श्री स्वामी समर्थ
स्वामीकृपा
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यातील एकरूखे हे छोटंसं गाव. या गावात शेतकरी, शेतमजुरी करणारी बहुतेक कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत होती. अशा कुटुंबांपैकी एक होतं देशमुख कुटुंब. या कुटूंबात आईवडील, एक मुलगा, एक मुलगी आणि आजी आजोबा असे सहा जण. वडील साहेबराव तलाठी म्हणून काम करीत. आई गृहिणी होती. मोठी मुलगी रेश्मा आणि तिच्यापेक्षा लहान असलेला राहुल. नाही म्हणायला देशमुख कुटुंबीयांची थोडीशी शेती होती, पण त्यातून फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. पण अशा सामान्य परिस्थितीतही देशमुख कुटुंबीयांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले होते. त्यांना शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून आई घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवायची. वडीलही बाहेरची दोन कामे जास्त कामे करून दोन पैसे अधिक मिळावेत म्हणून धडपडत असत. देशमुख कुटुंबीयांची परिस्थिती सामान्य असली तरी संस्काराची श्रीमंती मोठी होती. आपल्या कष्टाच्या कमाईचाच पैसा घरात यावा यासाठी साहेबराव दक्ष असत. घरातले वातावरण धार्मिक होते. रेश्माच्या आईची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती. रेश्माच्या आईने रेश्माला अभ्यासासोबतच घरकाम आणि स्वयंपाकातही तयार केले होते. कधी कधी आई जर माहेरी गेली, तर रेश्मा तिची उणीव भासू द्यायची नाही. ती उत्तम स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालायची. तिच्या हाताला कमालीची चव होती.
रेश्मा आणि राहुल दोघं भावंडं अभ्यासात हुशार होती. त्यांचा शाळेत नेहमी पहिल्या पाचात नंबर असायचा. रेश्मा बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. जवळच्याच कॉलेजात तिने बी ए साठी प्रवेश घेतला. रेश्मा मुळातच देखणी असल्याने तिला बारावीपासूनच स्थळे चालून येऊ लागली होती. बी ए च्या शेवटच्या वर्षाला असताना तिला नगरच्या पाटलांच्या मुलाचे, नितीनचे स्थळ आले. नितीन इंजिनिअर झालेला होता. दिसायला उत्तम होता. परंतु सध्याच्या कठीण काळात त्याला चांगली नोकरी मिळणे दुरापास्त झाले होते. मुंबईला एका कंपनीत कमी पगारावर त्याला काम मिळाले होते. पण सुरुवात तर करू या. अनुभवाच्या जोरावर पुढे चांगले काम मिळेल या आशेवर तो ते काम करीत होता. नितीनचे आईवडील रेश्माच्या घरी येऊन तिला पाहून गेले आणि हुशार चुणचुणीत असलेली रेश्मा सून म्हणून त्यांना आपल्या मुलासाठी पसंत होती. मग नितीन आणि रेश्मा यांचीही भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांनी एकमेकांना पसंती दिली. नितीन आणि रेश्मा जोडीही छान दिसत होती. दोघेही एकमेकांना अनुरूप होते. यथावकाश योग्य मुहूर्त पाहून देशमुख आणि पाटील कुटुंबीयांनी त्यांचे लग्न करून दिले आणि रेश्मा सून म्हणून पाटील कुटुंबियांच्या घरी आली .
सुरुवातीचे काही महिने छान गेले. नव्या सुनेचे कोडकौतुक झाले. पण नांतर घरात वादाला सुरुवात झाली. रेश्माची नणंद लग्न होऊन त्याच गावात राहत होती. तिचे सारखे घरी येणेजाणे सुरु असायचे. ती घरी आली की रेश्माची सासू आणि तिच्या तासनतास एका खोलीत गप्पा चालायच्या. घरामध्ये शेती आणि प्रॉपर्टीचे वाद सुरु झाले. रेश्माच्या नणंदेने आपल्या आईचे असे काही कान भरले की तिला सुरुवातीला आवडलेली ही सून घरात नकोशी झाली. याची परिणीती रेश्माला त्रास देण्यात होऊ लागली. मुळात सोशिक असलेली रेश्मा चकार शब्द न काढता हे सगळे सहन करत होती. कारण नितीनला मुंबईला चांगली नोकरी नव्हती. घर नव्हते. पण एकदा त्याच्या आईनेच नितीनला घरी बोलावून घेतले आणि हिला तुझ्या सोबत काही करून मुंबईला घेऊन जा असे सांगितले.
नितीनने रेश्माची समजूत घातली. मी घर बघेपर्यंत इथे थांब. घर मिळाले की लगेच मी येऊन तुला घेऊन जाईन असे सांगितले. आणि लवकरच त्याला मुंबईच्या एका उपनगरात एक वन रम किचन भाड्याने मिळाले. तो गावी येऊन रेश्माला घेऊन निघाला. निघताना सासूने फारसे सामान घेऊ दिले नाही. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती आणि स्वामी समर्थांची प्रतिमा तिने रेश्माच्या हातात ठेवल्या. स्वाभिमानी आणि समाधानी असलेल्या रेश्माने त्यांचा आनंदाने स्वीकार केला आणि दोघेही मुंबईला आली . हळूहळू त्यांची घडी बसू लागली. पण मुंबईला असलेली महागाई आणि नितीनला असलेला कमी पगार यामुळे दोघांची ओढाताण होऊ लागली. घर चालवणे कठीण होऊ लागले. एक दिवस रेश्मा नितीनला म्हणाली, ' अहो, मी सुद्धा काही काम करून आपल्या संसाराला हातभार लावावा असे म्हणते. ' नितीन म्हणाला, ' हरकत नाही. पण तू काय काम करणार ? इकडे तुला चांगली नोकरी मिळेल याची खात्री नाही. मी इंजिनिअर असूनही कमी पगारावर काम करतो आहे. '
रेश्मा म्हणाली, ' तुम्ही नेहमी म्हणता ना, की तुझ्या हाताला चव आहे म्हणून. मग मी स्वयंपाकाच्या ऑर्डरी घेत जाईन. लोकांच्या मागणीप्रमाणे त्यांना हवे ते पदार्थ बनवून देईन. आणि एकदा नाव झाले की हळूहळू कामे मिळत जातील. '
नितीन म्हणाला, ' पण तू स्वयंपाकाचे काम करणार ? मला योग्य नाही वाटत. '
रेश्मा म्हणाली, ' काय हरकत आहे ? कामात कसली आली आहे लाज ? कोणतेही काम सुरुवातीला छोटे वाटते पण एकदा सुरुवात झाली की हळूहळू काम वाढत जाते. आपलं काम चांगलं असलं की लोकांचा विश्वास वाढायला लागतो. व्यवसाय नावारूपाला येतो. '
नितीन म्हणाला, ' ठीक आहे. तुला योग्य वाटेल तसे कर. '
रेश्माने स्थानिक वर्तमानपत्रातून आपल्या या छोट्या व्यवसायाची जाहिरात केली. घराच्या बाहेर बोर्ड लावला. एक नवी आशा , नवा हुरूप तिला मिळाला. जाहिरात करून काही दिवस होऊन गेले पण अजून म्हणावे तसे काम मिळत नव्हते. रेश्माच्या घराजवळच रंजनाताईंचा बंगला होता. तिथे सकाळी, संध्याकाळी काही मंडळी जाताना दिसत. रेश्माने त्याबद्दल लोकांना विचारले तेव्हा तिला कळले की त्याच बंगल्यात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा ठेवलेली असून लोक त्याठिकाणी त्यांची भक्ती करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी जातात. सकाळ, संध्याकाळ स्वामींची पूजा, आराधना, नैवेद्य , आरती आदी सोपस्कार होतात. रेश्माला हा शुभशकुन वाटला. आपल्या घराजवळ स्वामी समर्थांचा निवास आहे, ही गोष्ट तिला खूपच आनंद आणि समाधान देणारी ठरली. त्या दिवशी संध्याकाळी ती दर्शनासाठी तेथे जाऊन आली . तेथे खूपच प्रसन्न वाटले. रंजनाताई तर अतिशय प्रेमळ होत्या. त्यांनी रेश्माची मोठ्या आस्थेने चौकशी केली आणि तिला येथे येत जा म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. रेश्माने मेथीचे लाडू बनवण्याचे ठरवले होते. तिच्या मनात आले की स्वामींना मेथीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. पण कडू मेथीचे लाडू स्वामींना चालतील का असं तिने रंजनाताईंना विचारलं. त्या म्हणाल्या, ' स्वामी म्हणजे माउली. त्यांना प्रेमाने तू जे देशील त्याचा ते स्वीकार करतील. ' हे ऐकून रेश्माला मोठा आनंद झाला.
रात्री नितीन घरी आल्यावर तिने ही सगळी हकीगत त्याला सांगितली. त्यालाही खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी रेश्माने लवकर उठून सगळी कामे आटोपली आणि स्वामींसाठी मेथीचे लाडू मोठ्या मनोभावे बनवले. रंजनाताईंनी तिला सकाळी बारा वाजेच्या आत नैवेद्य घेऊन ये असे सांगितले होते. कारण एकदा स्वामींचे नैवेद्य, जेवण आणि विदा झाला की नंतर ते काही घेत नाहीत. म्हणून तिची धावपळ सुरु होती. ती आता तयार होऊन निघणार, तेवढ्यात तिला एक फोन आला. एका ताईंची नुकतीच डिलिव्हरी झाली होती आणि त्यांना मेथीच्या लाडवांची तातडीने आवश्यकता होती. तेव्हा तिला आता मोठा प्रश्न पडला. त्या आईला मेथीचे लाडू देणे जास्त गरजेचे आहे, असे तिला वाटले आणि तिने मनोमन स्वामींची क्षमा मागून ते लाडू त्या बाईला नेऊन दिले. रंजनाताईंना भेटून तिने त्याबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या हरकत नाही. त्या बाईंची गरज आधी भागवली ते छान झाले. रेश्मा म्हणाली, ' पुढच्या गुरुवारी मी स्वामींसाठी डिंकाचे लाडू घेऊन येईन. '
आता रेश्माला स्वामींच्या कृपेने कामाच्या ऑर्डर्स मिळणे सुरु झाले होते. होता होता गुरुवार आला. रेश्माने स्वामींना कबूल केल्याप्रमाणे डिंकाचे लाडू बनवले. पण यावेळीही मागच्या सारखेच घडले. ती लाडू घेऊन नैवेद्य दाखवायला जाणार, तोच तिला एका घरून डिंकाच्या लाडवांची ऑर्डर आली. ती व्यक्ती आजारी असून डॉक्टरांनी तिला डिंकाचे लाडू घेण्याचा सल्ला दिला होता. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही रेश्माने मानवसेवा महत्वाची मानून स्वामींसाठी केलेले लाडू त्या व्यक्तीला नेऊन दिले. आता मात्र तिचे मन तिला खात होते. आपल्या हातून स्वामींची अपेक्षित सेवा घडली नाही याची तिला खंत होती. रंजनाताईंजवळ तिने मोकळे केले. त्या पुन्हा म्हणाल्या, ' स्वामी खूप दयाळू आहेत. ते रागावत नाहीत. तू अडलेल्याला मदत केलीस याचा त्यांना आनंदच होईल. ' आता मात्र पुढच्या गुरुवारी स्वामींचा नैवेद्य चुकू द्यायचा नाही असे तिने मनोमन ठरवले.
आता स्वामीकृपेने रेश्मा आणि नितीनचा संसार सुखात चालला होता. लवकरच गुरुवार आला. आता तिने स्वामींना नैवेद्य म्हणून मागच्या गुरुवारचे मेथीचे आणि डिंकाचे मिळून एकत्र लाडू बनवून अर्पण करायचे ठरवले. आजच तिला एक वाजता एका ठिकाणी मिटिंगसाठी जायचे होते. त्या ठिकाणी तिला एक ऑर्डर मिळणार होती. शिवाय संध्याकाळी पाच वाजता देखील एका ठिकाणचे बोलावणे आले होते. त्या ठिकाणी देखील काही ऑर्डर मिळण्याची शक्यता होती. सकाळी लवकर उठून तिने घाईघाईने सगळी कामे आवरली. नितीनला डबा तयार करून दिला. आणि स्वामींना नैवेद्य दाखवून पुढे तसेच मीटिंगला जाण्याच्या दृष्टीने तयारी केली. आता साडेअकरा झाले होते. घाईघाईत तिने आपली बॅग उचलली आणि घराला कुलूप लावून बाहेर पडली.
आज ठरल्याप्रमाणे स्वामींना आपण नैवेद्याचे लाडू अर्पण करणार याचा तिला कोण आनंद झाला होता. तिथे गेल्यानंतर तिने स्वामींना नैवेद्य ठेवण्यासाठी आपली बॅग उघडली आणि तिला धक्काच बसला. तिला लक्षात आले की आपण निघण्याच्या घाईत तो लाडवांचा डबा किचन ओट्यावरच विसरून आलोय. तेवढ्यात एक आजी तिथे आल्या. त्या आजीनी स्वामींना नैवेद्य म्हणून मेथीचे आणि डिंकाचे लाडू आणले होते. मग स्वामींना त्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्यात आला. मग आरती होऊन तेथे जमलेल्या उपस्थिताना प्रसाद वाटण्यात आला. स्वामींजवळ जे डिंक आणि मेथीचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवले होते, ते रंजनाताईंनी उचलले. त्यांना असे दिसले की एका लाडवावर एक बदाम खोचलेला होता, तो बदाम आता नाहीसा झाला होता. त्यांनी त्या आजींना सांगितले की आज तुमच्या नैवेद्याचा स्वीकार स्वामींनी केला आहे. हा चमत्कार पाहून सगळ्यांनाच मोठा आनंद आणि आश्चर्य वाटले आणि सगळ्यांनी भक्तिभावाने स्वामींना हात जोडले. रेश्माला वाटले आज आपण लाडू आणले असते तर, आपलाही नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला असता. या विचाराने मन जरा खट्टू झाले. तिची नाराजी पाहून रंजनाताईंनी तिची समजूत घातली. त्या म्हणाल्या, ' तू सगळे मनोभावे करते आहेस. स्वामी निश्चितच तुझा नैवेद्य स्वीकारतील. तू नाराज होऊ नकोस. '
रेश्मा पुढे आपल्या नियोजित मीटिंगसाठी गेली. ती मीटिंग जरा लांबली पण तिला एका पार्टीची ऑर्डर मिळाली. संध्याकाळच्या मीटिंगमध्ये तिला एका साखरपुड्यासाठी ऐंशी लोकांच्या जेवणाची ऑर्डर मिळाली. त्या आनंदातच ती घरी आली. संध्याकाळी नितीन घरी आल्यावर तिने त्याला सगळी हकीगत सांगितली. नितीन म्हणाला, ' स्वामीकृपेने आपल्याला काम मिळाले आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण जेवणाच्या आधीच घरी स्वामींना नैवेद्य दाखवू. आणि मग जेवण करू या. तिलाही हा विचार आवडला. दोघांनीही शुचिर्भूत होऊन स्वामींना लाडवाचा नैवेद्य दाखवण्यासाठी डबा उघडला आणि काय आश्चर्य..! रेश्माने एका लाडवाला खोचलेला बदाम नाहीसा झालेला होता, त्या लाडवाचा एक घास कोणीतरी खाल्लेला दिसत होता. घरात तर कोणीच नव्हते. मग रेश्माच्या लक्षात आले की रंजनाताईंकडे ज्या आजी मेथीचे आणि डिंकाचे लाडू घेऊन आल्या होत्या, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या रूपाने स्वामी माऊलीच त्या ठिकाणी आली होती. रेश्माचा राहिलेला नैवेद्य स्वामींनी अशा तऱ्हेने स्वीकारला होता. रेश्माचे डोळे आता भरून आले होते. स्वामींचे आभार कसे मानू असे तिला झाले. आपली श्रद्धा मनापासून असली तर ती स्वामींपर्यंत पोहोचतेच याचा साक्षात्कार तिला झाला होता. भक्तांच्या पाठीशी स्वामी माउली उभी असतेच. तिला फक्त शुद्ध भक्ती हवी असते. मानवसेवा हिच ईश्वरसेवा असते हाही संदेश माउलींनी या घटनेतून दिला होता. रेश्माला स्वामींचे वचन आठवले.
अनन्यश्चित्यतो मां ये जनः पर्युपासते ! तेषां नित्यभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहं !!
मला अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, त्याचा योगक्षेम मी चालवितो.
श्री स्वामी समर्थ.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा