा वेळी दुर्वास म्हणतात की तू जर मला आत सोडले नाही तर अवघी अयोध्या नगरी मी शाप देऊन भस्म करीन. लक्ष्मणावर हे धर्मसंकट होते. त्यांना आत जाऊ द्यावे तर रामाची आज्ञा मोडावी लागते आणि न जाऊ द्यावे तर संपूर्ण नगरीवर संकट येते. अशा वेळी तो विचार करतो की मला प्राणदंड झाला तर चालेल पण माझ्यामुळे अयोध्येचे नुकसान नको. म्हणून तो दुर्वासांना आत सोडतो.
जरी कालपुरुष आणि राम यांचे बोलणे संपत आले असले तरी, नियमाप्रमाणे लक्ष्मणाची चूक झाली होती. राम कर्तव्यपालनाच्या बाबतीत राजा म्हणून कठोर होता. त्याने सीतेचा त्याग करायला सुद्धा मागेपुढे पाहिले नाही. आता लक्ष्मणालाही त्याला प्राणदंड देणे भाग होते. पण वसिष्ठ ऋषींच्या सल्ल्यानुसार एखाद्या प्रिय व्यक्तीचा त्याग करणे म्हणजे त्याला प्राणदंड दिल्यासारखेच आहे. म्हणून राम या प्रसंगी लक्ष्मणाचा त्याग करतो. लक्ष्मणाला रामाचा वियोग सहन होत नाही. तो रामाशिवाय राहू शकत नाही. तो शरयू नदीत जाऊन प्राणत्याग करतो. रामसुद्धा लक्ष्मणाशिवाय राहू शकत नाही. लक्ष्मण गेल्यानंतर तो सुद्धा शरयू नदीत जाऊन आपले अवतारकार्य संपवतो. असे लक्ष्मण हे रामायणातले एक आदर्श पात्र. ( पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२४/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा