उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
हास्यरंग...
कधी कधी दैनंदिन जीवनात आपले काम करीत असताना अजाणतेपणी काही विनोद घडतात, तर काही माणसांजवळ मुळातच विनोदबुद्धी असते. कधी कधी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा अशी विनोदबुद्धी असलेली माणसे आपल्या विनोदाने वातावरण हलकेफुलके करतात आणि सगळा तणाव निघून जातो. अशी दोन्ही प्रकारची काही उदाहरणे आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील कोणताही प्रसंग काल्पनिक नाही. मी शाळेत काम करीत असताना घडलेले हे किस्से. काही मुलांचे, काही शिक्षकांचे तर काही मुख्याध्यापकांचे...!
एकदा एका वर्गात मी इंग्रजीचे अध्यापन करीत होतो. एका कवितेत माणसाला जे बुद्धीचे वरदान लाभले आहे, त्याबद्दल कवीने लिहिले होते. मी ती कविता शिकवायला घेतली. सुरुवातीला प्रस्तावना म्हणून मुलांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, ' माणूस आणि इतर प्राणी यांच्यात कोणता फरक आहे ? ' वर्गामधली मुले साधारण घरातली होती. त्यांना इंग्रजीत उत्तर देणे जमत नव्हते. तेव्हा मी त्यांना मराठीत उत्तर देण्याची मुभा दिली. माझी अपेक्षा होती की माणसाला इतर प्राण्यांपेक्षा निसर्गाने अधिक बुद्धी किंवा विचार करण्याची शक्ती दिली आहे, हा इतर प्राणी आणि माणूस यांच्यात फरक आहे असे उत्तर मुले देतील.
बराच वेळ वर्गात शांतता होती. थोड्या वेळाने एका मुलाने हात वर केला. मला हायसे वाटले. त्याला म्हटले सांग. तो म्हणाला, ' सर, इतर प्राण्यांना चार पाय असतात आणि माणूस दोन पायांवर चालतो हा फरक आहे. ' ते ऐकून मला हसू फुटले . या उत्तराची मी अपेक्षा केली नव्हती. पण तसे त्याचे उत्तर त्याच्या दृष्टीने बरोबर होते. मी हसलो आणि म्हणालो, ' ठीक आहे. अजून कोणाला काही सांगायचे आहे का ? ' आणखी एका मुलाने हात वर केला. मला आनंद झाला. म्हटलं हरकत नाही. मुलं प्रयत्न तर करताहेत. त्या मुलाला विचारले सांग म्हणून. तो म्हणाला, ' सर, माणसाला शेपूट नसते, इतर प्राण्यांना शेपूट असते. ' सगळ्या वर्गातली मुले हसायला लागली. माझ्या प्रश्नाला अशी उत्तरे येतील मी कल्पना केली नव्हती. शेवटी मला अपेक्षित असलेले उत्तर मलाच मुलांना सांगावे लागले.
*************
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. शाळेचे एक मुख्याध्यापक फार कडक शिस्तीचे होते. एकदा त्यांनी एखादी गोष्ट जाहीर केली की त्यांच्यापुढे कोणी बोलत नसे. एकदा परीक्षा जवळ आल्या तेव्हाची गोष्ट. त्यांनी शिक्षकांची एक सभा घेतली आणि त्यात जाहीर केले की आता परीक्षा संपेपर्यंत पंधरा दिवस कोणालाही रजा मिळणार नाही. त्यामुळे कधी कधी ज्यांना खरोखर काही अडचण असायची त्यांचीही मोठी पंचाईत व्हायची. कोणी काही बोलले नाही. एक शिक्षक मात्र मिश्किल होते. ते म्हणाले, ' मी रजा घेऊन दाखवतो. ' दुसऱ्या दिवशीच सकाळी ते त्या मुख्याध्यापकांच्या दाराशी जाऊन बसले. अंगावर शाल घेतली. अंगाला, कपाळाला व्हिक्स, बाम वगैरे लावून त्याचा घमघमाट येईल अशी व्यवस्था केली. ते मुख्याध्यापक जेव्हा घराबाहेर कोण आलं आहे हे पाहण्यासाठी आले, तेव्हा हे शिक्षक त्यांना अंगावर शाल घेतलेले, व्हिक्सचा वास येणारे अशा अवस्थेत आढळले . त्यांनी विचारले, ' काहो सर, एवढ्या सकाळी सकाळी आलात ? काही विशेष काम आहे का माझ्याशी ? ' सर म्हणाले, ' दोन दिवस झाले बरे नाही. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. '
' अहो, मग इथे कशाला आलात ? घरी विश्रांती घ्यायची ना.. ?' मुख्याध्यापक.
' सर, दोन दिवसांची तरी रजा हवी होती. '
' अहो, दिली असती. इथे यायचा त्रास कशाला घेतलात ? '
' नाही सर, तुम्हीच मीटिंगमध्ये सांगितले होते ना की कोणालाही रजा मिळणार नाही म्हणून..'
' ठीक आहे. जा तुम्ही. मी तुमची रजा मंजूर करतो. कोणाच्या तरी हस्ते अर्ज पाठवून द्या. '
अशा पद्धतीने त्यांनी रजा मिळवून दाखवली आणि शिक्षकांत लावलेली पैज जिंकली.
************
परीक्षा झाली की शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्याचे मोठे काम असायचे. शाळा हे गट्ठे शिक्षकांना घरी तपासण्यासाठी देत असे. असंच एकदा उत्तरपत्रिका वाटपाचे काम सुरु होते. शाळेचा सेवक सगळ्या शिक्षकांना त्यांचे गट्ठे तपासण्यासाठी बांधून देत होता. कोणाला एखादा गठ्ठा जास्त तर कोणाला कमी येत होता. जरा तणावपूर्ण वातावरण त्या परीक्षा हॉलमध्ये होते. एका शिक्षिकेला तपासण्यासाठी बरेच उत्तरपत्रिकेचे गट्ठे मिळाले. त्या खूप चिडल्या. त्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणाल्या, ' एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? '
तेवढ्यात ते मिश्किल शिक्षक म्हणाले, ' पेन्सिलीने..! '
सगळ्या परीक्षा हॉलमध्ये हास्याचा स्फोट झाला आणि वातावरणातला तणाव निवळला.
*********
एकदा शाळेत ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी होत होती. सगळी मुले आपापल्या वर्गात बसलेली होती. शाळेतल्या प्रत्येक मजल्यावर प्रार्थना किंवा सूचना ऐकू जाव्यात म्हणून स्पिकर्स लावण्यात आले होते. ज्ञानेश्वर पुण्यतिथीच्या दिवशी एक शिक्षक खालून माईकवर पसायदान म्हणत होते. त्यांचा आवाज मात्र सुश्राव्य नव्हता. म्हणून हे कोण गाताहेत अशी चर्चा शिक्षकदालनात सुरु झाली. ते मघाचेच मिश्किल शिक्षक हसले. त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, ' ज्ञानदेवांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले हे नक्की खरे असले पाहिजे. ' आणि सगळे शिक्षक दालन हास्यात बुडून गेले.
*********
एकदा एक मुख्याध्यापक शिक्षकांच्या सभेत बोलत होते. शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. बोलता बोलता ते म्हणाले, ' आपली शाळा बेस्ट आहेच. पण ती बेटर कशी होईल यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. ' ज्या शिक्षकांना या गंभीर विधानातला विनोद लक्षात आला, ते एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले. त्या मुख्याध्यापकांचा तसा बोलण्याचा उद्देश नव्हता. बहुधा त्यांच्याकडून अनवधानाने तसे बोलले गेले असावे. कारण आपण प्रगतीसाठी बेटरकडून बेस्टकडे जातो. पण काही दिवसांनी त्यांचे हे शब्द खरे ठरण्याची वेळ आली. बेस्ट पासून शाळेची वाटचाल बेटर कडे सुरु झाली आणि त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत हा दुःखद भाग.
*********
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा